अनंत लक्ष्मण कान्हेरे
१८५७ मध्ये सुरु झालेला स्वातंत्र लढा जवळजवळ शंभर वर्षे चालला. ह्या लढयात अनेकजण मृत्यूमुखी पडले. अनेकांना फासावर जाव लागल. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. अनेकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. या स्वतंत्र युद्धात ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यात काही कोवळी तरुण मुलंही होती. त्यातले महत्त्वाचे नाव अनंत लक्ष्मण कान्हेरे, ह्या तरुणाला अवघ्या १९ व्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली. कान्हेरेंनी जॅक्सन ह्या इंग्रज अधिका-याला ठार मारले. मंगळवार दि.९ डिसेंबर १९०९ रोजी, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात सर्वा समक्ष पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यान हा वध केला.
जॅक्सन नाशिकचा कलेक्टर झाला तेव्हा नाशिकमध्ये स्वातंत्र्य प्रेमी तरुणांची मोठीच चळवळ उभी राहिलेली होती. सावरकरांची ‘अभिनव भारत ‘ ही संस्था त्यास कारणीभूत ठरली. या संस्थेचे सभासद देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणापर्ण करण्याची प्रतिज्ञा घेऊन गुप्तपणे आपली संघटना वाढवीत होते.शिवाय लोकांमध्ये जागृती करणारे काही प्रकट कार्यकमही ते करीत असत.भारत गुलाम आहे, तो स्वतंत्र झाला पाहिजे,इंग्रजांना इथून घालवून दिले पाहिजे त्याकरीता त्यांना इथं राज्य करणं अशक्य केलं पाहिजे त्यांच्या मनात भारतीयांबद्दल धाक आणि भीती निर्माण केली पाहिजे असे विचार तरुणांच्या मनात निर्माण करण्याचं काम या सर्व कार्यकमामधून होत असे.
सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनाची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. डिसेंबर २१, इ.स. १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनाच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंताने जॅक्सनावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिला, त्याला अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एप्रिल १९, इ.स. १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. अनंताचे स्मारक ठाणे तुरुंगात आहे.
नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला.