‘सर्व शिक्षा अभियाना’मुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दहावीपर्यंतचा शिक्षण प्रवास उत्तम गुणांनी पार करणारी गरीबाघरची गुणवत्ता उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर मात्र पैशाचे सोंग आणता येत नसल्याने दुर्लक्षित राहते. इच्छा आणि क्षमता असूनही ही असामान्य गुणांची प्रतिभा केवळ आर्थिक कारणांमुळे कोमेजून जाऊ नये, यासाठी ठाण्यात सुरू झालेली ‘विद्यार्थी विकास योजना’ ही चळवळ आता राज्यातील २२ जिल्ह्य़ांत पोहोचली आहे. हातावर पोट असणाऱ्या, दिवसभराच्या मेहनतीतून केवळ पोटापुरते कमवू शकणाऱ्या कुटुंबातील राज्यभरातील शेकडो मुले-मुली या योजनेचा आधार घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आदी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. वैयक्तिक स्तरावरील गुणवत्तेला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी ही योजना आता अधिक विस्तारित स्वरूपात राबवली जाणार आहे. त्यातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अधिकाधिक गुणवंतांना शिक्षणासाठी मदत दिली जाईलच, शिवाय मराठी शाळांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करून एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पुढील पिढय़ांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने या चळवळीत यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन ‘विद्यार्थी विकास योजना’ संस्थेच्या संचालकांनी केले आहे.