भारतीय संविधान निर्मिती( Constitution Day)

२६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५०…. भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे दोन दिवस. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन २६ नोव्हेंबरहा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

 

घटनेचा प्रवास 

घटनेचा प्रवास हा अत्यंत खडतर असा झाला आहे. ब्रिटीश पंतप्रधानांनी स्वतंत्र होत असलेल्या भारतासाठी घटना असावी, यासाठी पुढाकार घेतला ९ डिसेंबर १९४६ रोजी. घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. समितीत ३८९ सदस्य होते. फाळणीनंतर २९२ सदस्यसंख्या झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या. १३ फेब्रुवारी १९४७ रोजी या समितीने घटनेचा मसुदा अध्यक्षांना सादर केला. पुढं हा मसुदा जनतेच्या विचारार्थ खुला ठेवण्यात आला. 

घटनेचा मसुदा आणि चर्चा 
भारतीय जनतेनं मसुदा समितीला सात हजार ५३५ सूचना सादर केल्या. त्यातील काही सूचना रद्द ठरवून दोन हजार ४७३ सूचनांवर सविस्तरपणे चर्चा घडविण्यात आली आणि त्या रास्त सूचना स्वीकारण्यात आल्या. ही चर्चा १४४ दिवस चालली. ४ नोव्हेंबर १९४९ रोजी चर्चेची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा सुधारित मसुदा तयार करून समितीनं २५ नोव्हेंबरला सादर केला. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समितीसमोर समारोपाचे भाषण झालं. २६ नोव्हेंबर रोजी घटना समितीने या सुधारित मसुद्याला मान्यता दिली व तो स्वीकारण्यात आला. अशारितीनं राज्यघटना समितीची प्रक्रिया पूर्ण झाली. २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. २ वर्षे ११ महिने १२ दिवस या प्रदीर्घ कालावधीत घटना समितीचं कामकाज चालले.

बिहारी नारायण रायजादा 
भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यानंतर संविधान लिहीण्यासाठी त्यांना संविधान हॉलमधील एक खोली देखील देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले. या कामासाठी रायजादा यांना मानधन किती घेणार अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी ते घेण्यास नकार दिला. परंतु संविधानाच्या प्रत्येक पानावर त्यांचं नाव व शेवटच्या पानावर त्यांच्या आजोबांचं नाव असेल अशी अट ठेवली होती. 

आचार्य नंदलाल बोस 
आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे. 

सर्वात मोठे लिखित संविधान 
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.