सातारा जिल्हा – पर्यटन
कुरणेश्वर (खिंडीतील गणपती)
सातारा शहरापासून जुन्या सातारा-कोल्हापुर रस्त्याला १ कि.मी. अंतरावर श्री गणेश आणि श्री महादेवांचे मंदिर आहे. खिंडीतील गणपती हा स्वयंभु असून, हे सातारचे पुरातन आणि प्रसिद्ध ग्रामदैवत आहे.
येवतेश्वर मंदिर
येथे ऎतिहासकालीन श्री महादेवांचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये भाविक पवित्र मनाने दर्शन घेण्यासाठी येतात. सातारा शहरालगतच घाट प्रारंभ होतो व पुढे हाच मार्ग येवतेश्वर मंदिराकडे जातो. सातारा शहरापासून ५ कि.मी.अंतरावर आणि समुद्र सपाटीपासून सुमारे २५०० फुट उंचीवर हे मंदिर आहे. या मंदिरापासून ते कास पर्यंत पसरलेल्या हिरव्यागार झाडा-झुडपांमुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे
महा गणपती
वाई (भारताची दक्षिण काशी) ते सातारा हे अंतर साधारणपणे ३३ कि.मी.आहे. वाई खासकरून येथे असणाऱ्या मंदिरांमुळे आणि घाटामुळे प्रसिद्ध झाले आहे. संपूर्ण राज्यातून भाविक पवित्र मनाने पूजा-अर्चना करण्यासाठी येथील महा गणपतीच्या मंदिरामध्ये येत असतात. हे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतीक केंद्र आहे. मराठी विश्वकोषचे केंद्र येथे आहे. वाईपासून ९ कि.मी.अंतरावर कृष्णा नदीवर बांधलेले धोम धरण आहे.
शिखर शिंगणापूर
सातारा शहरापासून ८९ कि.मी.अंतरावर सातारा-अकलूज रस्त्याला श्री महादेवांचे फार प्राचीन मंदिर आहे यालाच शिखर शिंगणापूर म्हणतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला भक्त मोठ्या संख्येने इथे जमतात. या मंदिराला छ. शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असे खुप ऎतिहासिक संदर्भ आहेत.
सिद्धनाथ मंदिर
हे सिद्धनाथ मंदिर १२ व्या शतकात स्थापन केलेले आहे. शंकर आणि पार्वती यांच्या रुपातील सिद्धनाथ आणि जोगुबाई यांच्या मूर्ती इथे आहेत.भेट देण्यासारखे हे मंदिर म्हसवड येथे सातारा शहरापासून सातारा-सोलापूर रस्त्याला ८० कि.मी. अंतरावर आहे. लाखोंच्या संख्येने भाविक इथे जमतात व वार्षिक रथयात्रेचे आयोजन करतात.
चाफळ
चाफळ हे सातारा शहरापासून ३५ कि.मी. तर उंब्रजपासून १५ कि.मी.अंतरावर (पुणे-बेंगलोर रा.म.मार्ग) आहे. समर्थ रामदास स्वामींनी भगवान श्री.रामचंद्रांना दैवत मानून चाफळ येथे अंगापूर जवळील नदीवर श्री राम मंदिर मंदिराची स्थापना केली.
हे मंदिर वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून पुर्णतः संगमरवरने बांधलेले आहे.
औंध
औंध हे सातारा शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. पुर्वी औंध हे औंध संस्थानची राजधानी होती. येथील श्री यमाई देवी मंदिर आणि संग्रहालय प्रसिद्ध आहेत. येथील संग्रहालयात सुमारे ८००० हून अधिक मौल्यवान वस्तू आहेत.
कराडमधील ऎतिहासिक मशीदसन
१५८० मध्ये विजापूरचा इब्राहिम खान उर्फ सुलतान अली आदिल शाह याने मशिदीची स्थापना केली. कित्येक मैलावरून साधारण ३२.३ मीटर उंचीच्या मिनारांचे दर्शन होते.
सातारा जिल्ह्यातील धरणे
कोयना धरण
हे धरण १९६३ साली कोयना नदीवर बांधलेले असून ९८.७८ टीएमसी क्षमता असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.यावर १९२० मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. सातारा शहरापासून कोयना धरणापर्यंतचे अंतर ९८ कि.मी.आहे तर पाटण तालुक्यापासून हे अंतर २० कि.मी.आहे. सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. धरण क्षेत्रातील नेहरू उदयान प्रेक्षणीय आहे.
कण्हेर धरण
१९८६ साली १०.१० टीएमसी क्षमता असलेले आणि प्रेक्षणीय असे हे धरण वेण्णा नदींवर बांधण्यात आले आहे. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. सातारा-मेढा रस्त्याला सातारा शहरापासूनचे अंतर ८ कि.मी.आहे. येवतेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर या धरणाचे सौंदर्य अनुभवयास मिळते.
धोम धरण
सन १९७८ मध्ये १३.५० टीएमसी क्षमतेचे हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात.
Click here to add your own text