अण्णा भाऊ साठे (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, ऑगस्ट १, इ.स. १९२० – जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते.
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला ‘लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले. [ संदर्भ हवा ] भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, ” ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!” मार्क्सवादी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.