भारताच्या इतिहासातील “स्वराज्य” या संकल्पनेतून आता पंतप्रधान नरेंद्र मोदीची “स्वराज्य” ही संकल्पना पुढे आली असून त्यासाठी नवे सरकार विविध योजना व कल्पना पुढे आणून त्या राबविण्याची तयारी करीता आहे. तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही व्हायलाच हवा हे त्यांचे ध्येय आहे. या आव्हानामुळे तरूण बुध्दिमान होतकरू पिढीला दैनंदिन जीवनातील अडचणींना तोंड देऊन मार्ग काढता येईल, हे ध्येय पुढे ठेऊन शिक्षणासाठी जगभरात कुठेही सहज पोहचणे, आरोग्य, आरोग्य सेवा इत्यादी गोष्टी साध्य करता येतील. देशाचा सर्वांगीण विकास व सुधारणा हे त्यातील कळीचे मुद्दे असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या मार्गात येणार्‍या अडचणींवर “स्थानिक” उपाय शोधणे हे खरे आव्हान आहे. यासाठी DST (डीपार्टमेंट आँफ सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी), MyGov, INTEL, CIIE (Center for innovation incubation & Entrepreneurship) यांनी एकत्र येऊन काम करायचे ठरविले.

या ध्येयासाठी काम करतांना विविध क्षेत्रात काय काय करता येईल. याचा विचार सुरू झाला व Digital India च्या योजनेत समावेश असलेल्या Innovate for Digital India Challenge (IFDIC) ही स्पर्धा राबविली गेली. त्यासाठी जगभरातून नवनवीन संकल्पना व प्रोजेक्ट मागविण्यात आले. प्रोजेक्ट देणारी व्यक्ती भारतीय नागरिक असून वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी अशी अट त्यासाठी होती. त्याला भरघोस प्रतिसाद मिळून एकूण १९१३ अर्ज आले. CIIE व त्यांचे निवडमंडळ यांनी त्यातून ५० सर्वोत्तम कल्पनांची निवड केली. संकल्प मांडणार्‍या या ५० व्यक्तींना त्यांच्या कल्पना Indian Institute of Management (IIM), अहमदाबाद येथे २२ जुलै २०१५ रोजी सादर करण्याची संधी दिली.

सादर केलेले प्रोजेक्ट विविध विषयांवर होते. शैक्षणिक संबंधात दुर्गम भागांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून शिक्षण देणे, ब्रेल ही अंधांची लिपी इलेक्ट्रॉनिक पध्दतीने दाखविणे, आरोग्यासंबंधी मधुमेहाचे नियंत्रण करण्याची पध्दती निर्माण करणे किंवा संसर्गजन्य रोगांच्या माहितीचे साठवणूक केंद्र निर्माण करणे, शेतीसाठी ड्रोन व सेन्सर्सचा वापर करून जमीन पीक व हवा यांची पाहणी करणे, औद्योगिक उत्पादनासाठी रोबोटिक्सचा वापर करून उत्पादन वाढविणे व प्रदूषण कमी करणे यांसारखे अनेकविध होते. त्यापैकी ई-गव्हर्नन्स संबंधी श्री संजय दिक्षित यांनी कस्टम ई.आर.पी. (Custom ERP) हा प्रोजेक्ट सादर केला.

श्री. संजय दिक्षित यांच्या संकल्पनेची या पन्नास व्यक्तिमध्ये निवड झाली. त्यांचे हे प्रोजेक्ट नक्की काय होते?

मुळात ईआरपी (ERP=Enterprise Resource Planning) हे बिझनेस मँनेजमेंटचे सॉफ्टवेअर असून एखाद्या कंपनीला धंदा चालवायचा तर त्याच्याशी निगडीत असणार्‍या बहुविध गोष्टी या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून धंद्याचे अद्यययावत पध्दतीने कमीत कमी श्रमात व अचूक असे निर्णय घेता येतात. आता भारत देशासाठी ईआरपी सारखे सॉफ्टवेअर काय देईल? त्याची मूळ कल्पना संकल्पना खालील प्रमाणे आहे.

Middleware Enabled Service Unifier (MERU) – म्हणजे मेरुदंड अथवा पाठीचा कणा. पाठीचा कणा हा शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक. बाहेरुन तो दिसत नाही पण त्याचे काम मात्र अत्यंत महत्वाचे असते. तसेच डिजिटल इंडिया म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त, सुसज्ज करणे ही मूलभुत संकल्पना. त्यासाठी भारतीय शासनातील भिन्न भिन्न शासकीय कार्यालयातील आय. टी/सॉफ्टवेअर प्रणाली एकमेकांशी संलग्न राहून अविरत संवाद साधू शकल्या पाहिजेत. त्यामूळे शासकीय सेवा सुविधा एकसंधपणे तळागाळातील नागरीक, शेतकरी, जवान, मजूर त्यांच्यावर अवलंबून असलेले आप्त व कुटुबीय याना साध्या सोप्या मार्गाने पुरविल्या गेल्या पाहिजेत.

त्यासाठी शासकीय निर्णय पटापट घेतले जाणे आवश्यक असून निर्णयासाठी लागणारी माहिती अचूक, खात्रीलायक पध्दतीने त्वरीत उपलब्ध होणे गरजेचे असून हे तंत्रज्ञान भारतीयांनी भारतातच विकसित करणे गरजेचे आहे. कारण त्यात भारतातील विविध राज्ये, प्रांत, भाषा, चालीरिती, रुढी, रीतीरिवाज यांची जाणिव ठेवून त्यांचा आदर करणे हे या संकल्पनेच्या यशाच्या द्ष्टीने व प्रत्यक्षात ती उतरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महवाचे आहे.

ही संकल्पना मुळाशी मनात ठेऊन श्री. संजय दिक्षित यांनी ईआरपी प्रोजेक्ट आय. आय. एम. येथे सादर केले. त्याला अर्थातच फारच भरघोस प्रतिसाद मिळाला. श्री दिक्षित हे मुळचे मॅकेनिकल इंजिनिअर. याशिवाय मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री आणि आय. टी मध्ये क्वालिटी एश्युअरन्स कंन्सल्टंट म्हणून विविध देशात केलेली नोकरी व त्यामुळे एखाद्या महत्वाच्या कामामध्ये ‘बर्डस आयव्हयू’ पध्दतीने विश्लेषण करण्याची व त्यानुसार तपशीलात जाऊन कामांचे आयोजन करण्याची शिस्त त्यांच्या अंगी रुळलेली आहे.

त्यामुळेच भारतीय ईआरपी या प्रोजेक्टची कल्पना त्यांना सुचली व त्यावर विचार करून त्यांनी ती संकल्पना पुढे मांडली. १९१३ प्रकल्प संकल्पनांपैकी पहिल्या ५० मध्ये त्यांच्या प्रोजेक्टची निवड झाली याचे कारण डिजिटल इंडिया विषयी त्यांना नक्की कशाची आवश्यकता आहे व काय करायला हवे याची सुस्पष्ट कल्पना असणे हे होय. आय आय टी सारख्या जगदविख्यात ठिकाणी ती सादर करण्याची संधी मिळणे ही सुध्दा फारच दुर्मीळ व उल्लेखनीय संधी होय. ही संकल्पना सादर करीत असतांना त्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास व सहजता श्री. दिक्षित यांच्या सोबतच्या फोटोमधून स्पष्ट दिसते.

मुळात न्यूझीलंडमध्ये सध्या वास्तव्य असतांना भारतात प्रोजेक्ट सादर करण्याची कल्पना त्यांना कुठून मिळाली? तर MyGov च्या संकेतस्थळावरून. शिवाय आपल्या ज्ञानाचा उपयोग करून नवनिर्मिती करणे ही उर्मी त्यांच्याजवळ सतत असते. याशिवाय त्यांना या कामी कायमची प्रेरणा देणारे दोन स्त्रोत, ज्यांचा ते आवर्जून उल्लेख करतात ते असे.

पहिला स्त्रोत म्हणजे त्यांच्या वडिलांचे – डॉ. माधव दिक्षित यांचे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व – श्री. सी. डी. देशमूख यांच्या तोंडचे सतत कानावर पडलेले वाक्य “कोणतीही सिस्टिम कितीही शास्त्रशुध्द पध्दतीने केली तरी ती जोवर डोळस ज्ञान आणि उदात भावनेने सतत सुधारली जात नाही. तोवर ती आपल्या विनाशाला आणि र्‍हासाला बळी पडतेच”. (Any System, however perfect is foredoomed to fail, If It is not continuously reformed through well – appointed knowledge and Character)

दुसरा स्त्रोत म्हणजे आय. टी मधील संजय दिक्षितांना भेटलेले पहिले जनरल मॅनेजर श्री. गिरीष केळकर यांच्या तोंडचे वाक्य “सर्वोत्तमाचा ध्यास घेतांना मूलभुत चांगले ते करायला विसरू नका” (In pursuit of excellence, do not forget to do basic good) या दोन्ही प्रेरणा संजय दिक्षित यांना त्यांच्या व्यावसायिक कामात दैनंदिन जीवनातही पदोपदी उपयोगी पडलेल्या आहेत.

आज कोणत्याही साध्यासुध्या सरकारी कामातसुध्दा सतराशे साठ हेलपाटे घालणे, कर्मचार्‍यांची गैरहजेरी, त्यांना कामाची नीट माहिती नसणे, माहिती अद्यावत नसणे अशी अनेक संकटे पार करत वेळ पैसा वाया घालवावा लागतो. भारताची प्रगती होण्याच्या मार्गातील हा प्रचंड मोठा अडथळा आहे. हा अडथळा श्री. संजय दिक्षितांची प्रोजेक्टची कल्पना सत्यात उतरली तर अनेक वर्षे केवळ चर्चा केले जाणारे स्वप्न प्रत्येक भारतीयांच्या संदर्भात सत्यात उतरल्याचे आपल्याला पहायला मिळेल.

कल्याणी गाडगीळ, न्यूझीलँड