मी ,अनुजा चिंचवडकर, मुळची विदर्भातील यवतमाळची फ्रीमॉण्ट , कॅलिफोर्नीया येथे राहाते. गणित या विषयात एम.एस.सी.केले असून फ्रीमॉण्ट येथे गणित विषयच शिकवते.मला वाचनाची खूप आवड आहे. खास करून मला अध्यात्मिक साहित्य वाचायला आवडतं.
कविता लिहिण्याचा छन्द मला अलीकडे लागला. प्रत्येक कवितेत मी कुठलातरी विषय मांडण्याचा प्रयत्न करते. मला सोप्या शब्दात, आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींवर कविता लिहायला आवडतात. अवजड , कठीण शब्द माझ्या कवितांमध्ये कमी असतात. कविता जेव्हा मनासारखी जमते तेव्हा खूप आनंद होतो. बरेचदा विषय मनात घोळत राहतो पण नेमके शब्द सापडत नाहीत. जमेल तसं , जमेल तेव्हा लिहिण्याचा मी प्रयत्ने करते.
कविता
घरीच असतेस?
घरीच असतेस ? काहीच करत नाहीस?
साधासा प्रश्न, पण भारीच बोचला मनास
काम करते मी घरुनच, म्हणाले मी हसून
कुठली कंपनी? कोणतं काम? प्रश्न आला परतून
घरच माझी कंपनी,मीच माझी बॉस, मी उत्तरले
अस्तित्वाचे काहूर मात्र मनात माझ्या माजले
नोकरी करून कागदी नोटा मिळवायलाच हव्यात का?
मुक्त माझ्या जगण्यात माझा आनंद नको का?
घरालाच माझ्या, माझं विश्व मी समजते
नवऱ्यामध्ये, मुलांमध्ये वेळ झोकून देते
रमण्यात घरी कमीपणा का मला वाटावा?
स्वातंत्र् अनमोल, त्याचा अभिमान का नसावा?
कदाचित उद्या मुलेही किंमत वेळेची विसरतील
लौकीक मिळवून जगात, उपदेश मलाच करतील
विचारांच्या कोलाहलात घर मी आवरू लागले
कचऱ्यातून डिग्रीच्या भेन्डोळीने डोके काढले
फर्स्टक्लासची डिग्री माझी, उघडता उघडेना
आयुष्य व्यर्थ की कामी लागतय माझं मला समजेना
एकरूप
एक थेंब पाण्याचा
नदीतून समुद्रात गेला
समुद्रच बनला
एक कण धुळीचा
मातीत समरस झाला
पृथ्वीच बनून गेला
एक झुळूक वारयाची
सुंगंधाला स्पर्शून गेली
सुगंधच बनली
एक कीरण ज्याेतीचा
सुर्याकडे झेपावला
सुर्यच बनून गेला
कण कण देहाचा
नामरंगी रंगला
देवच बनून गेला
कसे उन्नत व्हावे?
इंटरनेटने जग जवळ माझ्या आले
स्वतःपासून मात्र मी दूर दूर गेले
संयम वेबसाईटच्या जाळ्यात अडकला
टिकणारा आनंद, नाही कुठे गवसला
नको त्या माहितीचे थरावर थर जमले
शोधतांना उत्तरे प्रश्नही नकळत बदलले
व्हॉंटस अपच्या ग्रुप्सनी भरीस भर घातली
एकच पोस्ट दिवसातून चार वेळा वाचली
रिझविण्यात मनाला तासनतास गेले
अस्वथ मन, तरी स्वस्थ नाही झाले
गाळात आता खोलवर अशी काही फसले
इंटरनेटच मला, आता, सफाईने वापरू लागले
विश्व अमर्याद परी स्वयेच मी मर्यादिले
अदृश्य मोहशृंखला, खुशीने बंदी बनले
समजूनही,नासमज हे मन, कसे वळवावे?
गुलामीतून मर्जीच्या कसे मुक्त व्हावे?
खोल मनाच्या गाभाऱ्यात कसे स्वतःला शोधावे
अनमोल ह्या जीवनी,कसे उन्नत व्हावे?
शोध
काही वेळ शांत बसावं नुसतंच
जावं समीप स्वत:च्याच
डुंबावं खोलवर मनाच्या गाभारयात
शोधावं काय काय दडलंय अंतरात
गोठलेल्या बंदीस्त स्मृती येतील तरंगत
काही सुखद, काही दु:खद
अनिश्चित भविष्याचे भय अचानक डोकावेल
निश्चल होऊन, अंतरात जावं आणखी खोल, खोल
निश:ब्द, निरंतर शांती तेथे भेटेल
साठवावं, अद्भुत, निर्मळ क्षणाक्षणाला
सांगावं मनाला ठासून, हेच हवंय तुला
अन् फिरुन न्यावं त्याला, स्वत:त स्वत:ला शोधायला
तुला माझी शपथ!
तुला माझी शपथ, मना
नको उठवु अंतरंगी लहरी
नको जाऊ माघारी, नको जाऊ सामोरी
नको काढू सारख्या कटू, गोड आठवणी
नको आठवू, कारण, दुःख भोगल्याचे होईल दुःखच
नको आठवू, कारण, सुख संपल्याचेही होईल दुःखच
नको रंगवू ते स्वप्न भविष्याचे
नको आणू त्या भिववून टाकणाऱ्या काळज्या
जग ही निळाई, ही मंद झुळुक, हा मृद्गंध
असा रहा तू इथेच ह्या क्षणी
भग्न भिंतीतही उगवलंय सानुलं फुल, बघ
लुट आनंद अस्तित्वाचा इथेच ह्या क्षणी
अनुजा चिंचवडकर, फ्रीमॉण्ट , कॅलिफोर्नीया