गोंधळ – गोंधळी

गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात.

वाद्यांचा उपयोग- संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, डिमडी, इत्यादी वाद्यांचा व हातातल्या दिवटीचा उपयोग केला जातो.

रंगभूषा- मुख्‍य गोंधळ्याच्‍या कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट असतो. तसेच गळ्यात कवड्यांची माळ असते.

वेशभूषा- पोषाखात झब्बा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा, मुंडासे, उपरणे इ. घटकांचा समावेश असतो.

महिलांचा सहभाग- या लोककला प्रकारामध्‍ये महिलांचा सहभाग असत नाही.

पूर्वरंग व उत्तररंग

पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागात गोंधळ सादर केला जातो. गोंधळ सुरू होण्‍यापूर्वी पाच उसांची मखर केली जाते. त्‍यामध्‍ये देवीच्‍या स्‍वरूपात घट ठेवतात आणि गोंधळाला सुरुवात होते. या विधिनाट्याची सुरुवात गणेशस्‍तुतीने होते. कुलस्‍वामिनी अंबाबाईच्‍या विविध रूपांचे गायन केले जाते. व उत्तररंगात एखादे पौराणिक, सामाजिक किंवा देवाविषयीचे आख्‍यान सादर केले जाते. शेवटी भैरवीच्‍या माध्‍यमातून समारोप होतो. आरतीने शेवट होतो.

रंगभूषा :  साधी

वेशभूषा :  चुस्त पायजमा किंवा धोतर, पायघोळ झगा

 संबळ वाजू लागतो आणि गोंधळाला सुरवात होते. देव-देवतांना गोंधळाला आवाहन दिलं जातं. वाद्य-संबळ, तुणतुणं, झांजा, टाळ अशी पारंपारिक वाद्य आहेत.

खुद्द गोंधळी आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुकेपासूनची आहे असे सांगतात. त्यासाठी ’रेणुका महात्म्य’ चा आधार देतात.  महाराष्‍ट्राच्या लोकधर्मात आणि लोकसंस्कृतीच्या घडणीत ’लोकधर्माचा पुरोहित’ असे गोंधळ्यांचे स्थान आहे. महाराष्‍ट्राची स्फ़ुर्ती देवता आणि कुलस्वामिनी भवानी देवी.  या आदिशक्तीचे उपासक आणि भगत म्हणून लोकप्रिय असणारे गोंधळी मराठी लोकसंस्कृतीचे वारसदार आहेत.

उदे ग अंबे उदे ॥

गोंधळ मांडिला देवा गोंधळा यावे

तेहतीस कोटी देवा गोंधळा ये

साती समंदरा गोंधळा ये

नवलाख तारांगणा गोंधळा ये

धरीती माते गोंधळा ये

आकाशी पिता गोंधळा ये

भक्तांच्या गणा गोंधळा ये

राहिले साहिले देवा गोंधळा ये

उदे ग अंबे उदे ।

तुळजाभवानी उदे । रेणुके अंबे उदे ॥

आई तुझं लेकरु आम्ही ।

आलो शरणं तुझ्या ग चरणी ।

हो प्रसन्न भवानी माते ॥  उदे ग अंबे उदे।

किती गाऊ आईचा महिमा ।

पडे समिंदराला सीमा ।

कसा घालावा गोंधळ ।

करावा मायेचा जयजयकार ॥ उदे ग अंबे उदे।

गोंधळ्यांचे रेणुकराई किंवा रेणुराई आणि कदमराई असे दोन प्रकार आहेत. या शिवाय महाराष्‍ट्रात मराठे, कुंभार, ब्राह्मण व अकरमासे अशा गोंधळ्यांच्या पोट जाती आहेत.

रेणुराई

रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात

 रंगभूषा :गळ्यात माहुरच्य देवीचा टाक, कवड्यांची माळ, प्रत्येकी कवडीआड एक रेशमी गोंडा, कंगणीदार पगडी, कमरेला उपरणे, पायात घुंगरु, पोत दिवटीवर, संबळाला कापडाचा गाझा, संबळ दोन काड्यांनी वाजवतात

वाद्य : संबळ, तुणतुणं

साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

 कदमराई

कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.

 गळ्यात तुळजापुरच्या देवीचा टाक, फ़क्‍त कवड्याची माळ, कवड्यांचा निमुळता शंखाच्या आकाराचा टोप, कमरेला उपरणे, पायात धुंगरु, पोत हातात, गाझा नाही, संबळ एका हाताने, एका कवडीने वाजवतात

वाद्य : संबळ, तुणतुणं

साहित्य : पाच ऊस किंवा ज्वारीची ताटं, तांब्या, नारळ, नागवेलीची पानं, धान्याची रास

भृत्ये

 भुत्या हा गोंधळ्याप्रमाणेच देवीचा भक्त असतो. माहुरची रेणुका आणि तुळजापुरची भवानी ही ह्या भक्तांची आराध्य देवता.  जगदंबा ही आदिशक्तीच्या स्वरुपात तीन ठिकाणी वास करते.  माहूर, सौंदत्ती व तुळजापूर अशी यांची श्रद्धा असते.  भुत्या, भोप्य व आराधी ही तीनही नावे एकाच अर्थाची आहेत. हे सर्व देवाचे भक्त गोंधळ्यांप्रमाणे गोंधळ घालतात.

भुत्याचा वेष : लांब घोळदार पायपितचा तेलकट मळकट अंगरखा-डोर, डोक्यावर शंकूच्या आकाराची कवड्याची टोपी, गळ्यात माळा, कमरेला कवड्या लावलेला कमरपट्टा, मनगटात कवड्याच्या मनगट्या, गळ्यात कवड्यांनी मढवलेली हळद-कुंकवाची पिशवी, डाव्या खांद्यावर लोंबणारी बुधली, एका काखेत झोळी, छातीवर देवीचा भला मोठा पितळी टाक,  पायात घुंगरु, कपाळावर हळद-कुंकवाचा मळवट, हातात पेटता पोत, साथीला संबळ्या असा भुत्या नाचत येतो.

संत एकनाथांच्या भुत्याने देहाहंकारी वृत्ती टाकून देऊन भेदभावाला आणि द्वैतबुद्धिला नाहिसे करुन सत्त्वगुणांची आरती केली आणि त्या जगदंबेला भावभक्तीचा व सतविचारांचा फ़ुलवरा बांधला म्हणूनच देवीची उपासना करुन मनोरंजन करणे एवढी मर्यादित भूमिका न ठेवता सतभक्तांच्या रुपातील संत एकनाथांचा भुत्या हा एक श्रेष्ठ प्रबोधनकार आहे.