महाबली हनुमानाने केले भिमाचे गर्वहरण
एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती.
भीम : ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे.
माकड : मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर.
भीम : घाणेरड्या शेपटीला मी हात लावूकाय ? उचल ती लवकर.
माकड : बरं, मग असंकर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर.
भीम : माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर ?
माकड (किंचित हसून) : आणि तुझी गदाच तुटली तर ?
म्हातारे माकड थट्टा करत असल्याचे पाहून रागावलेल्या भिमाने गदेने शेपटी हलवणे आणि सगळी शक्ती लावूनही शेपटी तसूभरही न हलणे : एक म्हातारे माकड आपली थट्टा करत आहे, ते पाहून भिमाला राग आला. त्याने रागाने शेपटीला गदा लावली; पण शेपटी हलेना. त्याने शेपटीखाली गदा घातली; पण तो शेपटी उचलू शकेना. उडवून देऊ शकेना. त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला. तो घामाघूम झाला; पण शेपटी हलेना. मग त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला गदा काढताही येईना.
आता भिमाचे डोळे उघडले. हे सामान्य माकड नाही, हे त्याच्या लक्षात आले.
भीम (नम्रपणे) : महाराज, आपण कोण आहात ?
माकड : मी श्रीरामभक्त हनुमान आहे.
भिमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भिमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मला क्षमा करा. हनुमानाने भिमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला.