नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.
त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते.. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता

१९५५ साली नांदेडच्या प्रतिभा निकेतनमधून त्यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. पुढे १९६३ साली नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इतिहास, संगीत, संस्कृत, काव्यशास्त्र, साहित्य या विषयांवरील संशोधनास अनौपचारीक मार्गदर्शनही केले. पीपल्स कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांचे गुरू भालचंद्र महाराज कहाळेकर यांचा त्यांच्या जडणघडणीत विशेष वाटा होता. कहाळेकर हे मार्क्सवादी राष्ट्रभक्त होते आणि ते मराठी भाषेचे प्राध्यापक होते. ‘कशाचा विचार करावा, यापेक्षा कसा विचार करावा हे त्यांनी मला शिकवले’ हे कुरुंदकर मोठ्या कृतज्ञतेने सांगत असत. विचारवंत म्हणून त्यांच्या मनाची व स्वभावाची जडणघडण होण्यात आचार्य जावडेकर, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, विल ड्युरंट, बटर्‌रड रसेल या व्यक्तिमत्त्वांचा व त्यांच्या लिखाणाचा प्रभाव होता. मार्क्सवादी विचारांचा कुरुंदकरांवर विशेष प्रभाव होता. ‘सामाजिक व्यवस्थेचे मूळ ‘अर्था’ मध्ये म्हणजेच संपत्तीत आहे’ असा कुरुंदकरांचा विश्वास होता. ते म्हणतात, ‘जडवादी वा भौतिक विचार हा अन्य कोणत्याही विचारांपेक्षा अधिक प्रभावी असतो.’ परंतु त्यांनी अत्याधिक आदर्शवादाचा विचार कधीही मांडला नाही. विचारवंतांनी मांडलेले विचार वास्तवात अंमलात आणणे शक्य झाले पाहिजे असा त्यांचा विश्र्वास होता. म्हणूनच आपल्या ‘जागर’ या पुस्तकात त्यांनी प्रगतीवादी आणि आदर्शपणाच्या गप्पा मारणार्‍या आणि वास्तवात तसे न वागणार्‍या शक्तींच्या दिखाऊपणाचा, दंभाचा बुरखा फाडला आहे.
आचार्य कुरुंदकरांनी भूषविलेल्या अनेक भूमिकांपैकी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे परिणामकारक वक्ता! एक प्रभावी वक्ता म्हणून ते समाजाच्या सर्व स्तरातील, सर्व वयोगटाच्या लोकांमध्ये अधिक परिचित आणि लोकप्रिय होते. त्यातही सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सॉक्रेटिसप्रमाणे ते नेहमीच तरुणाईने वेढलेले असत. अनेकानेक कठीण विषयांचे सहज सोप्या शब्दांत विश्र्लेषण करणे, विषय कितीही गंभीर असला, तरी हास्य विनोदांची पेरणी, बुद्धिचातुर्य, उपरोध यांचा खूबीने वापर करत सभा नेहमी जागृत ठेवणे हे त्यांच्या वक्तृत्व शैलीचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. याच शैलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय-विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले.

राष्ट्रसेवा दल या संघटनेत त्यांचा आयुष्यभर सक्रिय सहभाग होता. ‘राष्ट्रसेवा दलाच्या वैचारिक बांधणीत कुरुंदकरांचा सिंहाचा वाटा होता’ या यदुनाथ थत्ते यांच्या विधानावरून राष्ट्रसेवा दलातील त्यांच्या कार्याची कल्पना येते. ‘वाटा तुझ्या माझ्या’ हे आचार्यांचे सूत्रबद्ध प्रश्नोत्तर स्वरूपातील पुस्तक म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या ज्ञान प्रसाराच्या कार्यास दिलेले महत्त्वाचे योगदान आहे.

लेखन आणि वाचन हे आचार्य कुरुंदकरांचे आवडते छंद होते, किंबहुना हेच त्यांचे जीवन होते. मराठी साहित्य विश्वाला- विशेषत: समीक्षेला- त्यांनी आपल्या लिखाणातून एक नवीन दिशा दिली. मराठी कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक साहित्य, ललित लेखन, दलित साहित्य अशा अनेक विषयांवर त्यांनी मांडलेले मौलिक समीक्षात्मक विचार हे खरोखरच मराठी साहित्यातील मैलाचा दगड आहेत. आचार्य कुरुंदकरांशिवाय `मराठी साहित्य समीक्षा’ या विषयाचा विचारच होऊ शकत नाही. रूपवेध (१९६३) हा त्यांचा स्वतंत्ररित्या लिहिलेल्या मौलिक समीक्षापर लेखांचा संग्रह आहे. यास मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून शासनाकडून गौरव प्राप्त झाला आहे. धार आणि काठ (१९७१) या ग्रंथात त्यांनी मराठी कादंबरीचा विकास आणि उत्कर्षाचा सर्वंकष आढावा घेतला असून, मराठी कादंबरीच्या अभ्यासासाठी तो एक परिपूर्ण ग्रंथ मानला जातो. पायवाट (१९७४) या पुस्तकामध्ये त्यांचे मराठी समीक्षा, कविता आणि नाटक ह्या सर्व वाङ् मय प्रकारांवरील समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

मराठी साहित्य आणि आचार्य कुरुंदकर हे एक अविभाज्य अन् अजोड समीकरण! महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते वर्षानुवर्षे सक्रिय कार्यकर्ते होते. विदर्भ, मुंबई, बडोदा या ठिकाणी झालेल्या प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य पुरस्कार समितीच्या सदस्य पदावरही त्यांनी काम केले. त्याचबरोबर साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट इत्यादी संस्थांच्या उपक्रमांशी महाराष्ट्राचे-विशेषत: मराठवाड्याचे-प्रतिनिधी म्हणून ते जोडलेले होते.दलित चळवळीस मार्गदर्शन करणार्‍या दलित नेत्यांनाही ते ‘चळवळ पूरक’ मार्गदर्शन करत असत. तथाकथित सवर्ण व वर्णव्यवस्थेतील अनेक स्तरांतील अन्य घटक-जाती-जमाती यांच्यामध्ये आचार-विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी यथाशक्ति कार्य केले, लेखन केले. त्यांच्या भजन (१९८१) या पुस्तकातील विविध लेखांमधून त्यांनी दलित साहित्य आणि तत्कालीन सामाजिक समस्यांचा मागोवा घेतला आहे. तसेच त्यांच्या मनुस्मृती (१९८२) या पुस्तकातून स्त्री, शुद्र यांच्यावर लादलेल्या अन्यायाचे विश्लेषण प्रखरतेने मांडले आहे. समाजातील स्त्रीचे स्थान, हिंदू-मुस्लीम संबंध हे सुद्धा त्यांच्या अभ्यासाचे, लेखनाचे विषय होते. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे ते समर्थक होते. जातीयवाद आणि जमातवादी राजकारणाचे घातक परिणाम सांगणारे शिवरात्र (१९७०) या पुस्तकातील त्यांचे विचार हे आजही अंतर्मुख करतात.

राष्ट्रवाद आणि समाजवाद ह्या संकल्पना परस्परांना पूरक आहेत असे आचार्य कुरुंदकरांचे मत होते. त्याचबरोबर ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. राष्ट्रीय आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या छाया प्रकाश (१९७५) या पुस्तकात त्यांनी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही या संबंधातील आपले विचार मांडले आहेत. राष्ट्रवाद, समाजवाद आणि लोकशाही ह्या तीन गोष्टी सर्वार्थाने जाणून घ्यायच्या असतील, तर इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. करुंदकर पठडीतले इतिहासकार नव्हते परंतु इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन यांची नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी कुरुंदकर निर्धारपूर्वक, सातत्याने कार्यरत होते.

इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी कालौघात बदलणार्‍या शब्दांच्या अर्थाशी निगडीत असलेल्या अर्थ व संकल्पना आणि प्रक्रियांचा केलेला अभ्यास होय. ह्या प्रक्रियांच्या माहितीशिवाय हा सारा अभ्यास किती अपुरा आणि एकांगी आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून सांगितले. त्यांनी इतिहासाच्या अभ्यास पद्धतीला एक नवी दिशा दिली त्यांनी लिहिलेले इतिहासपर ग्रंथ हे पुढील अभ्यासकांसाठी मार्गदर्शनपर ठरत आहेत. त्यांच्या या ग्रंथात मुख्यत्वे करून मागोवा (१९६७) – प्राचीन ऐतिहासिक लेखांचा संग्रह: जागर (१९६९) – भारतीय इतिहास, राजकारण, अर्थकारण, धर्म यांवरील प्रगल्भ विचार ; शिवराय – छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनरहस्य उलगडून दाखवणारे पुस्तक – यांचा समावेश होतो. श्रीमानयोगी या शिवरायांवरील गाजलेल्या पुस्तकाची त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही विशेष उल्लेखनीय आहे.

केवळ राजकीय इतिहास लिहिणे पुरेसे नाही तर आपण सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास, कलेचे महत्त्व व ज्ञान इत्यादी विषयी लिहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहासाबरोबरच तत्त्वज्ञान, मानवशास्त्र, धर्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचे ते गाढे अभ्यासक होते.आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात आचार्य कुरुंदकरांनी आपल्या असामान्य बुद्धी, वाक्चातुर्य, विद्वत्ता व लेखन यांच्या साहाय्याने मोलाची भर घातली. आकलन (१९८२) या ग्रंथामध्ये महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल… इत्यादी सुप्रसिद्ध नेत्यांच्या सामाजिक व राजकीय कामगिरीचा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा आढावा आचार्यांनी घेतला आहे. यातून ही व्यक्तिमत्त्वे आपल्यापर्यंत पोहोचतातच, शिवाय तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे आकलनही आपल्याला होते. वाटचाल या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून त्यांनी स्वत:च्या व्यक्तित्वासह अनेक समकालीन, प्रसिद्ध व्यक्तींची भेट आपणास घडविली आहे.

औरंगाबाद येथे एका व्यासपीठावरून बोलताना भाषणास सुरुवात करतानाच त्यांचे अकस्मात निधन झाले. एवढ्या कमी वयात अन् अचानकपणे झालेला त्यांचा मृत्यू म्हणजे महाराष्ट्राच्या विचार विश्वाला बसलेला मोठा, दुर्दैवी धक्काच होता…
तू कसलेली विचारांची शेतं, पहिली वहिली कणसं धरत होती.
अन् कणसाच्या कसदार दाण्यात, भरू लागलं होतं टचटचून दूध.
त्या दुधाच्या मुक्या हाळीनं, झेपावू लागले होते पाखरांचे थवे दाही दिशांनी… (पण)
विचारांच्या सुगीचे स्वप्न साकारत असतानाच कोसळलास.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे हे आचार्यांबद्दलचे श्रद्धांजलीपर शब्दच सर्व काही सांगून जातात.