आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात,आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.
पंचमहाभूते सांख्यदर्शनानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते.
या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर प्राचीन सांख्यदर्शन या शास्त्राचा मोठा प्रभाव आहे.
ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.
पृथ्वी- माती, दगड व त्यापासून निर्माण झालेले सर्व जड, कठीण, घन पदार्थ.
आप (जल)- पाणी, वाफ, ढग व सर्व द्रव, ओले, मृदू पदार्थ.
तेज (अग्नी)- ऊर्जा: अग्नी (क्षेपणास्त्र), किरणे, प्रारणे (Radiation), उष्णता, वीज, प्रकाश या स्वरूपात.
वायू- हवा, चैतन्य, हालचाल, चलनवलन, तरलता आणि वेग.
आकाश- अवकाश, आकाश व पोकळी.
या पंचमहाभूतांची देवस्थाने पुढीलप्रमाणे-
१.पृथ्वी- कांचिवरम
२.आप- जम्बुकेश्वर
३.तेज- अरुणाचल
४.वायू- कालहस्ती
५.आकाश- चीतम्बरम
आयुर्वेदाचा लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:
भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम्। इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः॥
दोष
सर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.
वात दोष
वात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष
कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) allergy) इत्यादी त्रास होतात.
पित्त दोष
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.
उपचारपद्धती
आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेस शमन अशे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्माना ‘शोधन कर्मे’ असेदेखील म्हटले जाते.
औषधपद्धती
आसव काढा
ज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवतात. हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..
घन
यात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी (गोळ्या ) असे म्हणतात.
चूर्ण
म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे) हे चूर्ण पाणी,तूप,मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.
तैल
यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळूवार चोळणे याकरिता करतात.
घृत
म्हणजे तूप होय. यात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.
आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन
१)शमन-औषधे देउन वाढलेले दोष कमी करणे, कमी झालेले शरीरातील घटक, दोष प्रमाणात आणणे म्हणजे शमन चिकित्सा.
२)शोधन-दोष जर प्रमाणा बाहेर वाढलेले असतील किवा कुठल्यातरी शरीर घटकाच्या(शरीर धातू) आश्रयीत (चिकटून्/दडून)असतील तर त्याना त्या पासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन चिकित्सा.