तात्या टोपे
(? १८१४–१८ एप्रिल १८५९). इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी दोन भिन्न मते आहेत :
(१) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे.
(२) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले.
त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
त्याने १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.
उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला; परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला.
शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले; परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्याचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.
याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेला; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.
१० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्याचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्याची व रावसाहेबाची गाठ पडली. इंग्रज त्याच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले.
इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.