इंटरनेटच्या महाजालात वाचनसंस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. ही संस्कृती जपण्याचे काम गेली ७२ वष्रे आमची संस्था अव्याहतपणे करत आहे. थोर इतिहास संशोधक, कवी आणि नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या नावे सुरू झालेल्या ‘खरे वाचन मंदिर’ या ज्ञानमंदिराने सांगलीतील हजारो वाचकांची ज्ञानाची भूक भागविण्याचे काम केले. केवळ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थीच नव्हे, तर ‘जो जो ज्ञानार्थी, तो तो विद्यार्थी’ या भूमिकेतून हा ज्ञानयज्ञ गेल्या ९४ वर्षांपासून कार्य करतो आहे. खरे मंदिर वाचनालयात आजच्या घडीला ४० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. यामध्ये कथा-कादंबऱ्या तर आहेतच, पण चरित्र ग्रंथ, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत. शाश्वत वाङ्मयाचे महत्त्व ओळखूनच काही चळवळ्या वृत्तीच्या लोकांनी सांगली जिल्ह्यातील मिरजेत सन १९१९ मध्ये वाङ्मयीन चळवळीचे एक रोप लावले. ‘खरे वाचन मंदिर’ या नावाने बहरलेल्या या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीखाली हजारो रसिक आनंद लुटत आहेत.
९ नोव्हेंबर १९१९ या दिवशी या कार्याचा प्रारंभ झाला. काही चळवळ्या कार्यकर्त्यांनी समाजहिताच्या तळमळीतून या दिवशी ‘मिरज विद्यार्थी संघ’ नावाची संस्था स्थापन केली, ज्याद्वारे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागावी यासाठी वाचनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना केवळ पाठय़पुस्तकेच अभ्यासासाठी उपलब्ध झाली तर त्यांचे ज्ञान मर्यादित राहते. अवांतर वाचनाची भूक ज्ञानार्थी व्यक्तीला गप्प बसू देत नाही, पण पुस्तके विकत घेऊन ज्ञानलालसा भागवणे हे प्रत्येकालाच शक्य असत नाही. म्हणूनच या नव्या वाचन चळवळीचा जन्म झाला. स्टुडंट्स युनियन, स्टुडंट्स असोसिएशन व सरस्वती वाचनालय यांचे एकत्रीकरण करून ‘मिरज विद्यार्थी संघा’ची स्थापना करण्यात आली. या संघाने एका वाचनालयाला जन्म दिला – खरे वाचन मंदिर!ही संस्था समाजातील दानशूर व्यक्तींच्या जोरावरच कार्य करत आहे. या संस्थेला आपल्या कक्षा रुंदवायच्या असून त्याचा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले ग्रंथालय तयार करणे, प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे आणि वेबसाइट तयार करणे असे आमचे काही उपक्रम विचारधीन आहेत. नऊ दशकांची परंपरा असणाऱ्या खरे मंदिर वाचनालयात आता बदलत्या काळानुसार काही गरजा निर्माण झाल्या आहेत. संस्थेच्या ज्या इमारतीतून नऊ दशकांपासून हा ज्ञानयज्ञ सुरू आहे, ती इमारत आता जुनी झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. मुक्तांगण सभागृहातील दालनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.
विविध प्रकारचे बाल वाङ्मय, नियतकालिके, कॉमिक्स, नकाशे, शैक्षणिक क्रीडा साधने, संगणकीय साधने, दृक-श्राव्य साधने निर्माण करण्याची संस्थेची योजना आहे. संस्थेच्या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या थोरांचे विचार विद्यार्थी संघाने कॅसेट व सीडीच्या माध्यमातून जतन करून ठेवले आहेत. ही व्याख्याने परत ऐकण्याची संधी श्रोत्याला उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असणारा स्टुडिओ उभारण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. वाचनालयातील पुस्तकांची रचना, मांडणीला आधुनिक रूप द्यायचे आहे. या साऱ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची संस्थेला अपेक्षा आहे. याचबरोरब संस्थेत असलेल्या दुर्मीळ ठेवाही जतन करणे आमचा मुख्य उद्देश आहे.
खरे वाचन मंदिराचे ज्ञानदानाचे कार्य महत्त्वाचे आहे. समाजशिक्षणाचा हा यज्ञ असून हे कार्य सुरू राहिले पाहिजे.’पु. ल. देशपांडे