रघुनाथ अनंत माशेलकर


रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.[२] रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. माशेलकरांच्या आई शिक्षित नव्हत्या. मात्र मुलाला जगातले सर्वोच्च शिक्षण देईन, असा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. आईच्या आग्रहामुळे माशेलकरांनी बीकेमला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाची पीएच.डी. प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.

त्यानंतर, अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी – एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) येथे संचालक म्हणून नेमणूक झाली. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका व युरोपमध्ये निर्यात होत आहेत. पॉलिमर सायन्स व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची अन् संशोधनाची क्षेत्रे होत.

सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे महासंचालक झाल्यानंतर त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती ह्या सूत्रावर भर दिला. या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी कार्यान्वित केल्या, तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले. बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे. ‘Patent or Perish’ असा इशाराच त्यांनी दिला होता. हळद, बासमती व कडुलिंब यांच्या पेटन्ट्सबाबतचा लढा यशस्वीपणे लढून त्यांनी अमेरिकेकडून ही पेटन्ट्स परत मिळवली. ‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. माशेलकरांचा उल्लेख हळदीचे अन् बासमतीसाठी भारताला मिळालेल्या पेटंटशिवाय पूर्ण होत नाही. ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार यांसह अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांचे जीवनकार्य तरुणांकरिता नेहमीच प्रेरणास्थानी ठरावे.

त्यांनी ‘रीड इंडिया’ ही मोहीम हाती घेतली आहे. डॉ. माशेलकरांना अनेक मानसन्मान लाभले असून पन्नासाहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री (१९९१), पद्मभूषण (२०००), शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (२००१), मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल ॲवॉर्ड (२००२) व महाराष्ट्र भूषण (२००३) हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगत्‌विख्यात रॉयल सोसायटी, लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली. जागतिक स्तरावरील माशेलकर यांचे वैज्ञानिक कार्य लक्षात घेऊन रॉयल सोसायटीने त्यांचा दि. १७ जुलै १९९८ रोजी सन्मान केला. अमेरिकन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या जगत्‌विख्यात संस्थेवर माशेलकरांची मानद सल्लागार म्हणून निवड करण्यात आली (मे, २००५). हा मान मिळविणारे ते केवळ सातवे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. विश्वचरित्र संशोधन केंद्र, पर्वरी (गोवा) येथे संपादित झालेल्या मराठी विश्वचरित्र कोशाच्य प्रकल्प संस्थेचेही ते सन्माननीय अध्यक्ष होते. सध्या डॉ. माशेलकर कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे महासंचालक आहेत