भारतातील देवीची अनेक मंदिरे शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात.

सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात दक्षाने सतीचा पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केल्याने शिव पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे समजल्यावर रागावलेल्या शिवाने वीरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला. शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले. या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्ती पीठे निर्माण झाली. या पौराणिक कथेतून भारतभरातील देवीची विविध मंदिरे एकाच आदिशक्तीची मानली गेली.

असे असले तरी, शक्तिपीठांच्या या ठिकाणांविषयी व त्यांच्या संख्येविषयी मतभिन्नता आढळते. ही संख्या कोठे १०८ तर काही लिखाणात ५१, ५२, ५५ किंवा ६४ अशी दिली आहे. देवीभागवतामधे पुढील १०८ पीठांमधील देवतांचा उल्लेख आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी ऊर्फ अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे अशी साडेतीन शक्तिपीठे आहेत.

  • तुळजापूर येथील भवानी देवी

देवीच्या शक्तिपीठापैकी हे आद्यपीठ. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटमधील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभावानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपत्री श्रीशिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील या देवीचे उपासक होते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : सोलापूर (द.म. रेल्वे)
मुंबई-सोलापूर : ४५५ कि.मी. रेल्वेने), ४०८ कि. मी (रस्त्याने)
सोलापूर-तुळजापूर : ४० कि.मी.

  • कोल्हापूर येथील अंबाबाई (महालक्ष्मी)

देवीची उपासना करणाऱ्या लक्षावधी भक्तांचं कोल्हापूरची महालक्ष्मी हे मोठं श्रध्दास्थान आहे. हजारो कुटुंबियांची ती कुलदेवता असल्याने या देवीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त मंडळी येतात. दिवसभर दर्शनार्थीचा राबता मंदिरात चालू अस्तो. भक्त मंडळी या देवीचा उल्लेख प्रेमाने ‘अंबाबाई’ असा करतात. महाराष्ट्रातील ते एक जागृत श्रध्दास्थान आहे.
सातव्या शतकात चालुक्य राजाने या देवालयाच्या बांधकामास सुरुवास केली. परंतु नवव्या शतकात शिलाहार यादव राजांनी हे देवालय हेमाडपंती बांधणीने व इतर अन्य कलात्मक शिल्पकलेने सुशोभित केलं. हे संपूर्ण देवालय म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. देवळाचा गाभारा, सभामंडप, महिरप, खांब, छत या सर्व ठिकाणी शिल्पकलेचं सौंदर्य प्रगट होतं. देवळाच्या आवारात काशी विश्वेवर, कार्तिकस्वामी, शेषशायी, सिध्दिविनायक, महासरस्वती, महाकाली तसेच श्री दत्तात्रेय व श्रीराम आदी देवदेवतांच्या अतिशय सुंदर व देखण्या मूर्त्या लहान-मोठ्या मंदिरात बसविलेल्या आहेत. मंदिराचा सर्व परिसर श्री-मंत्राने कोरलेला आहे.
देवळातील महालक्ष्मी देवीची मूर्ती स्वयंभू असून तिचं वजन ४०किलो इतकं आहे. साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या शिरोभागी शेषशाई नागाने फणा धरून छाया केली आहे. दर शुक्रवारी देवाची पालखी निघते. नवरात्रात आणि चैत्री पौर्णिमेस येथे मोठा उत्सव असतो. देवीच्या गाभाऱ्यापुढे ‘गरुडमंडप’ नावाचा विस्तृत सभामंडप आहे. तो.इ.स.१८३८ मध्ये बांधण्यात आला असून या सभामंडपात संगीत क्षेत्रातील कलावंत आपल्या गायन वादनाने देवीची सेवा करतात. मराठी सत्तेच्या काळात या देवळाचा लौकीक सर्वदूर पसरला. सर्व जातीचे लोक या देवाची पूजा करतात.

नजीकचे रेल्वे स्टेशन : कोल्हापूर ( पुणे मीरज-कोल्हापूर मार्गे)
मुंबई-कोल्हापूर : ४३० कि.मी., पुणे-कोल्हापूर : ३२७ कि. मी

  • रेणुका देवी

माहूर येथील रेणुका देवी ही तीन शक्तिपीठांपैकी एक. त्यामुळेच हे स्थान देवी भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे श्रध्दास्थान आहे. माहूर हे नांदेड जिल्ह्यातील एक लहान गाव असून दत्तात्रेय या त्रिगुणी अवताराचे ते जन्मस्थान आहे, अशी दत्तभक्तांची श्रध्दा आहे. ‘काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भीक्षेला जातो माहूर निद्रेला वरितो’ असे वर्णन दत्तात्रेयांच्या एका आरतीत आहे.
रेणुका ही दत्तात्रेयांची माता असल्याने माहूर क्षेत्रास मातापूर असेही संबोधले जाते. नवरात्रात रेणुका देवीची मोठी यात्रा भरते. विजयादशमीला या यात्रेची सांगता होते. माहूर येथे सती अनुसया, कालिका आदी देवदेवतांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. इतिहास प्रसिध्द राजगड किल्ला याच गावापासून दोन अडीच कि. मी. अंतरावर आहे. १२ व्या शतकात बांधण्यात आलेला हा भुईकोट किल्ला माहूरगड या नावानेही प्रसिध्द आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : किनवट (द.म. रेल्वे)
किनवट-माहूर : ४५ कि.मी., मुंबई-किनवट (व्हाया मनमाड): ७५१ कि.मी. (रेल्वेने)
मुंबई-माहूर (रस्त्याने) : ७८९ कि.मी.

  • सप्तशृंगी येथील देवी

नाशिक शहरापासून उत्तरेकडे असलेल्या सह्याद्री पर्वताच्या अजंठा- सातमाळा नावाच्या लांबच लांब उपशाखेवरील सप्तशृंगी हे सर्वात उंच म्हणजे १३८० मीटरपेक्षा अधिक उंचीचे शिखर आहे. या शिखरावरच सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. वणीची देवी म्हणूनही ती ओळखली जाते. देवीच्या साडेतीन पीठापैकी हे अर्धे पीठ होय. नाशिकहून दिंडोरी किंवा पिंपळगावमार्गे वणीपर्यंत बसने प्रवास करून नंतर वणीपासून संपूर्ण गड पायी चढून सप्तशृंगी देवीच्या मंदिरापर्यंत जाता येते. या मार्गाने चढण खूप असल्याने नांदुरी मार्गाने अनेक भक्त देवीला जातात. त्यासाठी वणीला न उतरता पुढे १४ कि.मी. अंतरावर नांदुरी येथे जावे लागते. नांदुरी येथून एस.टी. बसने सप्तशृंगी गडाच्या पठारापर्यंत जाता येते. त्यानंतरची चढण अडीचशे पायऱ्यांची असून ती चढणे सोपे आहे. मंदिर एका कड्यात खोलगट असल्याने पायथ्यापासून मंदिर दिसत नाही. खूप वर गेल्यानंतर मंदिराचे दर्शन होते.
ऐन डोंगरात आणि उंच ठिकाणी हे स्थान असल्याने सभोवतालचा निसर्ग मात्र खूपच उल्हसित करणारा आहे. म्हणूनच गड चढताना शीण वाटत नाही. देवस्थानाचा परिसर अत्यंत रमणीय आहे.
सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थात असून शुंभ-निशुंभ व महिषासूर या असुरांचा नाश केल्यानंतर तप-साधना करण्यासाठी देवीनी या गडावर वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे.
सह्याद्रीच्या या शाखेवर सात उंच शिखरे असल्याने या स्थानास सप्तशृंगी असे नाव मिळाले असावे. देवळाच्या परिसरात प्राचीन मंदिरे आहेत तसेच काही कुंडे आहेत. नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते व लक्षावधी लोक दर्शनासाठी येतात.

नजीकचे रेल्वे स्थानक : नाशिक रोड
नाशिक-नांदुरी : ५४ कि.मी (दिंडोरी मार्गे)
नाशिक-नांदुरी : ६५ कि.मी. (पिंपळगाव मार्गे)

देवीचे महाराष्ट्राबाहेरील शक्तीपीठ (भारतातील राज्य/देश )

  • अमरनाथ, श्रीनगरपासून पहलगाममार्गे ९४ किमी बसने, चंदनवारी व तेथून १६ किमी पायी (जम्मू आणि काश्मीर )
  • अंबाजी, अनर्त गावाजवळ (गुजरात )
  • अर्बुद देवी, माउंट अबूपाशी, (राजस्थान )
  • अट्टाहास, वर्धमान जिल्ह्यातील दक्षिणदिही गावाजवळ, कटवा रेल्वे स्थानकानजिक. (पश्चिम बंगाल )
  • बहुचरामाता, बेचराजी येथे (गुजरात )
  • बहुला, अजय नदीकिनारी केतुग्राम, कटव्याहून ८ किमी बर्दवान (पश्चिम बंगाल )
  • वक्रेश्वर,पापहरा नदीकिनारी, सिउरी शहरापासून २४ किमी वीरभूम जिल्हा, ७ किमी दुब्राजपूर रेल्वे स्थानकापासून (पश्चिम बंगाल )
  • भैरवपर्वत, भैरव पर्वतावर क्षिप्रा नदीकिनारी उज्जैन शहरात (मध्य प्रदेश )
  • भाबनीपूर करतोयातत येथे , २८ किमी अंतरावर आतील भागात, शेरपूर उपजिल्हा, बोग्रा जिल्हा (बांगलादेश )
  • चंडिका स्थान किंवा चंडिस्थान, मुंगेर मंदिर येथे,गंगाकिनारी, गंगादर्शनजवळ. (बिहार )
  • चिंतापूर्णी किंवा छिन्नमस्तिका, उना जिल्हा, हिमाचल प्रदेश, अंब अंदौरा रेल्वे स्थानकापासून २० किमी, चंदीगडपासून १५० किमी. (हिमाचल प्रदेश )
  • दंतेश्वरी (बस्तर जिल्ह्याची कुलदेवी), दंतेवाडा, जगदलपूर पासून ८० किमी (छत्तीसगड )
  • गंडकी, पोखराहून गंडकी नदीकिनारी १२५ किमी. येथे मुक्तिनाथ मंदिर आहे. (नेपाळ )
  • हिंगलाज (किंवा हिंगुळा), दक्षिणबलुचिस्तान, ग्वादार पासून ईशान्येस काही तासाचा प्रवास व कराचीच्या वायव्येस सुमारे १२५ किमी. (पाकिस्तान )
  • जयंती, नारटियांग गावाजवळ, जयंतिया हिल्स जिल्हा. या शक्तिपीठास नारटियांग दुर्गा मंदिर या स्थानिक नावाने ओळखले जाते. (मेघालय )
  • जेशोरेश्वरी, ईश्वरीपूर, श्यामनगर, सातखिरा जिल्हा. ईश्वरीपूर राजधानी असलेल्या राजा प्रतापदित्याने या मंदिराचे बांधकाम केले. (बांगलादेश )
  • ज्वालाजी, कांगरा पठाणकोट येथून ज्वालामुखी रोड स्थानकावरून २० किमी वर. (हिमाचल प्रदेश )
  • कालीपीठ, (कालीघाट, कलकत्ता) (पश्चिम बंगाल )
  • कलमाधव, शोन नदीकिनारी, एका गुहेत अमरकंटकजवळच्या पर्वतावर. (मध्य प्रदेश )
  • कामगिरी, कामाख्या, नीलांचल पर्वतावर, गोहत्तीजवळ (आसाम )
  • कांचीपूरम, कामाक्षी मंदिर, कामकोटी पीठ- ललितासहस्रम् यात वर्णन केल्याप्रमाणे. (तमिळनाडू )
  • कंकालीतला,कोपै नदीकिनारी, वीरभूम जिल्ह्यातील बोलपूर रेल्वे स्थानकाच्या ईशान्येस १० किमी. स्थानिक नाव कंकालेश्वरी. (पश्चिम बंगाल )
  • कन्याश्रम बालांबिका – कन्याकुमारीत भगवती मंदिर, भारताचे सर्वात शेवटचे दक्षिण टोक तमिळनाडू. तमिळनाडू (हे स्थान चितगांव, बांगलादेश येथे आहे असेही एक मत आहे) (तमिळनाडू )
  • कर्नात, कांग्रा (हिमाचल प्रदेश )
  • किरीटयेथे किरीटकोना गावाजवळ,मुशिराबाद जिल्ह्यातील लालबाग कोर्ट रोड रेल्वे स्थानकापासून ३ किमी. (पश्चिम बंगाल )
  • स्थानिक नाव – आनंदमयी मंदिर. रत्नावली येथे,रत्नाकर नदीकिनारी, खानकु-कृष्णसागर येथे,हुगळी जिल्हा. (पश्चिम बंगाल )
  • स्थानिक नाव – भ्रामरी देवी.जलपैगुडीत, बोडा गावाजवळ तिस्ता नदीकिनारी किंवा त्रिस्त्रोत (पुराणातील नाव) (पश्चिम बंगाल )
  • मानस,तिबेटमधील कैलास पर्वताच्या पायथ्याशी मानससरोवरमध्ये असलेला एक दगडाचा तुकडा. (तिबेट )
  • मणिबंध,गायत्री पर्वतावर पुष्करजवळ, अजमेरच्या वायव्येस ११ किमी. (राजस्थान )
  • मिथिला, जनकपूर रेल्वे स्थानकाजवळ, भारत व नेपाळ यांच्या सीमेवर. (नेपाळ )
  • नैनाटिवु (मनिपल्लवम्), उत्तर प्रांत,श्रीलंका. जाफना राज्याच्य जून्या राजधानीपासून ३६ किमी वर स्थित, नल्लुर.या मूर्तीची पूजा इंद्र करीत होता असे मानल्या जाते.रामायणातील राम व रावण यांनीही या देवतेची पूजा केली असे मानतात.महाभारतातील नाग व गरुड यांचे आपसातील हाडवैर या देवतेच्या पूजनानंतर संपुष्टात आले असा समज आहे. (श्री लंका )
  • नलहाती, नलतेश्वरी मंदिर म्हणून, नलहाती स्थानकाजवळ वीरभूम जिल्हा (पश्चिम बंगाल )
  • नेपाळ, पशुपतीनाथ मंदिराजवळ, गुह्येश्वरी मंदिरयेथे. (नेपाळ )
  • चंद्रनाथ पर्वतावर,सीताकुंड स्थानक येथे, चित्तगाँग जिल्हा, बांगलादेश. प्रख्यात चंद्रनाथ मंदिर याच्या पर्वतावर या शक्तिपीठाचे भैरव मंदिर आहे. (बांगलादेश )
  • पद्मावती देवी (पद्मावतीपुरी धाम), Panns? सतन्याहून ८० किमी (मध्य प्रदेश )
  • पंचसागर नेमके स्थान माहित नाही,बहुदा हरिद्वारजवळ. (उत्तराखंड )
  • पाटण देवी, पटणा येथे. (बिहार )
  • प्रभास, वेरावळ स्थानकापासून ४ किमी.जूनागढ जिल्ह्यात सोमनाथ मंदिर. (गुजरात )
  • प्रयाग, अलाहाबादच्या संगमाजवळ. (उत्तर प्रदेश )
  • सद्य कुरुक्षेत्र शहर किंवा थानेसर जुने स्थानेश्वर (हरयाणा )
  • रामगिरी,चित्रकूट येथे, झांशी माणिकपूर रेल्वेमार्गावर (उत्तर प्रदेश )
  • सैंथिया, स्थानिक नाव – नंदिकेश्वरी मंदिर. परकोटात असलेल्या वडाच्या झाडाखाली, रेल्वे स्थानकापासून फक्त १.५ किमी.वीरभूम जिल्हा (पश्चिम बंगाल )
  • सर्वशैल किंवा गोदावरीतीर,कोटलिंगेश्वर मंदिर येथे,राजमुंद्रीजवळ, गोदावरी नदीच्या तीरावर. (आंध्र प्रदेश )
  • शिवहरकारय,कराचीजवळच्या सुक्कुर स्थानकापासून थोडे दूर. (पाकिस्तान )
  • शोनदेश, अमरकंटकमधील नर्मदा नदीच्या उगमाजवळ. (मध्य प्रदेश )
  • श्री पार्वती, लडाखजवळ, जम्मू आणि काश्मीर. दुसरी श्रद्धा:श्रीपर्वत पर्वतावरील श्रीशैलम येथे.कुर्नूलजिल्हा. (आंध्र प्रदेश )
  • श्री शैल,जोनीपूर गाव येथे, दक्षिण सुरमा, गोतटीकर जवळ, सिल्हेट शहरापासून ३ किमी ईशान्येस. (बांगलादेश )
  • शुची,सुचिंद्रमयेथे असलेल्या शिव मंदिरात, कन्याकुमारी त्रिवेंद्रम रस्त्यावर ११ किमी दूर. (तमिळनाडू )
  • सुगंध, शिकारपूर मध्ये, गौरनदी,बरीसाल शहरापासून सुमारे २० किमी. बांगलादेश, सोंडा नदीच्या किनारी. (बांगलादेश )
  • उदयपूर, त्रिपुरा, त्रिपुरसुंदरी मंदिर या पर्वतावर, राधाकिशोरपूर गावाजवळ, [[उदयपूर, त्रिपुरा|उदयपूर] शहरापासून थोड्याच अंतरावर (त्रिपुरा )
  • उज्जनी, गुस्कारा स्थानकापासून १६ किमी, बर्दवानी जिल्ह्यात. (पश्चिम बंगाल )
  • वज्रेश्वरी मंदिर, कांग्रा, धर्मशाळा तहसिलीपासून १८ किमी, कांग्रा (हिमाचल प्रदेश )
  • वाराणसी, मणिकर्णिका घाट येथे, गंगा नदीकिनारी काशीला (उत्तर प्रदेश )
  • विभास, तामलुक पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात. (पश्चिम बंगाल )
  • विराट,भरतपूर जवळ. (राजस्थान )
  • वृंदावन,बस स्थानकाजवळ,भूतेश्वर रस्त्यावर, भूतेश्वर मंदिर परिसरात, कात्यायनीपीठ. वृंदावन (उत्तर प्रदेश )
  • दंतकाली धरण येथे (नेपाळ )
  • चंडि मंदिर, मेमरी रेल्बे स्थानक येथे बर्दवानजिल्ह्यात (पश्चिम बंगाल )
  • सरकुंडा,मसुरीहून ४४ किमी व नवीन टेहरीपासून २५ किमी बसने. टेहरी गढवाल जिल्हा. (उत्तराखंड)
  • सुरकंडा मंदिर नविन टेहरी येथे, टेहरी गढवाल जिल्ह्यात (उत्तराखंड )
  • तारापीठ बीरभूम जिल्हा (पश्चिम बंगाल)