डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८ – हयात) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. जयंतरावांनी दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविला होता. त्यांना संस्कृतमध्येदेखील रस होता. १९व्या वर्षीच ते बी.एस्सी. पदवी प्राप्त करून केंब्रिजला गेले व रँग्लर झाले. (केंब्रिज विद्यापीठात गणित विषयात विशेष यश प्राप्त केल्यानंतर रँग्लर ही पदवी मिळते.) १९६० साली पीएच.डी. चे उच्च शिक्षण त्यांनी डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ह्या गुरू-शिष्य जोडीने विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिद्धांत सिद्ध केला. विश्व स्थिर असले, तरी ते आकुंचन-प्रसरण पावते. पण एकूणच ते विकसनशील आहे , प्रसरण पावत आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला. भारत सरकारने या संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. डॉ. नारळीकर यांच्या गुरूत्वाकर्षाणाबद्दलच्या संशोधनालाही जगमान्यता मिळाली.
१९७२ मध्ये भारतात परतून ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संशोधन, अध्यापन यांबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे या गोष्टीही ते महत्त्वाच्या मानतात. अनेक लेख,कथा-कादंबर्‍या लिहून; व्याख्याने, चर्चासत्रे, ब्रह्मनादसारखी दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान लोकप्रिय केले. विज्ञानातील सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत.
स्थिर स्थिती सिद्धान्त,डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

विज्ञानकथा पुस्तके
• अंतराळातील भस्मासुर
• अभयारण्य
• चला जाऊ अवकाश सफरीला
• टाइम मशीनची किमयामुख्यपृष्ठ
• प्रेषित
• यक्षांची देणगी
• याला जीवन ऐसे नाव
• वामन परत न आला
• व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
• आकाशाशी जडले नाते
• गणितातील गमतीजमती
• नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
• नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
• Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
• युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
• विश्वाची रचना
• विज्ञान आणि वैज्ञानिक
• विज्ञानगंगेची अवखळ वळणे
• विज्ञानाची गरुडझेप
• विज्ञानाचे रचयिते
• Seven Wonders Of The Cosmos
• सूर्याचा प्रकोप
आत्मचरित्र
• चार नगरांतले माझे विश्व

१९८८ मध्ये खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. मुलांविषयी डॉ. नारळीकरांना विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत.
अवघ्या २७व्या वर्षी राष्ट्रपतींकडून पद्मभूषण, २००४ मध्ये पद्मविभूषण, संशोधन कार्याबद्दल भटनागर पुरस्कार, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, फाय फाउंडेशन, बिर्ला पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार-असे सुमारे ६५ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध संस्थांची मानद फेलोशिप त्यांना मिळाली आहे.