रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील घराडी नावाच्या एका दुर्गम भागात असणारी निवासी अंधशाळा. या शाळेला येत्या २४ एप्रिलला दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘आनंदमयी’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
कानांमध्ये चांगले शब्द ऐकू येतात आणि त्या शब्दांच्या नुसार मनात त्याचे चित्र रंगवत ‘स्नेहज्योती’मध्ये मुले आनंदाने वावरत असतात. अंध मुलांच्या भूत, वर्तमान आणि भविष्याला दृष्टी देण्याचे काम आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून करतात. गेल्या दहा वर्षांमध्ये या शाळेने मुलांसाठी अविरत आणि अखंड कष्ट घेतले आहेत. त्या कष्टांची दखल म्हणून अनेक मानसन्मान आणि पुरस्कार शाळेला मिळाले आहेत. त्यामध्ये आणखी एका विशेष पुरस्काराची भर पडते आहे. या संस्थेला २४ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आनंदमयी पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार म्हणजे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुराच होय. त्यासाठी या सेवाभावी संस्थेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड गावातील घराडी या दुर्गम भागांत अंधांसाठी शाळा चालविण्याचे शिवधनुष्य आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोघी बहिणींना आत्मविश्वासाने पेलले आहे. नुसते बोलणे नाही, तर त्यांच्या विचारांचा, कृतींचा आणि शब्दांचा मेळ इतका घट्ट विणला आहे, की त्या कामात अहंकार, दया किंवा अपेक्षेचा लवलेशही नाही. फक्त मुलांसाठी झटून काम करणे ही एकच गोष्ट त्यात दिसून येते. एखाद्या व्यक्तीचे काम इतरांना किती प्रेरणादायी असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्नेहज्योती’ शाळा. शाळेत येणाऱ्या सर्वांचेच ‘स्नेहज्योती’च्या बागेतल्या मुलांकडून उत्तम स्वागत होते. शाळेत जाताना आपल्याच मनात दया, कणव किंवा दु:ख अशा भावना असतात. पण ही फुले मात्र आनंदाचा आस्वाद घेत, एकमेकांच्या आधाराने छान फुलून आलेली असतात. शाळेच्या मुलांचा वाद्यवृंद तर मनाला वेड लावणारा आहे. गाण्यातला भाव डोळ्यांनी नाही तर सहजपणे चेहऱ्यावर दाखवत आनंदाने गातात, तेव्हा दृष्टी असलेल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. शाळेचा आवाका आणि शाळेच्या कामाचा झपाटा खरोखरीच अचंबित करणारा आहे
सऱ्यांना आनंद देण्याकरिता स्वत:चा वेळ देणारी आणि प्रयत्न करणारी माणसं विरळाच. त्यातही अशी व्यक्ती जर आपल्या जवळच्या नात्यातील असेल तर त्याचं समाधान अधिक. माझ्या आईची बहीण आशा मावशी कामत ही अशांपैकी एक. घराडी येथील अंध विद्यालयास व ते चालविणाऱ्या आशा मावशीस माझ्या अनेक शुभेच्छा!
– सचिन तेंडुलकर