विशाळगड

शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधे विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो.

सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंचीचा आहे. या खिंडीपर्यंत गाडीरस्ता असल्यामुळे अर्ध्यातासात विशाळगडावर पोहोचता येते. विस्तृतमाथा असलेला विशाळगड सह्याद्रीच्या पाताळवेरी दर्‍यांनी वेढलेला असल्यामुळे बेलाग झालेला आहे.

विशाळगडाच्या बेलागपणाचे येथिल दर्‍याखोर्‍यांचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणजो या घाटामधील वाटा अतिशय वाकडय़ा-तिकडय़ा आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कडय़ावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा अजगराच्या श्वासो श्वासासारखी दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूतिमंत मृतयूचेच वास्तव्य. वार्‍याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकडय़ातिकडय़ा वाटांनी चालून मुसलमानी सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले!

विशाळगडाच्या परिसरात भटकंती केल्यास आजही याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. विशाळगडाच्या या दुर्गमतेचा वापर करुन शत्रूला नामोहरण केल्याचा एक दाखलाही इतिहासात आहे. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम बाजीप्रभु यांनी केला. महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. या आणि अशा अनेक रोमहर्षक घटनांचा साक्षीदार विशाळगडाचा किल्ला आहे.

एस.टी.च्या थांब्यापासून अध्यातासात आपण विशाळगडावर पोहोचतो. गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंउ, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तु गडावर पहायला मिळतात.

या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि इतिहासामधे आपल्या पराक्रमाने अजरामर झालेले वीर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या आज उपेक्षीत असल्या तरी नमन करण्यायोग्य आहेत.

विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पुर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते.