महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

अहमदनगर

शिर्डीचे साईबाबा

‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा व सबुरी’ म्हटलं की, डोळ्यांसमोर साईबाबांची मूर्ती उभी राहते. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांचे वास्तव्य होतं. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरलेली साईबाबांची शिर्डी जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव, श्रीगुरुपौर्णिमा उत्सव, श्री पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सव साजरे केले जातात. समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान, लेंडीबाग, संग्रहालय (म्युझियम) ही ठिकाणेही प्रेक्षणीय आहेत.
कसे पोहोचाल?
शिर्डी येथे जाण्यासाठी राज्याच्या सर्व भागातून एसटी बसेस उपलब्ध आहेत.

शनीचे शिंगणापूर

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारं नाहीत, असं वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे शनीचे शिंगणापूर.
अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनिशिंगणापूर हे राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. अहमदनगरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यातील शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
श्रीक्षेत्र शिंगणापूरला कसे जावे?
पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेले शिंगणापूर नगरपासून 40 तर औरंगाबादपासून 75 किलोमीटर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन राहुरी हे आहे. तसेच बेलापूर -औरंगाबाद- अहमदनगर रेल्वे स्थानकावरही उतरता येते.

धुळे

किल्ले लळिंग

पूर्व- पश्चिम असलेल्या गाळणा टेकड्यांवर लळिंग किल्ला आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याची टाकी, धान्यकोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
कसे पोहोचाल?
धुळे- नाशिक मार्गावर, धुळे शहरापासून दक्षिणेला 9 किलोमीटरवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातून किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणत: एक तासाचा कालावधी लागतो.

समर्थ वाग्देवता मंदिर

धुळे शहरातील तत्कालीन प्रसिद्ध वकील शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी श्री समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली आहे. देव यांनी 1893 मध्ये सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना केली. सभेच्या माध्यमातून 1935 मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना झाली. समर्थ भक्तांची पंढरी म्हणून हे मंदिर ओळखले जाते. येथे विविध भारतीय भाषेतील 100 ते 600 वर्षांपूर्वीचे दस्तऐवज संग्रहित आहेत. समर्थांनी लिहिलेले वाल्मिकी रामायण हे या संग्रहातील मोलाचा ठेवा म्हणावा लागेल. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभुर्णे पुरण (ता.शहादे) येथे सापडलेली सतराव्या शतकातील आणि जयदेवाने साकारलेल्या गीतगोविंद या दोनशे पानांच्या मूळ ग्रंथाची प्रत येथे पाहावयास मिळते.
कसे पोहोचाल?
धुळे शहरात असून एसटी बसेस उपलब्ध आहेत.

नंदुरबार

तोरणमाळ

महाबळेश्वरनंतरचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ या जिल्ह्यात आहे. सात खेड्यांनी बनलेला हा परिसर नंदुरबारपासून सुमारे 90 कि.मी. अंतरावर आहे. अक्राणी तालुक्यातील डोंगराळ भागात हे ठिकाण असून समुद्रसपाटीपासून 1143 मी. उंचीवर वसलेले आहे. प्राचीन काळी मांडू घराण्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते, तसेच हे नाथ संप्रदायाचे पवित्र स्थळ असून येथे गोरक्षनाथांचे मंदिर व मच्छिंद्रनाथांची गुंफा आहे.
कसे पोहोचाल?
नंदूरबारपासून सुमारे 90 कि.मी. अंतरावर असून एसटी बसेस उपलब्ध आहेत.

गरम पाण्याचे झरे, उनपदेव

शहादा तालुक्यात उनपदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कडक थंडीच्या काळातही हे झरे आटत नाहीत. श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणामुळे हे झरे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील फत्तेपूर किल्ला व अक्का राणीचा किल्ला प्रसिद्ध आहे.
कसे पोहोचाल?
नंदूरबारपासून 40 कि.मी.अंतरावर असून शहादापासून 25 कि.मी.अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.

स्रोत – महान्युज