फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता. तो फार दयाळू आणि न्यायी होता. साहाय्यासाठी कुणी आले, तर राजा त्याला साहाय्य केल्याविना रहात नसे.
एकदा एक कबुतर उडत–उडत शिबी राजाच्या समोर आले. ते भीतीने थरथर कापू लागले. शिबीने प्रेमाने त्याला जवळ घेतले.
तेवढ्यात एक क्रूर ससाणा उडत–उडत तेथे आला. तो शिबीला म्हणाला, ‘‘महाराज, माझे कबुतर मला द्या. शिबी म्हणाला, ‘‘हे कबुतर माझ्या आश्रयाला आले आहे. ते मी तुला दिले, तर तू त्याला खाऊन टाकशील. त्यामुळे मला पाप लागेल.” ससाणा म्हणाला, ‘‘मला फार भूक लागली आहे. हे कबुतर माझे अन्न आहे. ते अन्न तुम्ही लुबाडले, तर मी मरून जाईन. त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार ?”
राजा म्हणाला, ‘‘तू दुसरे कोणतेही अन्न माग मी देईन. ससाणा म्हणाला, ‘‘ठीक आहे. त्या कबुतराच्या वजनाइतके मांस तुमच्या शरिरातून कापून द्या.”
राजाने ते मान्य केले. तराजूच्या एका पारड्यात कबुतर ठेवले आणि स्वतःच्या शरिरातील थोडे मांस कापून दुसर्या पारड्यात ठेवले; पण काय आश्चर्य ! कितीही मांस कापून टाकले, तरी कबुतराचे पारडे जडच होते.
शेवटी राजा स्वतःच पारड्यात बसू लागला. प्रत्यक्षात अग्निदेवाने कबुतराचे आणि इंद्राने ससाण्याचे रूप घेतले होते. दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली आणि आपल्या खर्या रूपात ते राजासमोर उभे राहिले.
दोघांनी राजाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, “राजा, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस.”