नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ – ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.
अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत.
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत.
त्यांच्या काही कादंबर्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.