भैरवगड

भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून धोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसांचा वावर तसा कमीच. पायथ्याची गावं गाठण्यासाठी एस. टी. ची चांगली सोय आहे.

इतिहास

इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे. मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे. मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोरच खाली उतरणार्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून थोडे पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणार्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणार्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.

गडावर जाण्याच्या वाटा

भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रामघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.

१.दुर्गवाडी मार्गेः या मार्गेभैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.

२.हेळवाकची रामघळ मार्गेः हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण – कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.

३.गव्हारे मार्गेः गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्या वाटेस मिळते.

राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास – दुर्गवाडी मार्गे. ७ तास – रामघळी मार्गे.