पट्टागड

सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढ, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे तर औंढ, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव विश्रामगड असे देखील आहे.

इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ.स.१६७१ मध्ये जिकूंन घेतला.

पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.

शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण ‘विश्रामगड’ असे केले. जालानापूरची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली.

१६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. औंढा किल्ल्याकडून येणा-या वाटेने किल्लावर पोहोचल्यावर (वाट२) समोरच पाण्याचे एक टाके लागते. पाण्याच्या टाक्यापासून दोन वाटा निघतात. एक डावीकडे तर दुसरी उजवीकडे.

उजवीकडच्या वाटेने पुढे गेल्यावर थोडाच अंतरावर पाण्याचे टाके आहे. उजवीकडच्या माथ्यावर आता काहीच शिल्लक नाही म्हणून आता डावीकडच्या माथ्यावर वळावे. पाऊण तास पुढे गेल्यावर दोन पाण्याची टाकी आढळतात. समोरच एक मोठी इमारत आहे.

इमारतीच्या भिंती आणि छप्पर अजूनही शिल्लक आहे. समोरच किल्ल्याची आडवी तटबंदी आहे. तटबंदीच्या वरच्या भागावर दोन मोठा गुहा आहेत. समोरच सात पाण्याची टाकी आहेत. गुहा रहाण्यासाठी उत्तम आहेत. तटबंदीच्या खालच्या बाजूला गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिराच्या समोरच उत्तरमुखी दरवाजा दिसतो. त्याची कमान आजही शाबूत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. मंदिर आणि बुरुजाच्या खालच्या बाजूस उतरलं की दोन गुहा लागतात. एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य आहे

तर दुस-या गुहेत अलीकडेच गावाचा दवाखाना आहे. येथून खाली जाणारी वाट पट्टावाडीत जाते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा : इगतपुरी – घोटी मार्गेटाकेद : इगतपुरी – घोटी मार्गेटाकेद गाव गाठावे. टाकेद पर्यंत पोहचण्यास १ तास लागतो. टाकेद वरून कोकणवाडी या वाडी पर्यंत जीपसेवा उपलब्ध आहे. टाकेद ते कोकणवाडी हे अंतर पाऊण तासाचे आहे. कोकणवाडीला येण्यासाठी दुसरी वाट एकदरा गावातून सुद्धा जाते. टाकेदच्या पुढेच हे एकदरा गाव आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पट्टावाडी हे गाव मुळातच डोंगराच्या पठारावर बसलेले आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. गावातून किल्ल्याचा माथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.

इगतपुरी-भगूर बसने कडवा कॉलनी : दुसरी वाट औंढ किल्ल्याकडून येते. इगतपुरी-भगूर बसने कडवा कॉलनी गाठावी. कडवा कॉलनी पासून निनावी गावात यावे. निनावी गावात औंढ किल्ल्याची डोंगसोंड खाली उतरलेली आहे. यावरून वर चढून गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठारावरून उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण औंढाच्या पायथ्याशी पोहोचतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी वाट दुभागते. उजवीकडची वाट औंढ किल्ल्यावर जाते तर, सरळवाट पट्टा किल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून पुढे गेल्यावर समोरच पठार लागते. पठारावर देवीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी वाट पुढे दुभागते.डावीकडची वाट पट्टावाडीत जाते तर सरळ डोंगरसोंडेवर चढणारी वाट वीस मिनिटात एका कातळकडा पर्यंत पोहचते. कातळकडाच्या डावीकडची वाट कडाला चिकटूनच पुढे जाते. सुमारे २० मिनिटांत आपण दोन डोंगराच्या मध्ये जाते. समोरच पट्टाची तटबंदी आहे. वाटेतच एक पाण्याचे टाके लागते.

राहण्याची सोय :
– किल्ल्यावर दोन मोठा गुहा आहेत. गुहेमध्ये ५० जणांची राहण्याची सोय होते.
– पट्टावाडीत सुद्धा राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पट्टावाडीतून अर्धा तास लागतो.