नेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती. पण शेटजी फार दु:खी होते. कारण त्यांना मूलबाळ नव्हते. लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले, तरी झोपडीला वेगळीच शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले, तर त्यापेक्षा वनवास बरा ! तिमशेट मनात कुढत असे.
तिमशेट वाणी शिवाचा परमभक्त होता. रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे. भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच. हा नेहमीचा अनुभव.
एके रात्री तिमशेट वाणी शिवाच्या चिंतनात मग्न असताना त्याच्या समोर एकदम प्रकाश पसरला. शेटजीने डोळे उघडले. पाहतो तो काय ? वाण्याने भगवतीला नमस्कार केला. देवी म्हणाली, ‘‘भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत. तुला अपत्य हवे ते माग.’’
वाणी म्हणाला, ‘‘मला अपत्य हवे.’’
देवी म्हणाली, ‘‘डोळे झाकून घे.’’
शेटजीने डोळे झाकून घेतले.
स्वत: आदिशक्तीने लहान बालिकेचे रुप घेतले आणि ती रडू लागली. तिमशेटाने डोळे उघडले. पाहतो तो काय ?
समोर एक सुंदर बालिका होती.
चटकन तिमशेटाने तिला उचलले. परमेश्वराने हा कन्यारुपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे लालनपालन करु लागला. त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले.
म्हाळसा लहानाची मोठी झाली. तिमशेटाला, तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली, ‘‘बाबा, ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्याचे मीही चिंतन करते, तोच भगवान शिव माझा पती आहे. प्रभू मल्हारी–मार्तंड–भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत. ते येतील. माझे पाणिग्रहण करतील.’’
तिमशेटला हे ऐकून आश्चर्य वाटले. त्याला धन्यधन्य वाटले !
काही दिवस गेले.
तिमशेट वाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रुप घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये. तेथे पौष पोर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करीन.’’
वाण्याला मोठा आनंद वाटला. त्याने मोठी तयारी केली. सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला.
मार्तंडभैरवही देवगणांसह आले. तेथे मार्तंडभैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौषी पोर्णिेमेला झाला.
आज या ठिकाणी ‘‘दोन शिवलिंगे’’ एकत्र दिसतात. येथे शिव–शक्ती एकत्र आली.
‘‘पौष पोर्णिमेस’’ पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो.