उत्सव “ती” चा …
सन्मान “स्त्री”त्वाचा !- जागतिक महिला दिन…
नाही “ती” नुसती मादी, “ती” माणूस आधी आधी !!!
अबला नाही “ती” तर सबला !!
“ती “म्हणजे स्त्री…जागतिक महिला दिनानिमित्त तिच्यातल्या “ती” चं अभिनंदन!
महत्वाकांक्षी, हिम्मतवान मात्र तेवढीच लाजरीगुजरी अशी “ती” म हि ला…
कुणाची आई,पत्नी,सून…ह्या मोहक नात्यांना न्याय देत “ती” आणखीन पुढे निघून गेलीय.. ह्या सुरेल सुरम्य जगात “ती” ताल धरत असते कुठेही ठेका न चुकवता.. “ती” कायम स्वयम् ला शोधत असते. अनेक स्वप्न जगत असते. आणि त्यांचा पाठलागही करत असते. विदेशात रहाणा-या महिलांचं तर खास कौतुक करायला हवं. घरातली धुणी,भांडी,स्वयंपाक,मुला बाळांना सांभाळून तितक्याच आकर्षक रुपात “ती” कामालाही निघते आणि विविध उपक्रत्रमातून संस्कृतीही जपते..
अश्या अनेक छोट्या छोट्या टिंबातूनच तर तिला सुंदर चित्र निर्माण करायचं असतं. एखाद्या कॅलिडोस्कोप मधे सुंदर,तेजस्वी रंग चमकावेत ना अगदी तसे. प्रत्येक क्षण“ती” जगत असते, त्या क्षणांना न्याय देत असते.
स्त्रीत्वाचा आदर करत महिला दिनाच्या निमित्ताने “ती” चा उत्सव साजरा होतो..
महिला दिनाचा इतिहास…
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
8 मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे 1943 रोजी पहिल्यांदा साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बॅंका, कार्यालये तसेच काही घरांमधूनही 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा व्हायला लागला आहे. हे ही नसे थोडके!
जागतिक महिला दिनाच्या सर्व स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा..!!
अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे ज्वलंत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.
दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवादी यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पारित झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. रशिया मध्ये जेंव्हा आंदोलन सुरु झाले होते तेंव्हा तिथे ज्युलिअन कालनिर्णय वापरत होते (आता ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरला जातो). ज्यानुसार फेब्रुवारी चा अखेरचा रविवार हा २३ तारखेला होता परंतु जगभरात त्यावेळी ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरत असल्यामुळे आणि त्या कालनिर्णयानुसार २३ फेब्रुवारी हा दिवस बाकी जगभरात ८ मार्च होता. म्हणूनच ८ मार्चला जगभरात जागतिक महिला दिनाच्या स्वरुपात मानला जातो.