१९३५ मध्ये धुळ्यात श्री समर्थ वाग्देवता मंदिराची निर्मिती झाली. जुनी कागदपत्रे, त्याची बाडे, पोथ्या, ग्रंथ, काव्यरचना, पत्रव्यवहार आणि अन्य साहित्यसाधनांचे जतन या मंदिरात मोठय़ा निगुतीने करण्यात आले आहे. हे सारे वाङ्मय समर्थ रामदास, त्यांचे शिष्य आणि तत्कालीन साधुसंतांचा स्पर्श अनुभवलेले. आज या सगळय़ा वाङ्मयाचे जतन करणे, अभ्यासक-संशोधकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, अद्ययावत संग्रहालयाची उभारणी ही संस्थेपुढची तातडीची कामे आहेत. पण आर्थिक पाठबळाअभावी या सर्व योजना आजतरी कागदावरच आहेत. केवळ निधीअभावी लांबणारा हा प्रत्येक दिवस या ‘वाङ्मया’विषयी काळजी वाढवतो आहे. त्याचीच चिंता या विश्वस्तांना रोज भेडसावते आहे.

ताडपत्र – ताम्रपटांवरचे लेख, प्राचीन बखरी, पोथ्या, अन्य संतांचे साहित्य, श्रीकल्याणस्वामींनी रेखाटलेले हनुमानाचे चित्र आणि कल्याणस्वामींचे त्याकाळी काढलेले चित्र, सचित्र पंचरत्न गीता, एकनाथी भागवताची ऐतिहासिक प्रत, देवांचा गांधी-सावरकरांबरोबरील पत्रव्यवहार, टिळकांनी भेट दिलेली ‘गीतारहस्य’ची प्रत असे काय काय पाहायचे होऊन जाते. वाङ्मय मंदिराचे हे सारेच देव्हारे आपले भान हरपून टाकतात.समर्थाघरची ही ज्ञानपोई गेली ऐंशी वर्षे सारस्वतांची तहान भागवत आहे. देवांच्या पाठी त्यांच्या अनुयायांनी हा ज्ञानयज्ञ आजही त्याच आस्थेने सुरू ठेवला आहे. प्राचीन वाङ्मयाच्या जतन, संशोधन, अभ्यासाचे काम आजही त्याच गतीने सुरू आहे. हे सर्व कार्य केवळ दानशूरांच्या मदतीवर चालू आहे. वाङ्मय संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या या संस्थेच्या नावात ‘मंदिर’ हा शब्द आहे म्हणून आजवर सरकारी अनुदान नाकारण्यात आले.

प्राचीन वाङ्मयातील या पानापानांवर तत्कालीन समाजाचे दर्शन घडते. त्याची जडण-घडण, सुरू असलेली आंदोलने समजतात. या साऱ्यांचा वेध इथे सतत सुरू असतो. वाग्देवतेच्या या मंदिरातून आजवर शेकडो अभ्यासकांनी नवनव्या विषयांमध्ये संशोधन केले आहे. या संशोधनावरच संस्थेतर्फे आजवर १६५हून अधिक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

‘मनाचे श्लोक’ हे समर्थाचे एक अक्षरवाङ्मय! मानवी जीवनमूल्यांची ही ‘गीता’ समर्थानी चाफळ येथे ध्वनित केली आणि त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी ती उतरवून घेतली. कल्याणस्वामींनी लिहिलेला हा मूळ ग्रंथच इथे पाहण्यास मिळतो. २०५ श्लोकांचे हे काव्य इथे ९२४ पानांवर विसावले आहे. या पानांवरची सुंदर अक्षरवाटिका लक्ष वेधून घेते. शिवछत्रपती महाराजांचे हस्ताक्षर, समर्थ रामदासस्वामी लिखित पोथी, ‘गीत गोविंद’ची अस्सल मूळ प्रत अशा हजारो दस्तऐवजांचा ठेवा या संस्थेकडे आहे. महाराष्ट्राचा हा वारसा जपण्यासाठी आपणही पुढाकार घेऊ या..

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    श्री समर्थ सेवा मंडळ, मु. पो. सज्जनगड, जि. सातारा, महाराष्ट्र, भारत.
    पिनकोड – 415 013

  • दूरध्वनी

    0216 2278019