ठाणे जिल्हा

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

ठाणे

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवी, मोर, ससे, कोल्हे, रानडुक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 कि.मी. जंगलापैकी 40 किलोमीटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. येथे विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्र आहे. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी येऊर एक उत्तम ठिकाण आहे.
कसे पोहोचाल?
ठाणे शहरातील उपवन येथून येऊरकडे जाणारा रस्ता आहे. ठाणे रेल्वे स्थानकालगत येऊरकडे जाणारी बस ठरावीक अंतराने सुटते. पाटोणपाड्यापार्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते.

अंबरनाथचे शिवमंदिर

शिलाहार राजा शिवभक्त असल्याने त्यांनी 12 शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख सापडतो. त्यातील अनेक मंदिरे आता भग्न अवस्थेत असली तरी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देत उभे आहे. मंदिरातील शिलालेखातील उल्लेखानुसार इ.स. 1050 मध्ये या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. गेल्या वर्षी या मंदिराने 953 व्या वर्षात पदार्पण केले. या मंदिरावरील अप्रतिम कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
कसे पोहोचाल?
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून पूर्व विभागात मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.

माळशेज घाट

कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून ते विकसित होत आहे. एम.टी.डी.सी. आणि वन विभागाने घाट परिसरात विकास कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पर्यटकांना सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
कसे पोहोचाल?
कल्याणहून माळशेजमार्गे पुणे अथवा नगर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस नियमित उपलब्ध आहेत. कल्याणहून अडीच तासात माळशेजला येता येते.

वसई किल्ला

पोर्तुगिजांच्या दृष्टीने गोव्याला जितके महत्त्व आहे तितकेच वसई किल्ल्यालाही आहे. वसई किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. अनेक इमारती, तटबंदी, बुरूज पेक्षणीय आहेत.
कसे पोहोचाल ?
पश्चिम रेल्वेवर वसई स्टेशन असून स्टेशनलगतच किल्ल्यावर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस तसेच रिक्षांची सोय आहे.

केळवा समुद्र

पालघर जिल्ह्यातील केळवे हा समुद्र किनारा पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडतो. मुंबईच्या जवळ असूनही शांत व स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आहे. या परिसरात मिठागरे, केळीच्या बागा नजरेस पडतात.
कसे पोहोचाल?
केळवे हे मुंबई डहाणूरोड या उपनगरी रेल्वे मार्गावरील केळवे रोड या स्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे.

स्रोत – महान्युज

धार्मिक स्थळे

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. महागणपती मंदिर व विठ्ठल मंदिर यामुळे माहात्म्य प्राप्त झालेले एक यात्रास्थान आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस ‘विवाहविनायक’ असे म्हटले जाते.

कसे पोहचाल ?

रेल्वे

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते.

बससेवा

स्टेशनपासून हे गाव थोडे दूर आहे. तेथे बससेवा उपलब्ध आहे. सदरचे मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी स्टेशनपासून रिक्षा किंवा घोडागाडीचा उपयोग होतो.

शिवमंदिर – अंबरनाथ

शिवमंदिर - अंबरनाथ

इ.स. 1060 साली चित्राराजा यंानी या मंदिराची स्थापना केली. व हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “अंबरनाथचे शिवमंदिर”. अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे.

कसे पोहचाल ?

रेल्वे

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदीर जवळ आहे.

वज्रेश्वरी

वज्रेश्वरी भिवंडी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. येथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्‍यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते.

कसे पोहचाल ?

रेल्वे

जवळचे रेल्वे स्टेशन – वसई (वेस्टर्न रेल्वे )

बस

ठाणे आणि वसई हून वज्रेश्वरी ला बसेस ये -जा करतात.

हाजी मलंगगड

हाजी मलंगगड कल्याण

ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोग होतो.

कसे पोहचाल ?

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन – कल्याण ( सेंट्रल रेल्वे )

बसने

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.