ओवी (जात्यावरची गाणी) हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टुभ छंदात आढळतो असे मानले जाते.
मराठी ओवीचा उगम इसवी सन ११२९ पर्यंत मागे नेता येतो. त्या काळातल्या सोमेश्वरकृत अभिलषितार्थचिंतामणी नामक ग्रंथात ओवीचा पुढीलप्रमाणे उल्लेख आला आहे – महाराष्ट्रेषु योविद्भिरोवी गेया तु कण्डने।

महाराष्ट्रातल्या स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात, असा त्याचा अर्थ आहे. वरील अवतरणात ओवी ही संज्ञा छंद या अर्थी योजिली आहे. महानुभाव पंथात इसवी सनच्या १६व्या शतकाच्या अखेरीस भीष्माचार्य नामक एक ग्रंथकार झाला. त्याने मार्गप्रभाकर या आपल्या ग्रंथात दिलेले ओवीचे लक्षण असे – गायत्रीछंदापासौनी धृतिपर्यंत। ग्रंथ वोवीयांचे तीन चरण जाणावे मिश्रित। प्रतिष्ठे पासौनि जगतीपर्यंत। चौथा चरण॥

अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला

अरे खोप्यामधी खोपा

सुगडिणीचा चांगला

पहा पिल्लासाठी तिनं

झोका झाडाला टांगला

पिल्लं निजती खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिल्लांमधी जीव

जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी

जरा बघ रे माणसा

तिची उलूशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुले दिले रे देवानं

दोन हात, दहा बोटं

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली

माझी माय सरसोती

माले शिकवते बोली

लेक बहिनाच्या, मनी

किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा

तुझं गीता-भागवत

पावसात समावतं

माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन

झालं झालं, आपससूक

हिरिदात सूर्याबापा

दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल

लागे पानापानांमधी

देवा तुझं येनंजानं

वारा सांगे कानामधी

पावस गावामंदी, कोण बसल पारावरी

पावस गावामंदी, कोण बसल पारावरी

स्वरूपानंद गुरु,गुरु वाचितो ज्ञानेश्वरी .

दत्ताच्या देवळात,कुणी लाविली तेलवात ,

स्वरुपानानाद गुरु,गुरु ध्यानस्थ मंदिरात

पावस गावामंदी ,कोण योगी ग राहतो

स्वरूपानंद गुरु ,सोहम साधना करतो

टाळ चीपळयाचा नाद ,ऐकू येतोय ठायी ठायी

गुरूची माज्या दिंडी ,आली चालत पायी पायी

पावसेचा लौकिक ,सातासमुद्रा कसा गेला

गोडबोलेंचा आप्पा ,स्वामी स्वरूपानंद झाला||

गुरूच माज्या पाय

गुरूच माज्या पाय ,लोण्यापरास हायत मऊ,

बाळ माज्याला किती सांगू ,चाल दर्शन दोघ घेऊ .

गुरूच माज्या पाय ,जस लोण्याच गोळ….

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे...

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ २-१५९ ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ २-१६० ॥

महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ २-१६१ ॥

सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ७-३२ ॥

ज्ञानेश्वरी

नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती...

नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥

योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥

भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥

आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥

नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥

ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥

दासबोध

पहीली माझी ओवी | पहिला माझा नेम ।

पहीली माझी ओवी | पहिला माझा नेम ।

तुळशीखाली राम ।

पोथी वाचे ॥

पैली माजी ओवी

गाई एक एका

ब्रह्मा विष्णू देखा

हारोहारी

तीसरी माझी ओवी ।

त्रिनयना ईश्वरा ।

पार्वतीच्या शंकरा ।

कृपा करा॥

तिसरी माझी ओवी

तिन्ही प्रहराच्या वेळी

ब्रम्हा विष्णू वरी

बिल्वपत्र.

सुनेला सासुरवास करू ग कशासाठी ।

सुनेला सासुरवास करू ग कशासाठी ।

उसामधे मेथी लावली नफ्यासाठी।

सदा सारवण मला अंघोळीची घाई।

पाव्हनी काय आली घाटमाथा कमळजबाई।

स्वप्नात आली हिरव्या पाटलाची नार।

घाटमाथा कमळजबाई गळा पुतळ्याचा हार।

आई कमळजाबाई घाटावर उभी राहे।

तुझ्या माहेराची हवा कोकणाची पाहे।

उगवला नारायण|

पयली माझी ओवी गं ! मायंच्या मायंला।

लोढणं व ढाळ्या गायीला।

उगवला नारायण| लाल आगीचा भडका |ल्योक दुनियेचा लाडका ||

उगवला नारायण | लाल शेंदराचा खापा फुले अंगणात चाफा ||

उगवला नारायण |आला पहाड फोडुनी | दिले सुरुंग लावूनी ||

उगवला नारायण | आला केळीच्या कोक्यातूनी | किरणं टाकितो अंगणी ||

उगवला नारायण | सारी उजळे दुनिया | किती लावाव्या समया ||

सावळी भावजय।

सावळी भावजय। जशी शुक्राची चांदणी।

चंद्र डुलतो अंगणी। भाऊराया।

आईबापानं दिल्या लेकी। तिला सासुरवास कसा।

आईबापानं दिल्या लेकी। तिला सासुरवास कसा।

चितांगाचा *फासा । गळी रूतला सांगू कसा।

पट्ट्यासारखा गळ्यात घालायचा सोन्याचा दागिना

माझ्या ग उंबर्‍यावरी| ***** बाळ बसे |

मला सोन्याचा ढीग दिसे |*****बाळ ||

माझ्या गं दारावरनं । मुलांचा मेळा गेला ।

त्यात मी ओळखिला । माझा बाळ ॥

अंगाई येगं तुगं गाई । पाखराचे आई ।

तानियाला दूध देई । वाटी मधे ॥

आमुचा **** बाळ । खेळाया जाई दूर ।

त्याच्या हातावरि तूर । कोणी दिली ॥

आमुचा **** बाळ । खेळाया जाई लांब ।

त्याच्या हातावरि जांब । कोणी दिला ॥

माझ्या गं अंगणात । सांडला दुधभात ।

जेवला रघुनाथ । … बाळ

नवरी पाहू आले । आले सोपा चढुनी |

नवरी शुक्राची चांदणी । आमुची ….. ||

माझ्या गं अंगणात | शेजीचे पाच लाल |

त्यात माझी मखमल |***** ताई||

ये गं तू गं गाई| चरूनी भरूनी|

बाळाला आणुनी| दूध देई||

गाईंचा गुराखी| म्हशींचा खिल्लारी|

बाळाचा कैवारी| नारायण||

तिन्हीसांजेची ही वेळ| वासरू कुठं गेलं||

नदीच्या पाण्या नेलं|—-||

पालख पाळणा|मोत्यांनी विणिला||

तुझ्या मामानं धाडीला| —- बाळा||

गाईच्या गोठनी वाघ हंबारला |

कृष्ण जागा झाला गोकुळात||

भाऊ वाचे पोथी, येऊं दे रे कानांवर...

भाऊ वाचे पोथी

येऊं दे रे कानांवर

नको भूकू रे कुतर्‍या

तुले काय आलं जरं !

कधीं बाप जल्मामधीं

घडूं नहीं ते घडलं

जसं कंगूल्याचं लेंकरू

बंगल्यावरती चढलं !

गेला वांकडा तिकडा

दूर सगर दिसला

जसा शेताच्या मधून

साप सर्पटत गेला !

कडू बोलतां बोलतां

पुढें कशी नरमली

कडू निंबोयी शेंवटी

पिकीसनी गोड झाली !

‘फाट आतां टराटर,

नहीं दया तुफानाले

हाले बाभयीचं पान

बोले केयीच्या पानाले !

उच्च्या खुज्या जोडप्याची

कशी जमली रे जोड

उगे ताडाखाली जसं

भुईरिंगनीचं झाड !

हिरवे हिरवे पानं

लाल फय जशी चोंच

आलं वडाच्या झाडाले

जसं पीक पोपटाचं !

पयसाचे लाल फुलं

हिर्वे पानं गेले झडी

इसरले लाल चोंची

मिठ्ठू गेले कुठें उडी ?

सोमवती आमावस

कशी आंधारली रात

देल्ही रातांध्याच्या हाती

पेटयेल काडवात !

कशी दाखईन रस्ता

आली आंधार्‍याची रात

कसा देईन रे दान

सांग बुझार्‍याचा हात ?

तुझी म्हईस ठांगय

नको रुसू लतखोर्‍या

माझी म्हईस दुभती

नको हुसूं रे शेजार्‍या

हिच्या तोंडात साकर

आन पोटांत निंबोनी

मोठी आली पट्टवनी

सार्‍या मुल्खाची लभानी !

अरे आरदटाकेला

तुले कशाचं हिरीत

तशी निझूर शेताले

काय सांगे बरसात?

नागरलं शेत

खूप केली मशागत

पेरल्या मुकन्या

मारे गानं गात गात !

फाटी गेलं पांघरून

नको बोचकूं रे चिंध्या

झालं गेलं पार पडी

नको काढूं आतां गिंध्या !

तुले परनलं पोरी

झाल्या जल्माच्याज भेटी

दिल्लीचं बिलूबांदर

आनी देलं तुझ्यासाठीं !

घरांमधी सर्वे गोरे

तूंच कशी कायीघूस

उज्या जवारींत आलं

जसं कान्हीचं कनूस !

माझं उघडे नशीब

पीकं शेतांत दाटलें

तुझे जवून शेजार्‍या

कसे डोये रे फूटले ?

रुशी बसे वर माय

तिचा रुसवा रे केवढा ?

“म्हने पापड वाढला

कसा वांकडा तिकडा?”

हाया समोरची शाया

पोरं शायेतून आले

हुंदडत हायाकडे

ढोरं पान्यावर गेले

पिको आराटी बोराटी

नको शेतामधी बांद

बरी बिरान्याची मया

होऊं नहीं भाऊबंद

शेतकर्‍या तुझे हाडं

शेतामधीं रे मुडले

मुडीसनी झाली राख

तापीमाईंत पडले

माझी कपीला तान्हेली

कशी पान्यावर गेली

तिले गार्‍यानें गियली

आन् पान्यानेज पेल्ही

रस्त्यानं चालली

मायबहीन आपली

मांघे फीरी पाह्यं

पाप्या, धरत्री कापली

घाम गायतां शेतांत

शेतकरी तरसला

तव्हां कुठें आभायांत

मेघूराया बरसला !

मेहेरूनचा तलाव

नहीं लहान सहान

आज त्यानं भागवली

जयगांवाची तहान

अरे, वाहत वाहत

आली नदी ‘मेहेरूनी’

तिले म्हनूं नका लेंडी

भागवते धोनं पानी !

वटवट्या नारी

तुले वटक्याची सव

तुले देल्हा जल्म

कोन नितातेल देव?

वाटेचं वावर

काटीकुपाटीनं बंद

निस्सवली नार

काय करती भाऊबंद ?

सावकारा, तुझं मन

मन मोहरी एवढं

तुझं राकेसाचं डाच

तुझं पोट केव्हढं ?

देवा, घेनं जलमनं

खुटेनाज तुझ्या दारीं

तसं देनं न मरनं

सुटेनाज सवसारीं

अरे पांडुरंगा, तुझी

कशी भक्ती करूं सांग ?

तुझ्या रूपापुढे येतं

आड सावकाराचं सोंग

डोये लागले आभायीं

मेघा नको रे बरसूं,

केली नजर खालती

माझे शीपडले आंसू

भरली येहेर

मोट चाले भराभर

कशाले करतं

कनाचाक कुरकुरं

वसांडली मोट

करे धो धो थायन्यांत

हुंदडत पानी

जसं तान्हं पायन्यांत !

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना पारंपारिक गाणी गायच्या त्यांची गोडी अवीट होती म्हणूनच बहिणाबाईंची ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते. सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा पारंपारिक गाणी आहेत. ह्या गाण्यांचा शोध हा विभागाचा उद्देश. आपणही आपल्यालाला अशी गाणी माहिती असल्यास marathoglobalvillage@gmail.com वर जरूर पाठवा.