• तिथी :

चैत्र शुद्ध पौर्णिमा

  • पार्श्वभूमी :

चैत्र पौर्णिमा हा हनुमानाचा जन्म दिन मानला जातो. या विषयी मतांतरे असुन हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे ही मानले जाते तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा या दिवशी बाल हनुमान सूर्याला धरायला गेला होता, तो हा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात मात्र या दिवशी हनुमान जयंती साजरी होते,

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म सोहळा साजरा केला जातो, या सोहळ्या नंतर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात व महाप्रसाद वाटला जातो.

  • वैयक्तिक व्रत करावयाचे झाल्यास प्रथेनुसार हनुमंताचा जन्मोत्सव प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी साजरा करतात. हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे. सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करावा. नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. हनुमानास रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार अर्पण करण्याची प्रथा आहे. पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करावी. हनुमानभक्तांमध्ये महाराष्ट्रात शनिवारी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुति किंवा दासमारुति पूजेत ठेवतात.