“अँड द ग्रॅमी अवार्ड …फॉर द कॅटेगरी. गोज टू…”
नुकतीच 62 व्या ग्रामी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित संगीत पुरस्कार सोहळा म्हणून “ग्रॅमी पुरस्कार” ओळखला जातो आणि ह्या वर्षीचा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा फारच विशेष ठरला. कारण बिली आयलीस या फक्त अठरा वर्षाच्या गायिकेला ह्या यावर्षीच्या “सॉंग ऑफ द इयर”, “बेस्ट न्यू आर्टिस्ट”, “बेस्ट पॉप व्होकल अल्बम”, “रेकॉर्ड ऑफ द इयर” , “बेस्ट अल्बम ऑफ द इयर” अशा तब्बल 5 ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं !! इतक्या लहान वयात एखाद्या गायिकेला सहा कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन, पाच कॅटेगरीज मध्ये पुरस्कार, आणि त्यापैकी चार अतिशय महत्त्वाच्या कॅटेगरीज… असं ग्रॅमी अवॉर्ड इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे !! आणि त्यामुळेच प्रत्येक कॅटेगरीत तिचं नाव उच्चारल्या जात असताना आश्चर्य आणि आनंदासोबत प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटा वेगवेगळ्या होत्या…जगातल्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराची इतक्या लहान वयात मानकरी ठरणारी ही पहिलीच !!
18 डिसेंबर 2001 रोजी लॉस एंजेलिस येथे जन्मलेली बिली आयलीस!! ग्रॅमी अवॉर्ड च्या निमित्ताने बिली आयलीस बद्दल वाचलं तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या …सर्वात पहिलं हे की तिला तिची आई मॅगी बेअर्ड आणि तिचे वडील पॅट्रिक ओ’कॉनेल यांचा प्रत्येक गोष्टीसाठी जबरदस्त पाठिंबा होता. त्यांनी बिली ला शाळेत पाठवलं नाही, तिचं शिक्षण घरीच झालं. तिच्या पालकांनी तिला आणि तिच्या भावाला वेगवेगळ्या वाद्यांमध्ये घरीच पारंगत केलं . सुरेख चेहरा आणि आई वडील अभिनय क्षेत्रातले कलाकार असून सुद्धा तिने अभिनय हे क्षेत्र न निवडता संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. तिचा भाऊ फिनिस ह्याने तिला गाणी लिहिण्याचं घरीच प्रशिक्षण दिलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाचा अवघ्या चौथ्या वर्षी तिने पहिलं गाणं लिहिलं आणि वयाच्या आठव्या वर्षी तिने म्युझिक टॅलेंट शो मध्ये भाग घेतला. तिच्या आईने एका मुलाखतीत म्हटलं आहे की लहानपणापासूनच ती सतत गात असायची..कधी घरी , तर कधी कार्यक्रमात !! आणि हळूहळू मग तिने आणि तिच्या भावाने मिळून गाणी आणि अल्बम बनवायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी त्यांची गाणी लोकप्रिय होत गेली. यावर्षीच्या 2020 ग्रॅमी अवॉर्ड मध्ये तिचा भाऊ ह्याला जेव्हा “बेस्ट प्रोडूसर ऑफ द इयर” हा वॉर्ड मिळाला तेव्हा त्याने हसत हसत सांगितलं की, “आम्ही आमच्या लहानशा बेडरूम मधेच सर्व गाणी लिहिली आणि बनवली.. त्यामुळे आत्ता जी लहान मुलं आपल्या बेडरूम मध्ये गाणी बनवत आहेत, गाणी म्हणत आहेत त्यांना नक्कीच भरपूर वाव आहे आणि त्यांनी ते सुरू ठेवावं.” थोडक्यात काय अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, अगदी छोट्याशा जागेचा वापर करून ते दोघेही आज इथवर पोचले आहेत. बिली आयलीश म्हणते की लहानपणापासूनच ‘तुम्हाला जी गोष्ट मनापासून करावीशी वाटते ती नक्की करा’ हेच आम्हाला आमच्या आईवडिलांनी सांगितलं आणि त्यासाठी भरपूर प्रोत्साहन आणि सहकार्य केलं. वाद्यांचे, गाण्यांचे जोरजोरात येणारे आवाज सुद्धा त्यांनी कायम सहन केले. खरंच कुटुंबाचं संपूर्णपणे सहकार्य असेल तर मुलं आपल्या आवडीचं काम नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात हे यावरून लक्षात येतं .
दुसरी गोष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी बिली डिप्रेशन मध्ये सुद्धा केली होती . परंतु तिचे आई-वडील, भाऊ यांचा जबरदस्त पाठिंबा, काही उपचार आणि सतत संगीतक्षेत्रातलं काम ह्यामुळे ती ह्या डिप्रेशन मधून बाहेर आली आणि आज पाच ग्रॅमी ॲवॉर्ड्सची ती मानकरी ठरली आहे . कुठल्याही कठीण प्रसंगावर सातत्य आणि मेहनत करून तुम्ही नक्कीच मात करून अतिशय उच्च स्तरावर जाऊ शकता हेही बीली आएलीस च्या उदाहरणावरून नक्कीच शिकण्यासारखं आहे . “मला आता फक्त आनंदी राहायचं आहे”, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे बिली आयलीस ही नेहमीच अतिशय सैल आणि अंगभर कपडे घालते.’ माझं सौंदर्य कुणी मादकतेच्या दृष्टिकोनातून बघू नये आणि माझ्या शरीराबद्दल कुणालाच अंदाज येऊ नये , म्हणून मी असे सैलसर कपडे घालते’ असं तिने सांगितले आहे. अमेरिकेसारख्या एवढ्या खुल्या मतांच्या देशात आणि सतत ग्लॅमर वर्ल्ड मध्ये राहून सुद्धा त्या एवढ्याशा पोरीला ही एवढी मोठी गोष्ट उमगली हे खरंच कौतुकास्पद आहे ..आणि ह्यातून आणखी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की आजकाल मुली सतत ग्लॅमरस नट्यांचं अनुकरण करतात ,त्यांच्या इतकच सुंदर दिसायला बघतात ..त्यासाठी मग वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्टस, फेअरनेस क्रीम्स आणि वेगवेगळे प्रकार करायला बघतात आणि एवढं करूनही आपण आपल्या आवडत्या नटी इतकं सुंदर दिसत नाही, हे बघितलं की त्यांचा विरस होतो.. स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो आणि मग अभ्यास , सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) आपोआपच कमी व्हायला लागते . सोनम कपूर ने याबाबतीत केलेलं वक्तव्य आपण वाचलंच असेल. ती म्हणते ‘आमचा जो चेहरा तुम्हाला पडद्यावर दिसतो त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागतं… मी सकाळी सहाला उठून दीड तास जिममध्ये घालवते ..मला कुठल्याही सिनेमाच्या शॉटच्या आधी 90 मिनिटे मेकअप चेअरवर बसावं लागतं.. तेव्हा काही लोक माझ्या केसांवर काम करत असतात, काही लोक माझ्या नखांना आकार देत असतात तर काही लोक माझा मेकअप करत असतात .. तसंच माझा डाएट, माझे कपडे ,माझी स्टाईल हे ठरवणारे तज्ञ आणखी वेगळे असतात आणि हे सर्व केल्यानंतर माझा चेहरा असा इतका सुंदर दिसतो ‘ अगदी खरंय! नट्यांचं अनुकरण करण्यापेक्षा आपलं व्यक्तिमत्व आणखी कसं प्रभावी करता येईल ह्यावर तरुण मुलींनी भर देणं जास्त गरजेचं आहे .
तर गोड चेहऱ्याच्या बिली आएलीसने एक वेगळंच उदाहरण तरुण मुलींसाठी समोर ठेवलं आहे. तिने आपल्या कलेला, आपल्या क्रिएटिविटी ला भरपूर प्राधान्य दिल्यामुळे आज ती इथवर पोचलेली आहे आणि ह्या कॅटेगरीत ले असे अवॉर्ड मिळवणारी ती सर्वात लहान वयाची कलाकार आहे ..त्यामुळेच संपूर्ण जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे .. तिच्या या अनोख्या यशाबद्दल तिचं विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !!!!
डॉ. स्मिता बाकरे माहुरकर,नागपूर
अभिनेत्री,लेखिका