“पंढरपूर” येथे HIV/AIDS ग्रस्त बालकांचा “पालवी” प्रकल्प चालू आहे.

अनाथ एड्सबाधित मुले-मुली आणि महिलांना आयुष्य सुखाने व आनंदाने जगता यावे, म्हणून मंगलताई शहा यांनी त्यांची मुलगी डिंपल घाडगे हिच्या साथीने पंढरपूरमध्ये ‘पालवी’ हे पुनर्वसन केंद्र सुरू केले. इथल्या मायेच्या स्पर्शाने अशा मुलांच्या आयुष्याला आता खऱ्या अर्थाने पालवी फुटली आहे.

मरण कोणालाच टळले नाही. परंतु काहींना आयुष्यात मरणयातना जास्त भोगाव्या लागतात. एड्सबाधितांचेही तसेच आहे. त्यांना शारीरिक यातनांसोबतच समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा त्रासही सोसावा लागतो. त्यांच्या या व्यथा कमी करण्यासाठी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंगलताई शहा यांनी पुढाकार घेतला. दानशूर व्यक्तींचे सहकार्यही त्यांनी घेतले. त्यामुळे ‘पालवी’ या प्रकल्पात आज ११० एड्सबाधित विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एड्सबाधित पाच अनाथ महिलांनाही तेथे आधार मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात सेवातीर्थ प्रकल्पाच्या माध्यमातून, ‘एचआयव्ही’ची लागण झालेल्यांच्या पुनर्वसन केंद्राचा साडेचार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.घाडगे यांच्यासह मंगलताई शहा

पंढरपूर-कराड रस्त्यावर पंढरपूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पालवी हा प्रकल्प आहे. खरे तर हा केवळ प्रकल्प नसून पंढरीच्या वाटेवरील एक सेवातीर्थच म्हणावे लागेल. कारण इथे रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त प्रेमाने बालकांचा सांभाळ केला जातो. प्रस्तुत प्रतिनिधीने गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला भेट दिली, तेव्हा मंगलताई दोन-तीन महिन्याच्या एका गोंडस बाळाला मांडीवर घेऊन मायेने थोपटत होत्या. बाळ रडू लागले तर त्याला बाटलीतून प्रोटीनयुक्त पाणी पाजत होत्या. बाळ शांत झोपी गेल्यावर मंगलताईंशी संवाद साधता आला. तेव्हा ताईंनी त्या बाळाच्या जन्माची कहाणी सांगितली. साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी एक ‘एचआयव्ही’बाधित महिला ‘पालवी’त दाखल झाली होती. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले होते. दोन मुली असल्यामुळे पुढच्या आयुष्यासाठी तिला कोणाचा तरी आधार हवा होता. तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीने ते पाळले नाही आणि तोपर्यंत फार उशीर झाला होता. अखेर ती महिला पाचव्या महिन्यात ‘पालवी’त दाखल झाली. तिथेच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर ती बाळाला मंगलताईंच्या कुशीत ठेवून निघून गेली. आता या बाळाची आई बनून मंगलताई त्याला वाढवत आहेत. अशा प्रकारे मंगलताई आणि त्यांची मुलगी डिंपल घाडगे यांनी आजवर ११० बालकांचा सांभाळ केला आहे.

मुलांच्या शिक्षणाचीही सोय संस्थेत आहे.परमेश्वराला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्याने आई तयार केली असावी, असे म्हणतात. परंतु, काळजावर दगड ठेवून आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून देणाऱ्या अनेक महिलांचीही उदाहरणे आहेत. अशा बाळांचा या केंद्रात सांभाळ करावा लागत आहे. त्यातही एचआयव्ही संसर्गित बालकांचा सांभाळ करणे ही अवघड गोष्ट आहे.

‘एचआयव्ही’बाधित लोकांना स्वीकारायला समाज आजही तयार नाही. अशा परिस्थितीत या मायलेकी मात्र त्या बाळांच्या आई-आजी बनून त्यांच्यावर माया करतात. ही अर्थातच वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीय ती. आईविना नवजात बालकाचे संगोपन करणे ही अवघड गोष्ट आहे. ही कामे एक आईच करू शकते. तिथल्या बालकांचा आहार, विहार व मोठ्या मुलांच्या शाळेचे नियोजन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आरोग्याची खास अशी काळजी घेतली जाते.

संस्थेतील मुलांनी बनवलेल्या वस्तू

‘अशा मुलांचे संगोपन करण्याचे बळ तुमच्या अंगात कुठून येते,’ असे विचारल्यावर त्या म्हणतात, ‘ही मुले हीच आमची शक्ती आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला, कोणताच शीण वाटत नाही.’ इथे या मुला-मुलींचे केवळ संगोपनच केले जात नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना सन्मानाने आयुष्य जगता यावे म्हणून त्यांना हातरुमाल, गोधड्या, शुभेच्छापत्रे, पर्यावरणपूरक आकाशकंदील, पर्स, पणत्या इत्यादी वस्तू बनवण्याचे, तसेच शिलाईचे प्रशिक्षणही दिले जाते. २००१मध्ये दोन मुलांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता इयत्ता दहावीपर्यंतची शाळा सुरू करावी लागली आहे. या मुलांकडून दररोज प्रार्थना म्हणून घेतली जाते. योगासने करून घेतली जातात. समाजाप्रति आपुलकी वाढावी म्हणून येथील मुले कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत जाऊन त्यांची सेवा करतात. या मुलांना अजूनही समाज स्वीकारत नाही. म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असल्याचे मंगलताईंनी सांगितले.

‘संस्थेतील पाच वर्षांच्या एका मुलाच्या डोक्याला जखम झाली होती. ती लवकर भरून येणार नसल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले होते. आम्ही त्याच्यावर उपचार करण्याचे थांबवले नाही. त्यामुळे त्याची जखम पूर्ण बरी झाली आणि त्याचे प्राण वाचले. आज तो मुलगा सतरा वर्षांचा झाला आहे. या गोष्टीतून मला सर्वांत जास्त आनंद मिळाला,’ असे मंगलताईंनी सांगितले. या मुलांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी म्हणून डिंपलताई कोणत्याही कार्यक्रमाला जाताना यातील एखाद्या लहान बाळाला स्वतःच्या मुलाप्रमाणे अगदी अभिमानाने कडेवर घेऊन जातात. मायलेकीच्या या मायेमुळे या संस्थेत आता गोकुळ नांदत आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    Prabha-Hira Pratishthan

    4588/1 Ashish food products,

    Gatade Plot, old Karad Naka,

    Pandharpur,

    Dist-Solapur,Maharashtra,India.

    PIN -413304

  • दूरध्वनी

    +91 9860069949 /

    +91 9970169949