सतीश शिवाजी जगताप हे दिलासा केअर सेंटरचे जन्मदाते. सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज हे मूळ गाव असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील जगताप आज नाशिकमध्ये व्याधिग्रस्त अशा ७० जणांचे पालकत्व यशस्वीपणे पार पाडत आहेत. सुधारणा झालेले शेकडो जण पुन्हा आपआपल्या कुटुंबात रमले आहेत. तब्येत व्यवस्थित झालेल्या रुग्णांना नातेवाईकांनी परत घरी नेणे आणि नवीन रुग्णांनी दिलासामध्ये येणे हे चक्र सातत्याने सुरू राहात असल्याने संस्थेतील रुग्णांची संख्या कायम बदलत असते. आजारी, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त, अपंग असे सर्वच प्रकारचे रुग्ण या ठिकाणी पाहावयास मिळतात. संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या घरात जातो. संस्थेस शासकीय अनुदान नसताना नाशिक रन, नसती उठाठेव, कालिका माता ट्रस्ट, मिडास टच, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब यांसारख्या संस्था, अल्कॉन, मायलॉन, वासन टोयोटा, महिंद्र या कंपन्यांकडून विविध स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमुळे आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते. परंतु तरीही संस्थेचे कार्य आणि होणारा खर्च यांचा मेळ बसणे अवघड होते.