अश्वारोहण

घोडा हाताळण्याची व स्वार होऊन चालविण्याची कला. अश्व व अश्वारोहक परस्परपूरक घटक बनतात. केवळ घोडेस्वारीत अनेकदा सफाई व साहसीपणा आढळला, तरी अश्वारोहणकला तीहून वेगळी व व्यापक असते.
घोड्यावरील बैठक, अश्वारोहकाची मांड, घोड्याची चाल, अश्वारोहणाची नियंत्रण साधने, त्याच्या शैली व घोड्याचे प्रशिक्षण हे या कलेचे महत्त्वाचे घटक होत.चापल्य, सहजता, मोकळेपण व सुखदता हे चांगल्या बैठकीचे निकष होत. अश्वारोहकाच्या तोलावरही बैठक अवलंबून असते. तोल साधण्यासाठीच पुष्कळदा पकड वाढवावी लागते. अश्वारोहणाच्या विविध प्रकारांशी ही बैठक जुळवून घेतली जाते.घोड्याच्या चालीवर अश्वारोहकाची मांड अवलंबून असते.
शो जंपिंग टॉप स्कोर, शो जंपिंग नॉर्मल, शो जंपिंग चॅलेंज, पोल बेंडिंग, ट्रॉटिंग रेस, बॉल अ‍ॅण्ड बुकेट, जलेबी रेस, हॅक्स, हॅट रेस, टेंन्ट पेगिंग शो-जंपिंग, म्युझिकल चेअर, बेअर बॅक रेस, बॉल बॅकेट ग्रुप, ब्लाइंड सॅडल फिटिंग आदी विविध गटांत या स्पर्धा अशा विविध प्रकारांच्या घोड्यांच्या चित्तथरारक स्पर्धा सहसा होत असतात.

घोड्याच्या पाच प्रकारच्या चाली मानल्या जातात.

1. साधी चाल.
2. संथ आणि एकेका बाजूच्या दोन्ही पायांची चाल (वॉक).
3. चारही पायांची तालबद्ध म्हणजे दुडकी चाल (ट्रॉट).
4. वेगात धावणे (कँटर).
5. चौखूर पळणे (गॅलप).

यांपैकी पहिल्या दोन चालींत अश्वारोहकाची मांड स्थिर असते; दुडक्या चालीत त्यास किंचित पुढे वाकून मांड उंचवावी लागतो; चौथ्या व पाचव्या चालींत त्यास तोल सावरण्यासाठी पुढे वाकून रिकिबीनर भार द्यावा लागते; या अवस्थेत मांड पूर्णतः अस्थिर बनलेली असते. घोड्याच्या चालीत बदल करण्यासाठी व त्याची दिशा व गती बदलण्यासाठी अश्वारोहकाला आपली मांड अधिक लवचिक राखणे भाग असते.

अश्वारोहणाच्या नैसर्गिक साधनांत लगाम, लगामाचा मुखबंध व त्यांस नियंत्रित करणारे स्वाराचे हात, पाय, शरीरभार व आवाज यांचा समावेश होतो. त्यांशिवाय जीन, रिकीब, चाबूक, नासिकाबंध, जेरबंद, ढापणे ही उपकरणेही गरजेप्रमाणे वापरली जातात. घोड्याची चाल व गती नियंत्रित करण्यासाठी संदेशवाहक म्हणून वरील साधनांचा स्वारास उपयोग होतो. स्वाराचे संदेश सजमण्यासाठी घोड्याला अर्थातच प्रशिक्षण द्यावे लागते.

अश्वारोहणाच्या बैठकीच्या शैली अनेक आहेत. अश्वारोहणाच्या उद्दिष्टावर अशा शैलींचे स्वरूप अवलंबून असते. अभिजात किंवा ‘अ‍ॅकॅडेमिक’ शैली प्राथमिक अश्वप्रशिक्षणात वापरली जाते. पुरस्सर शैलीलाच पुष्कळदा ‘लष्करी’, ‘शिकारीची’, ‘उड्डाणाची’ किंवा ‘समतोल शैली’ असेही म्हणतात. यांशिवाय ‘स्टॉक सॅडल’, ‘सॅडल हॉर्स’ किंवा ‘शो रिंग’, ‘प्लॅट रेसिंग’, ‘स्टीपल चेझ’, ‘साइड सॅडल’, ‘बेअर-बॅक’ इ. अश्वारोहण-शैली स्वारांच्या उद्दिष्टांनुसार रूढ झालेल्या आढळतात.

अश्वारोहणकलेचे प्रशिक्षण दुहेरी असते; म्हणजे अन्न व अश्वारोहक या दोहोंसही प्रशिक्षणाची गरज असते. घोड्याच्या प्राथमिक प्रशिक्षणात (ड्रेसेज) तोल, चपलता व आज्ञाग्रहण अंतर्भूत होते. पुढील उच्च प्रशिक्षण (ग्रॅड ड्रेसेज) महत्त्वाचे असून त्याच्या पहिल्या विभागात (कॉम्पान्य) अश्वारोहणाच्या साधनांच्या संदर्भात घोड्याला प्रशिक्षण दिले जाते. दुसऱ्या विभागात (ओत-एकोल) घोड्याच्या हालचाली, चाली व गती यांचा पूर्ण विकास साधला जातो. उड्डाणाचेही विविध प्रकार त्यास शिकविले जातात. अश्वारोहकालाही वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
अश्वारोहण-कलेशी संबंधित असे काही खेळ प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी १९१२ पासून आंलिंपिक क्रीडासामन्यांत अंतर्भूत केलेले अश्वोड्डाण खेळ (इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्‌स) प्रसिद्ध आहेत.

अश्वारोहकाने घोड्याला लांब पळवत न्यावयाचे व निरनिराळ्या प्रकारच्या अडथळ्यांवरून उड्डाण करीत आपले कौशल्य प्रकट करावयाचे, असे या खेळांचे स्वरूप आहे. अडथळ्यांवरून उडी मारताना काही चुका झाल्या, तर त्याबद्दल विशिष्ट गुण काटण्यात येतात. ज्या स्वाराचे कमीत कमी गुण कापले जातील, तो विजयी ठरतो. इ.स.पू. १४०० पासून हा खेळ खेळला जातो, असा दाखला सापडतो.पोलो, घोड्यांच्या शर्यती (रेसेस), अमेरिकेतील काऊबॉय यांच्या अश्वक्रीडा (रोदेओ), सर्कशीतील घोड्यांची कौशल्याची कामे इ. खेळही अश्वारोहण-कलेशी संबंधित आहेत.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश