, ,

किल्ले…

रायगड किल्ला

इतिहास

रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.

महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.  महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. “दीड गाव उंच – देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले – तख्तास जागा हाच गड करावा.”

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.

दळणवळण सुविधा

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा!’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.

गन्स ऑफ पाचाड

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.

पर्यटनस्थळ

शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.

राजगड किल्ला

राजगड

शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजींची सुरूवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी.वर समुद्रसपाटीपासून १,३७६ मी. उंचीवर आहे. पायथ्याच्या गुंजवणे गावापासून पायवाटेने गडावर जाता येते. तेथूनच राजगडचा चढ सुरू होतो. हत्ती, घोडे वगैरे वाहने जातील एवढी रूंदी वाट आहे. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. यावर येण्यास गुंजपा, पाली, आळू व काळेश्वरी असे चार दरवाजे व तीन दिंड्या आहेत.

पद्मावती माची पुष्कळ लांब-रूंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. तथापि सुवेळा व संजीवनी ह्या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ला यांवरही वस्ती होती. खुद्द छ शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर रहात असत. सुवेळा माची साधारण सपाट व चिंचोळी आहे.

उलट संजीवनी माची चिंचोळी असली, तरी पायऱ्‍या पायऱ्‍यांनी खाली व वर चढत गेली आहे. येथील मुख्य देवता पद्मावती; तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. याशिवाय पूर्वी हवालदाराची सदरसुध्द येथेच होती; पण स्वातंत्र्योत्तर काळात ती भुईसपाट झाली आहे. तिन्ही माच्या व बालेकिल्ला यांवर गणेश, मारूती, ब्रम्हर्षि, जननी काळेश्वरी, भागीरथी यांची लहानमोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा इ. कमीअधिक पडीक अवेस्थेतील वास्तू आहेत.

प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर लहानशी बाजारपेठ असून, त्या नमुन्यावरच पुढे रायगडची बाजारपेठ उभारलेली दिसते. या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरूमदेव. याला बहमनी आमदानीत महत्त्व नव्हते; पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. तदनंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम प्रथम गुंजण माळवातील शिलिमकर देशमुखांकडे होते.

शिवाजीने १६४७ नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. यामुळे प्रथम काही दिवस शिलिमकर व शिवाजी यांत कुरबुरी होत असत. शिवाजींनी १६७० पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी व पुढे संभाजीनंतर हा किल्ला एकदोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला; तरी तो सामान्यतः मराठयांच्याच ताब्यात राहिला. छ. शाहूंच्या कारकीर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे.

 

संदर्भ : खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, पुणे, १९६७.

लेखक – ग. ह. खरे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

हरिश्चंद्रगड किल्ला

 

 

स्थान

हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड,

इतिहास

एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

पौराणिक महत्व

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

ऐतिहासिक महत्व

महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास-दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

  • हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
  • केदारश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
  • तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमुर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
  • कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.

गडावर जाण्याच्या वाटा

हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.

  • खिरेश्वर गावातून वाट :
    सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ‘नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
  • नगर जिल्ह्यातून :
    हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.
  • सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग :
    गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून ‘बेलपाडा’ या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच ‘नळीची वाट’ असेही म्हणतात.

गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत राहता येते. गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे आणि पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात.

(संकलित)

माहिती संकलन : छाया निक्रड

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला Shivneri Fort – ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

इतिहास


‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे


सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.

गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्याच एदोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

साखळीची वाट


या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट


शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महारदवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा, या मार्गेकिल्ल्याव्र पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

मुंबईहून माळशेज मार्गे


जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.

या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.

माहिती संकलन – अमरीन पठाण

तिकोना किल्ला

मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात असणाऱ्या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपण ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूरच्या किल्ल्याच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधरणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

इतिहास

इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर छोट्या-फार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासांत सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे, थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या ह्या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाके आहेत तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडेवर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथूनमाघाई फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे ४ तासात संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागु शकतो. सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वरमार्गे आणि दुसरा थेट वासोट्याकडे.

  • बेडसे लेण्यामार्गे : अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणे आणि तिकोना सा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.
  • ब्राम्हणोली मार्गे : अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे येथून लॉंचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.
  • तिकोनापेठ मार्गे : गडावर जाणाई मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेत पासून सकाळी ८.३० ला सुटणारी पॉंड बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते. या वाटेने २० मिनिटांतच बालेकिल्ला गाठता येतो.

पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाके आहेत. गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.

माहिती संकलन – अमरीन पठाण

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला Sinhagad Fort – ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

इतिहास

हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होत पण तो बाटून मुसलमान झाला.

सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळ्यांचा होता त्याने कबूल केले की, ‘कोंडाणा आपण घेतो’, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे युद्ध, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुललोक सावरून, उरले राजपुत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले ‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला.’ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

दारूचे कोठार

दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वसत होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला

रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढणेश्वर

हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके

तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणि म्हणूनहोत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक

दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.

झुंजार बुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यंची समाधानी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाव्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूनेवर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा

पुणे-कोंढणपूर : पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

गडावर राहण्यची सोय नाही. गडावर छोटॆ हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.

माहिती संकलन – अमरीन पठाण

स्त्रोत – मराठीमाती

देवगिरी किल्ला

दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात आणि तोच वृत्तांत आपणासाठी इथे टंकत आहे. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे. या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.

महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.

किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात

किल्ल्यामधे प्रवेश करतांना अनेक मोठे दरवाजे पार करावे लागतात.

आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली

चांद मिनार

आहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.

चांद मीनार. या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात.पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.

20112007118

चीनी महल

भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.

रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या

रंग महाल

सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.(इथेही आता प्रवेश करु देत नाही. पाच रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो.लोकांना याची उत्सुकता असत नाही. आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही. कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे, असे म्हण्तात.)

मेंढा तोफ या तोफेचे मुळ नाव शिकन तोफ होती असे म्हणतात. पण तिच्या आकारावरुन तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलीत आहे. या तोफेवर दोन उल्लेख आहे, संपूर्ण खिताबासहीत एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे. असे मार्गदर्शकाराने सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्याची व्यवस्था आहे.जेणेकरुन दुर-दुर मारा करण्यात यावा.

20112007120

किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी यादवकालीन मार्ग

दरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरुन केलेली दरी दिसते ते साधारणतः पन्नास

20112007121

किल्ल्यावर प्रवेशासाठी आधुनिक लोखंडी पूल.

ते शंभर फूट खोल असावी. इथे या किल्ल्यात वरच्या बाजुला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पुल लोखंडाचा पर्यटकांसाठी केलेला आहे. आणि जुना पुल काहिसा विटा आणि दगडाचा वापर करुन बांधलेला आहे. हाच पुल पुर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभयबाजूंवरील बंधा-यावरुन नियंत्रीत करण्यात येत असे. धोक्याचे प्रसंगी शत्रुसैन्याला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येई. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे. आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य असे वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्याची काही गरज नाही.

20112007129

या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.

डोंगराळ वाटेवरच पाय-याची रांग लागली की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे, तेव्हा केव्हापासून आहे, हे कोणासही निश्चित सांगता येत नाही.

20112007166

बारादरी (बारा दरवाजांचे निवासस्थान )

बारादरी दमलेले पर्यटक जेव्हा पाय-यावरुन वर पोहचतात तेव्हा इथला बारादरीतले भव्य महालाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. बारा कमाणी असलेली ही इमारत आहे, इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड-चुन्याने केलेले दिसते. चुन्याच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथे एक पाणी विक्रेता आहे एक रुपयात एक ग्लास विकून पर्यटंकाची तहान तो भागवतो.इथून पुढे गेले की, पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे कडे जातांना डोंगर पोखरुन एक गुहा इथे दिसते.

एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.

याच गुहेत दोन भाग आहेत. एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे, मोतीटाका हे जलाशयाचे नाव. प्रत्येक रुतुत इथे पाणी साठलेले असते आणि याच साठविलेल्या पाण्यातुन येणा-या पर्यटकांची तहान एक-एक रुपयात बारादरीत ती मिटवीली जाते. पर्यटकांना माहित नसल्यामुळे धुर्त पाणी विक्रेता ते पाणी इथुनच आणून विकतो. सहजपणे, हाताने पाणी घेऊन पीता येणारी जलधारा याच गुहेत आहे.

20112007199

किल्ल्यावरील सर्वात उंच भाग

शिखरावर येईपर्यंत तीन-चार वेळेस बसत-उठत एकदाचा शिखरावर पोहचलो. श्वासोश्वासाची गती वाढलेली होती. थकून गेलो होतो. या पेक्षा वेरुळलेणी पाहणे परवडले असते असे शिखरावर आल्यावर वाटत होते आणि तेव्हाच या उंच जागेवरुन शहरातील आणि आजूबाजूचा डोंगरांचा परिसर नजरेत बसल्यावर येण्याचा थकवा आणि आलेला कंटाळ्याचा विचार दुर निघून गेला. चारही बाजूने उंच उंच दिसणारे डोंगर अत्यंत सुंदर दिसते .बाला हिसार हा शिखरावरील सर्वात उंच भाग आणि इथेच श्री दुर्गा नावाची तोफ

</tr

20112007209

शिखरावरील दुर्गा तोफ

आहे. किल्ल्याचा सर्वात उंच भाग हा आहे. इथेच विजयी द्ध्वज लावण्याची व्यवस्था आहे, थकलेला पर्यटक इथे कितीतरी वेळ नुसता बसून असतो.

अतिशय सुरक्षीत असलेला यादवांच्या किल्ला केवळ फितुरीमुळे सत्तांतर झाले.त्या किल्ल्याचे केवळ आता भग्नावशेष शिल्लक राहिले, ज्यांच्या काळात बोली भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला, ज्यांच्या भरभराटीच्या काळात समृद्ध शेती जीवनाने काळ बहरलेला. होता. यादवांचे प्रशासन, त्यांच्या छत्रछायेत साहित्य आणि कलेने चमोत्कर्ष गाठलेला होता. इतिहासात उल्लेख केलेल्या लुटीचा येणारा उल्लेख… सहाशे मण सोने,सात मण मोती,दोन मण हिरेमाणकं आणि लक्षावधी रुपये, लुटले गेले. यादवांच्या पराभवानंतर झालेली प्रचंड लुटमार, अग्निकांड, आणि विनाशतांडवामुळे देवगिरीचे सौंदर्य पार कोमेजुन गेले. या आणि इतर इतिहासाच्या आठवणीने आम्ही किल्ला केव्हा उतरलो ते कळलेच नाही.

बारादरीवरुन घेतलेले छायाचित्रे

किल्ल्यावरुन दिसणारी तटबंदी

माहिती संकलन – अमरीन पठाण

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *