खडीगंमत

खडीगंमत हे लोकनाट्य विदर्भातील नागपूर , बुलढाणा जिल्ह्यांपासून पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत सादर केले जाते. विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ याप्रकाराचा समावेश होतो. दंडार हादेखील लोकनाट्याचा प्रकार आहे. डफगाणे हे मूळ लोकनाट्य. ते बाराव्या शतकात प्रचलित होते. त्याचे प्रथम ‘खरी गंमत’ व नंतर ‘खडीगंमत’ असे नामांतर होत गेले. महाराष्ट्रात मुसलमानी स्वा-यांच्या काळात ‘खडीगंमत’ या लोकनाट्याचे सादरीकरण होऊन नंतर त्याचे ‘तमाशा’ हे रूपांतर झाले.

हातात डफ घेऊन खड्या आवाजात गायन करणारा हरहुन्नरी शाहीर हे त्या नाट्यातील प्रमुख पात्र असते. त्याच्या सोबती

ला मनोरंजन करणारा गमत्या असतो. शिवाय, नखरेबाज नाच्या असतो.

खेळ तो येणेची खेळावा ,
नट तो येणेची नटावा,

लोकधाटी परंपरेत नर्तिका आणि नर्तक हे शिष्ट शब्द अनुक्रमे ‘नाची आणि ‘नाच्या` म्हणून संबोधले जातात. नाच्याची परंपरा ढोलकी फडाच्या तमाशात आहे. तशीच ती खडीगंमत आणि आदिवासी ठाकर समाजाच्या तमाशात आढळून येते. तो स्त्रीवेशधारी गोंडस मुलगा असतो. त्याचे ‘लमडा’ हे झाडीबोली तील नाव आहे. सोबत, ढोलकी वाजवणारा असला की ‘खडीगंमत’ उभी राहते. खडी हा हिंदी शब्द आहे. रात्री दहा वाजता सुरू होणारी ‘खडीगंमत’ सूर्योदयापर्यंत चालते
‘तमाशा’ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागात तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा आणि ढोलकीफडाचा तमाशा असे तमाशाचे दोन स्वतंत्र प्रकार असले तरी विदर्भातील

खडीगंमत आणि प. महाराष्ट्रातील तमाशा हे एकाच प्रकृतीपिंडाचे प्रयोगात्मक लोककला प्रकार आहेत.विदर्भातील बुलढाण्यापासून गोंदिया पर्यंत खडीगंमत सादर केली जाते. घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते. खडीगंमत ही पूर्णत: पुरुषप्रधान लोककला आहे. विदर्भात दर्या, पांगूळ, डहाका, झडती, मंत्रगीते, दंडीगान, भिंगी सोंग, राध, डरामा, दंडार आदी लोककला प्रकार प्रसिद्ध आहे. त्यातील खडीगंमत हा प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून खडीगंमतची मोहिनी जनमानसावर आहे.

सोंग संपादिता तोखलेपणें
नटासि दीजेती वस्त्रे भूषणें
तो सोंग लटिका, परि ती भूषणे
नटासिची अर्पिती

दंडार, डफगाण, खडीगंमत आदी लोकनाट्ये ही एकाच परंपरेतील आहेत. मनोरंजन करणार्‍यास ‘गमत्या’ असे म्हटले जाते. तमाशात जसा सोंगाड्या तसा खडीगंमत या लोककला प्रकारात ‘गमत्या’ असतो. ‘गमत्या’ म्हणजे ‘गमज्या’ मारणारा. ‘गमज्या’ म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण बडबड करणारा.’गमत्या’ च्या ‘गमज्या’ या अर्थहीन बडबड वाटत असली तरी त्यामागे लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ असतो. ‘गमत्या’ सारखे पात्र लळित, दशावतार, भागवतमेळे या सारख्या भक्ती नाट्यांमधून आढळते..
‘खडीगंमत’ मध्ये ढोलकी, डफ, चोनका (म्हणजे प.महाराष्ट्रातील चौंडक) टाळ ही वाद्ये वापरली
पूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश होतो. उर्वरित भाग उत्तररंगात येतो.
उत्तर रंग :
उत्तररंगात छिटा व दोहा, धमाळी व पोवाडा बैठी गंमत, बैठी दंडार व मुजरा अर्थात भरतवाक्याने खडी गंमतीचा उत्तररंग रंगतो त्यामुळे खडीगंमत पाहण्यास आलेला प्रेक्षक उत्तररंगाचीच वाट पाहत असतो.

छिटा व दोहा :
खडीगंमत अधिक आकर्षक होत असतांना कलगी व तुरा या दोन घटाण्याच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमांमुळे मास दुय्यम असा झाडी शब्द खडीगंमत वापरते. यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय छिटा हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. चार ओळीचा ‘दोहा’ यास फार महत्त्व असते. ‘जवाबी दोहा’ हा त्याचाच एक प्रकार असतो. झगडा हा अन्य रचना प्रकार ऐकायला मिळतो. जवाबी झगडा ‘जोड झगडा’ हे त्याचे अन्य प्रकार असतात. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. कडव्याच्या एका लावणीत प्रश्न असतो दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जाते. तर कधी एकत्र उत्तर सादर केले जाते.
धुमाळी व पोवाडे :
‘धुमाळी व पोवाडा’ हे दोन अन्य रचनाप्रकार खडीगंमत वापरत असते. धुमाळी हा शब्द परंपरागत संगीतातील असला तरी झोपेची डुलकी घेत असलेल्या प्रेक्षकाला खडबडून जागे करण्याचे कार्य ही खडीगंमतची धुमाळी करीत असते.
पोवाडा:
खडी गंमत गात असलेला पोवाडा हे दिर्घकाव्य असते. तब्बल एक-दोन तास चालणारे हे प्रदीर्घ गीत असते.प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ‘सत्यवान सावित्री, चिलिया बाळ’ भक्त ध्रुव, अभिमन्यू वध अशा पौराणिक कथा शिवाय ऐतिहासिक व सामाजिक घटनावरही प्रतिभावंत ग्रामिण लोककलावंतांनी प्रदीर्घ पोवाडे लोकांना खिळवून ठेवतात. उदा. टिळकांचा पोवाडा, गांधीवधाचा पोवाडा, नर्मदेच्या पूराचा पोवाडा, खाण्याचा पोवाडा… इत्यादी
बैठी गंमत -बैठी दंडार :
पोवाडा हा रचना प्रकार उभ्याने गाण्यापेक्षा बसून गाण्यात खरी मजा असते. म्हणूनच खडी गंमत ही अनेकदा बैठी गंमत रुपातही सादर केली जाते.विशिष्ट सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने कोणाच्या वाड्याच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थित ही बैठी गंमत रात्रभर सादर केली जाते. नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा, होळी, गौर, शिवरात्री ही त्याकरिता निमित्ये असतात.
संपादणूक अर्थात बतावणी :
लावणीचे गायन आपल्या खड्या आवाजात शाहीर करीत असतो. त्या लावणीतील वर्णनानुसार अन्य पात्रे संवाद व अभिनय यांच्या सहाय्याने संपादणूक करीता असतात, तीला बतावणी म्हणतात.बतावणी हा खास झाडीबोलीतील शब्द आहे.
मुजरा :
रात्र संपायला येते. प्रभातरंग दिसायला लागतो. तरी खडी गंमत आपला पसारा आवरता घेते. शेवटला निरोप द्यायची तयारी करु लागते. भरतवाक्य गायला प्रारंभ करते. भरतवाक्याला खडी गंमत मध्ये ‘मुजरा’ हे स्वतंत्र नाव आहे.या वेळी देवदेवतांचे आणि गुरुचे स्मरण केल्या जाते.
खडीगंमत या विदर्भातील लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप खस करून सूर्याच्या प्रार्थनेने होतो.

(साभार-
लेखकः डॉ.प्रकाश खांडगे)