इंद्रधनू प्रकल्प हा खरं तर रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस, अनाथ मनोरुग्ण महिलांचा आहे.नगर-मनमाड महामार्गावर नगरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील शिंगवे नाईक येथे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने मनोविकलांग महिलांचा सांभाळ व उपचार करण्यासाठी इंद्रधनू प्रकल्प सुरू केला आहे. सध्या येथे ८५ मनोविकलांग महिला व त्यांची ११ बालके आहेत. जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या विश्वासघाताने मानसिक संतुलन ढासळलेल्या यापैकी बहुतांश महिलांवर बेवारसपणे फिरताना अन्याय-अत्याचार झाले आहेत. यातून गर्भारपण लादल्या गेलेल्या अशा महिलांना डॉ. धामणे दाम्पत्याने इंद्रधनूमध्ये आणले असून, त्यांच्या प्रसूतिसह मानसिक आजारावर उपचार केल्याने यापैकी अनेक जणी बऱ्या झाल्या आहेत व येथील अन्य मनोविकलांग महिलांवरील सुश्रुषेसाठी मदत करीत आहेत.
धामणे यांची नगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर शिंगवे नाईक गावात थोडीफार वडिलोपार्जित जमीन आहे. येथेच हा प्रकल्प उभा करण्याचे ठरले. आर्थिक पाठबळ नव्हतेच, शिवाय ज्या लोकांसाठी हा प्रकल्प उभा करायचा त्यांची अवस्था पाहता मदतीलाही अन्य कोणी पुढे येत नाही. वडिलांना राजी करून धामणे यांनी घरची सात गुंठे जमीन प्रकल्पासाठी मिळवली. येथेच सुरुवातीला छोटेखानी बांधकाम करून बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांचा सांभाळ सुरू झाला. रस्त्यावर फिरणाऱ्या अशा तीन महिला येथे आणून सेवेचा श्रीगणेशा झाला. सन २०१०मध्ये ही सुरुवात झाली. अडीच-तीन वर्षांतच अशा ११५ महिलांचा सांभाळ त्यांनी केला. शुश्रूषा वैद्यकीय उपचार, जिव्हाळा यामुळे मानसिक आजारातून पूर्णपणे बाहेर आलेल्या ७५ महिलांना त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी पाठवले. सध्या संस्थेत ३८ महिला आहेत. नुकतेच ७५ बेडचे नवे बांधकाम येथेच करण्यात आले आहे.
धामणे दाम्पत्याच्या या कामाची माहिती मिळालेले पुण्यातील सुहृद वाय. एस. साने यांनी संस्थेला भेट दिली. येथील सेवाभाव लक्षात घेऊन त्यांनी सुरुवातीच्या काळात संस्थेला ६ लाख रुपयांची मदत दिली. त्यातूनच पहिले बांधकाम करण्यात आले. संस्थेच्या उभारणीत हीच मदत मोलाची ठरल्याने धामणे दाम्पत्याने मग संस्थेला साने यांचेच नाव दिले. निव्वळ लोकांच्याच मदतीवर संस्था सुरू आहे. संस्थेसाठी धामणे दाम्पत्याने पूर्ण झोकून दिले आहे. निवासी प्रकल्प सुरू झाल्यानंतर डॉ. सुचेता यांनी त्यांची कायम नोकरीही सोडली. त्या पूर्ण वेळ प्रकल्पातच काम करतात. डॉ. राजेंद्र चरितार्थापुरता व्यवसाय करून उर्वरित वेळ प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. आर्थिक ओढाताण तर आहेच. मात्र या मनोरुग्ण महिलांची शुश्रूषा, त्यांच्यावर उपचार, त्यांचा सांभाळ अशा सर्व गोष्टी हे दाम्पत्यच करते. प्रत्यक्ष मदतीला तिसरा माणूस नाही! या एका महिलेसाठी (जेवण, शुश्रूषा, औषधोपचार) महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. लोकांकडून यथाशक्ती मदत मिळते. बऱ्याचदा धामणे दाम्पत्यालाच आर्थिक भारही उचलावा लागतो. संस्थेतील स्वीपरपासून स्वयंपाकी, केअरटेकर, रुग्णवाहिकेचा चालक सर्व कामे धामणे हेच करतात.
रस्त्यावरून आणलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेचे सर्वच प्रश्न गंभीर असतात. बऱ्याचदा त्या अत्याचारांच्या शिकार तर झालेल्या असतातच, मात्र अन्यही बरेच आजार, व्याधी त्यांना जडलेल्या असतात. शुश्रूषा, स्वच्छता दूर राहिली. संस्थेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या जवळही येऊ देत नाहीत. मुळातच सैरभैर आयुष्य जगणाऱ्या या महिलांना कशाचेच भान नसते. त्यांच्यामध्ये आधी आपलेपणाचा विश्वास निर्माण करावा लागतो. हेच काम अत्यंत कौशल्य व जिकिरीचे आहे. त्याचा मोठा वाटा डॉ. सुचेता उचलतात. न कंटाळता, चिकाटी व जिव्हाळ्याने या महिलांना आपलेसे करण्याचे कसब आता त्यांना प्राप्त झाले आहे. आजारातून कमी-अधिक बऱ्या झालेल्या महिलाही त्यांना या कामात मदत करतात.
बेवारस व अनाथ महिलांना आधार देऊन त्यांच्यावर केवळ उपचारच नव्हे, तर तंदुरुस्त करून पुन्हा ताठ मानेने उभे करण्याचा संकल्प ‘इंद्रधनू प्रकल्पा’ने सोडला आहे. त्याला समाजाचा हातभार गरजेचा आहे