स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले. १८७० साली त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले. शाळेत असतांनाच अभ्यासाबरोबर विवेकानंदांनी बलोपासनाही केली बालपणात स्वामी विवेकानंदांमध्ये स्वभाषाभिमान होता, हे दर्शवणारा एक प्रसंग. इंग्रजी शिक्षणाच्या वेळी त्यांनी “ही गोर्यांची म्हणजे जेत्याची भाषा मी मुळीच शिकणार नाही.” असे म्हणून सुमारे ७-८ महिने ती भाषा शिकण्याचेच नाकारले. पुढे नाईलाजास्तव ते इंग्रजी शिकले. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी `तत्त्वज्ञान’ या विषयात एम्.ए. केले.
गुरुभेट व संन्यासदीक्षा
नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.” एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही.” श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय ? होणार नाही ? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना
श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे राहू लागले.
स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेली सर्वधर्मपरिषद शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना
एके दिवशी रात्री अर्धवट जागे असतांना स्वामी विवेकानंदांना एक अद्भुत स्वप्न पडले. श्री रामकृष्ण ज्योतिर्मय देह धारण करून समुद्रावरून पुढे जात आहेत व स्वामीजींना आपल्या मागे येण्यास खुणावत आहेत. क्षणार्धात स्वामीजींचे डोळे उघडले. त्यांचे हृदय अवर्णनीय आनंदाने भरून आले. त्याबरोबरच त्यांना `जा’, अशी देववाणी सुस्पष्टपणे ऐकू आली. परदेशी जाण्याचा संकल्प दृढ झाला. एकदोन दिवसांतच प्रवासाची सारी तयारी पूर्ण झाली.
धर्मपरिषदेसाठी रवाना
३१ मे १८९३ रोजी `पेनिनशुलर’ बोटीने मुंबईचा किनारा सोडला. १५ जुलैला कॅनडातील व्हँकुव्हर बंदरात येऊन स्वामीजी पोहोचले. तेथून आगगाडीने अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो महानगरात आले. आयोजित धर्मपरिषद ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांना समजले. धर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले परिचयपत्र त्यांच्याजवळ नव्हते. त्यात पुन्हा प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवण्याची मुदतही उलटून गेली होती. परदेशात स्वामीजी जेथे कुठे जात, तेथे त्यांच्याकडे लोक आकृष्ट होत. पहिल्याच दिवशी हार्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रा. जे.एच्. राईट हे स्वामीजींशी चार तास बोलत बसले. स्वामीजींच्या प्रतिभेने व बुद्धीमत्तेने ते इतके मुग्ध झाले की, धर्मपरिषदेत प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळवून देण्याची सारी जबाबदारी त्या प्राध्यापकांनी स्वत:वर घेतली.
शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचा सहभाग
श्रेष्ठतम अशा हिंदु धर्माची ओळख या सुवर्णभूमीतील सत्पुरुषाने जगाला करून देणे हा दैवी योगच होता. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद हिंदु धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्मपरिषदेचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर मध्यभागी अमेरिकेतील रोमन कॅथलिक पंथाचे धर्मप्रमुख होते. स्वामी विवेकानंद हे कोणत्याही एका विशिष्ट पंथाचे प्रतिनिधी नव्हते. ते सार्या भारतवर्षातील सनातन हिंदु वैदिक धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली अगोदरच तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते. स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. शेवटी गुरूंचे स्मरण करून स्वामीजी आपल्या जागेवरून उठले. `अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले. त्यांच्या चैतन्यपूर्ण आणि ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. या शब्दांत अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी ते शब्द उच्चारताच हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागीच उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. लोकांचा हर्षध्वनी आणि टाळया थांबता थांबेनात. स्वामीजींच्या त्या भावपूर्ण शब्दांतील जिव्हाळयाने सार्या श्रोत्यांची हृदये स्पंदित झाली. `भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सार्या मानवजातीला आवाहन करणारे स्वामी विवेकानंदच एकमेव वक्ते होते.
“हिंदु समाज पददलित असेल; पण घृणास्पद नाही. तो दीन असेल, दु:खी असेल; पण बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो जगद्गुरु होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे.” अशा शब्दांत हिंदु धर्माची महती वर्णन करून अनेक शतकांनंतर स्वामी विवेकानंदांनी हिंदु समाजाला त्याच्या सीमा किती विस्तृत आहेत, हे दाखवून दिले. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदानालस्ती किंवा टीका केली नाही. कोणत्याही धर्माला त्यांनी क्षुद्र म्हटले नाही. परकीयांकडून देण्यात आलेली घृणास्पद वागणूक व अपमान यांचा चिखल उडालेल्या हिंदु धर्माला त्यांनी तेथून बाजूला काढले आणि त्याच्या मूळ तेजस्वी रूपासह जागतिक सर्वधर्मपरिषदेत सर्वोच्च आसनावर विराजमान केले. या परिषदेत हिंदुस्थानाबद्दल बोलतांना ते म्हणतात, “हिंदुस्थान ही पुण्यभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, हे निखालस सत्य आहे. ज्याला अंतर्दृष्टीचे व आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ते म्हणजे हिंदुस्थान होय ! प्राचीन काळापासून इथे अनेक धर्मसंस्थापकांचा उदय झाला. त्यांनी परमपवित्र व सनातन अशा आध्यात्मिक सत्याच्या शांतीजलाने लाही-लाही होणार्या जगाला तृप्त केले आहे. जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्त याच भूमीत अनुभवता येतो.”
प्रवचनांद्वारे प्रसारकार्य
परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. `माझ्या मोहिमेची योजना’, `भारतीय जीवनात वेदान्त’, `आमचे आजचे कर्तव्य’, `भारतीय महापुरुष’, `भारताचे भवितव्य’ यांसारख्या विषयांवर त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानांतून आपली मते वेळोवेळी ओजपूर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदान्ताच्या वैश्विक वाणीचा प्रचार केला होता. त्यामुळे आर्यधर्म, आर्यजाती, आर्यभूमी यांना जगामध्ये प्रतिष्ठा लाभली.
`परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’, हे वचन सार्थ !
भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला व निद्रिस्तांना गदागदा हालवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या अभिनिवेशाने समाजातील निष्क्रीयतेवर प्रहार करत आणि आपल्या देशबांधवांना जागे होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. निराकार समाधीत मग्न रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खाचा ऐहिक पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व `परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’, हे वचन सार्थ केले.
मी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.
मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल –
- त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .
- निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .
- भारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.
- पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी व हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन व प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंदआहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी`आंतरराष्ट्रीय युवकदिन’ साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्म यांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी आजही स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे, याची जाणीव भारतवासीयांना व्हावी, यासाठीच हा लेखप्रपंच !