• आनंद यादव

    आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ – २७ नोव्हेंबर, इ.स. २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

  • आशा बगे

    आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

    आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.

    आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

    आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

  • कमल देसाई

    कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ – १७ जून २०११) या मराठीतील एक प्रयोगशील लेखिका आणि मराठीच्या अध्यापिका होत्या.

    त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी येथे झाला.मिरजेत त्यांचे वडिलोपार्जित घर होते. त्यांचे बालपण व सुरुवातीचे शिक्षणही तिथेच झाले. पुढे एम.ए.च्या शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली, आणि त्यांच्या कथा सत्यकथेत छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठीचे अध्यापन केले, पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत. जया दडकर, समीक्षक रा. भा. पाटणकर, विश्वास पाटील, दुर्गा भागवत, अशोक शहाणे अशांशी त्यांची मैत्री जमली होती, आणि या सगळ्यांशी त्यांच्या साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद, मिथक या विषयांसंदर्भात गप्पा होत असत.

    देव, धर्म, आणि एकूण विश्व या विषयावर प्रामुख्याने त्यांनी लेखन केले आहे. लैंगिकता या विषयावर पुरुषी दृष्टिकोनाचे वर्चस्व हाही त्यांच्या लेखनाचा एक विषय असे.

    कमल देसाई यांच्या कथालेखनाची समीक्षा करणारा ’कमल देसाई यांचे कथाविश्व’ हा ग्रंथ रा.भा. पाटणकर यांनी लिहिला आहे.

  • गौरी देशपांडे

    गौरी देशपांडे

    गौरी देशपांडे

    गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ – मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.

  • जयवंत दळवी

    जयवंत द्वारकानाथ दळवी (१४ ऑगस्ट, इ.स. १९२५ – १६ सप्टेंबर, इ.स. १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

  • जी. ए. कुलकर्णी

    गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ “‘जी.ए.'”(जुलै १०, इ.स. १९२३ – डिसेंबर ११, इ.स. १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म जुलै १०, इ.स. १९२३ रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन डिसेंबर ११, इ.स. १९८७ रोजी झाले.

  • पु. भा. भावे

    पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० – ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक होते. त्यांच्या लेखनात हिंदुत्ववादी विचारसरणी होती. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे.

  • पु.ल.देशपांडे

    पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ – जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.

    गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले

  • प्रकाश संत

    प्रकाश नारायण संत (जन्म : जून १६,१९३७ – मृत्यू : जुलै १५,२००३) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. “लंपन” या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात. प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील नारायण संत हे उत्तम ललितलेखक होते आणि आई इंदिरा संत या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

    पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून भूरचनाशास्त्रात बी.एस्‌सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस्‌सी. व पीएच.डी. केले. यानंतर ते कर्‍हाड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) म्हणून १९६१ साली रुजू झाले.

  • प्रिया तेंडुलकर

    प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ – सप्टेंबर १९, इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणार्‍या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

    प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

    प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची ‘रजनी’ ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर ‘दामिनी’ या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

  • भास्कर चंदनशिव

    भास्कर तात्याबा चंदनशिव (जन्म :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय.

    त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.

  • मिलिंद बोकील

    मिलिंद बोकील (जन्मदिनांक अज्ञात – हयात) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या “छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

    मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

    मिलिंदे बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी – विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

  • मेघना पेठे

    मेघना पेठे या मराठी कादंबरी व कथाकार आहेत.

    त्यांनी आपल्या लेखनाची सुरूवात कवितांनी केली पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा व कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

  • रणजित देसाई

    रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ – मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

  • रा.रं. बोराडे

    रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील एक लेखक आहेत. इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ’पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहे.

  • व. पु. काळे

    वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ – जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

  • विजया राजाध्यक्ष

    डॉ. विजया राजाध्यक्ष (५ ऑगस्ट इ.स. १९३३ – हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.

    विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी…नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्‍नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले आहे.

  • शंकर पाटील

    शंकर पाटील (८ ऑगस्ट, १९२६:पट्टण-कोडोली, हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत – १८ ऑक्टोबर , इ.स. १९९४) हे मराठी कथाकार होते. पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली गावी झाला. त्यांचे शिक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथे झाले. कोल्हापुरातील विद्यापीठातून त्यांनी बी.ए., बी.टी. पदव्या मिळवल्या. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून काम केले. इ.स. १९८५ सालातील नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

  • शिवाजी सावंत

    शिवाजी गोविंदराव सावंत (ऑगस्ट ३१, १९४० – सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

    मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

    ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.

    शिवाजी सावंत यांची कादंबर्‍यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत.

    सानिया

    निया या मराठीतील एक कथालेखिका आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळत आशयघन आणि प्रयोगशील असे लेखन त्यांनी केले आहे.

    १९६८ साली ’हरवलेली पाऊलवाट’ ही त्यांची पहिली कथा ’श्री’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते१९७५ या काळात सानियांच्या कथा ’स्त्री’, ’मनोहर’, ’किर्लोस्कर’, ’युगवाणी’ आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. सन १९७५नंतर ’सत्यकथा’, ’मौज’ या मासिकांतून केलेले त्यांचे कथालिखाण लक्षणीय ठरले. पुढे ’हंस’, ’दीपावली’, ’साप्ताहिक सकाळ’, ’मिळून सार्‍याजणी’, ’माहेर’, ’कालनिर्णय’, ’अक्षर, ’अनुभव’ आदी नियतकालिकांमधून सानियांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इ.स. २०१४पर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

  • सुनीता देशपांडे

    सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्नागिरी, महाराष्ट्र – नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

    पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच ‘वंदेमातरम्’ या राम गबालेदिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. ‘नवरा बायको’ या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. ‘राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या ‘सुदर मी होणार’ मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

  • सुमति क्षेत्रमाडे

    डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे’ (२७ फेब्रुवारी, १९१६: झापडे, लांजा तालुका, रत्नागिरी, महाराष्ट्र – ८ ऑगस्ट, १९९८ , कोल्हापूर, महाराष्ट्र) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यां स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल लिहीत असत. त्यांनी मराठी व गुजराती भाषेत विपुल लेखन केले. या व्यवसायाने डॉक्टर होत्या.

    क्षेत्रमाडे यांचा जन्म लांजा तालुक्यातील झापडे गावी इ.स. १९१५ साली झाला. १९३५ मध्ये डॉक्टर झाल्यावर त्यांचे वास्तव्य बडोद्याला होते. इ.स. १९४५ साली वैद्यकीय शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या व नंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन त्यांनी वैद्यकव्यवसाय केला. त्यांची पहिली कांदबरी आधार दवाखान्यातील वातावरणावर आधारीत होती.

  • सुहास शिरवळकर

    सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

    १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंघांच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘देवकी’ या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर ‘दुनियादारी’, ‘कोवळीक’ या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.

    .

  • भास्कर चंदनशिव

    भास्कर तात्याबा चंदनशिव (जन्म :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय.

    त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.

    .

  • बाबुराव बागुल

    बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० – मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोहीभाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

    .

  • जी.ए.कुलकर्णी

    गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ “‘जी.ए.'”(जुलै १०, इ.स. १९२३ – डिसेंबर ११, इ.स. १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जातात.

    .