व्यवस्थापकीय आयुष्यात प्रश्नांना परिस्थितींना भिडणे, संकटांचा सामना करणे, व या प्रयासांत सहकर्माचाही किंवा संबंधित व्यक्तींशी आमनासामना, वादविवाद या गोष्टी अटळ आहेत. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती कठीण असते, बऱ्याचदा गोष्टी त्रासदायक, तणावपूर्ण असतात – निदान आनंददायक तरी नसतात, म्हणून बऱ्याचवेळा नकोशा (undesirable) वाटतात. निदान मी तरी ‘सामना करणे’, ‘तोंड देणे’ असे शब्दप्रयोग आल्हाददायक परिस्थितीत वापरलेले पाहिले नाहीत.
जेव्हा गोष्टी जशा आधी ठरवल्या आहेत (plan) तशा होत नाहीत किंवा आपल्याबद्दल आपल्यापाठी कुणी आपल्याला अहितकारी उद्गार काढले असतील किंवा विरोधच करायचा म्हणून कुणी हेतूपूर्वक आपल्या कार्यात अडथळा आणत असेल तेव्हा सामना (Confrontation) अनिवार्य आहे.
अशा गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रोकठोक सामना करायलाच हवा. अशा बाबी घरगुती किंवा वैयक्तिक परिस्थितीतही होऊ शकतात जसं की आपलं मूल अभ्यासात कमी पडत असेल # दुर्लक्ष करत असेल किंवा बेजबाबदारपणे वागत असेल किंवा घराविषयी इतर काही त्रासदायक अडचणी असतील असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतच असतात.
अशा परिस्थितीत आपल्या बहुतेकांची, असे प्रसंग टाळण्याचीच मनस्थिती असते – त्यातल्या त्यात आशियाई लोकांत – जिथे रोकठोक बोलण्याचा आपला स्वभाव वा सराव नसतो – तिथे तर हे स्वाभाविक आहे. आपण सारे असे प्रसंग टाळातो कारण अमुक अमुक माणसाकडे जाऊन ‘बाबा रे! तू अमुक अमुक गोष्ट चुकीची करतो आहेस किंवा मला त्याचा त्रास होतो म्हणून करु नकोस’ असं त्याच्या तोंडावर जाऊन सांगणं आपल्याला जमत नाही किंवा आवडत नाही…. हे सोप नाही याची मला कल्पना आहे. मी अस बोलले- त्याला जाऊन भिडले – वादविवाद झाला तर त्याला काय वाटेल ‘किंवा’ ‘कोण काय म्हणेल ‘ असले प्रश्न आपल्या मनाला भिववत असतात. आपली (एका ‘चांगल्या’ माणसाची), प्रतिमा (Image) आपल्या मानेवर (किंवा मनावर) ओझं बनलेली असते. जणूकाही, मुद्यांशी भिडणं, व्यक्तींशी (मुद्यांवर) वाद घालणं म्हणजे रस्त्यावर दोन (समाज विघातक) जणांनी मुद्यावर येणं – भांडणे वा मारामारी करणं – असं आपल्याला वाटत असावं म्हणून हे ‘ माझ्यायोग्य’ वागणे नाही अशी मनाची धारणा करुन आपण प्रसंग टाळण्याची सोयीस्कर पळवाट पकडतो. पण टाळले म्हणून प्रसंग किंवा अडचणी नाहीशा थोडयाच होतात. आपण डोळे झाकले म्हणून दिवसाची रात्र होत नाही ! मुख्य म्हणजे आपण प्रसंग टाळतो तो केवळ आपल्याला ‘भिडायचं’ नसतं म्हणून – त्या प्रसंगाचे गुणदोष # परिणाम आपल्याला मान्य असतात म्हणून नाही. आपण तो प्रसंग (उपाय नसल्याने) ‘स्विकारतो’ हे आपल्या अतंर्मनाला कधीच भावत नसतं – मान्य नसतं म्हणूनच या अतंर्गत विरोधाभासाने आपल्या मनाचा त्रास, तणाव, असंतुलन आपण या ‘प्रसंग टाळण्याने’ आपल्यावर ओढवून घेतो – त्या प्रसंगाचे बाह्य परिणाम आपल्या अपेक्षेहून कमी दर्जाचे असतात हा मुद्दा तर अलहिदाच!.
मग आता विचार करा : अशी गौण – Suboptional – पटत नसेलही गोष्ट कबूल करुन आपण काय मिळवतो ? कंपनीचा फायदा, आपलं मनस्वास्थ, दुसऱ्या व्यक्तीचा आनंद – काहीच तर हाती लागत नाही. या व्यतिरिक्त प्रसंगाशी, व्यक्तीशी न भिडण्याच्या (या न भिडण्याला ‘भिडस्तपण’ का म्हणतात ते ठाऊक नाही) स्वभावाने आपण आपल्याला जे मनातून बोलायच असतं ते त्या संबंधित व्यक्तीकडे (ज्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे) बोलत नाही, त्यामुळे आपण त्यालाही आपल्या Feedback चा फायदा देत नाही जेणे करुन त्याची चूक (चूकून) झाली असेल तरी त्याला ते कळून न आल्याने ती सुधारायची संधीही आपल्या अशा (संधी) ‘साधू’ स्वभावामुळे त्याला मिळत नाही मग या भिडस्तपणाचं फलित काय?
मला आपल्या या ‘न भिडण्याच्या’ मनस्थितीच्या वर्मावर (किंवा मर्मावर) बोट ठेवायच आहे. या मनस्थितीलाच आव्हान द्यायच आहे. Confrontation ही गोष्ट वाईट आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर ते का वाटत? मुद्यांशी किंवा (मुद्यावर) व्यक्तींशी भिडणं म्हणजे काही भांडणं नाही की कुणावर हेतूपूर्वक दोषारोपण करणं किंवा लांछन लावणं नाही – यात राजकारण असण्याचीही गरज नाही.
Confrontation हे सकारात्मक, सगुणात्मक आहे एका अर्थाने दर्जा उंचावण्यासाठी एकमेकांना गुणात्मक आव्हान देण्याचं माध्यम आहे. आपल्या या वयक्तिक आयुष्यात आपण आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, घरासाठी अशा आव्हानांत भिडत नाही का? मग हे माध्यम आपल्या कार्यक्षेत्रात आपण अधिकाधिक साध्य करण्यासाठी का वापरत नाही. आव्हानं टाळून कधी समस्यानिवारण होत नाही. त्याने फक्त स्वत:च्या मनातला व वातावरणातला ताण वाढत जातो. माझ्या अनुभवावरुन माझा तुम्हाला ठाम सल्ला आहे तो आव्हानांना सामोरं जाण्याचा-डोळा न चुकवता-मान न झुकवता. या प्रक्रियेत संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटा चर्चा # विवाद करा – आपलं मत स्पष्टपणे मांडा- याने नुसतंच तुमचं समस्यानिवारण होणार नाही तर स्पष्टपणे चर्चा झाल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल …. आणि सर्वसाधारण गैरसमजूतीच्या विपरित – तुमचे दुसऱ्या व्यक्तीशी (जिच्याशी तुम्ही नुकताच वाद घातला) संबंधही बिलकूल बिघडणार नाहीत. तुमच्या प्रश्नांना भिडण्याच्या पध्दतीने एकवेळ लोक तुमचे खास स्नेही नाही झाले तरी तुमचा आदर करतील – तुमचे शत्रु खचितच बनणार नाहीत.
आपल्या कार्यक्षेत्रात कदाचित काही व्यक्ती ‘राजकारणी’ असू शकतात – त्यांच्यासाठी Confrontation खुनशीपणाचं आयुध असू शकतं- पण सुदैवाने बरेच लोक तसे नसतात.
म्हणून आपण आपल्या प्रकाराला Construtive controntation (सकारात्मक आमनासामना) म्हणूया- सकारात्मक टिकेसारखं ….. याने आपला आपल्या कंपनीचा झालाच तर फायदाच होतो आणि हे निकोप परस्परसंबंधांना व निकोप कंपनीवाढीसाठी पूरक आहे.
अजूनही जर तुम्हाला थोडीफार शंका असेल तर ही संकल्पना(सकारात्मक आमनासामना)स्वत: स्वत:वर वापरुन का बघत नाही – हा प्रकार तर अधिकच गुणात्मक व प्रेरक (Inspiring) आहे.
यतीन सामंत