यशवंत दिनकर फडके


यशवंत दिनकर फडके (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; मृत्यू : ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फडक्यांचा जन्म सोलापूर येथे १९३१ साली झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरिभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. हे शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी १९५१ साली बी.ए व १९५३ साली एम्‌.ए. या पदव्या मिळाल्या. पुढे १९७३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पीएच्‌.डी.धारक झाले.

डॉ. फडके यांनी त्यांच्या जीवनात अनेक मानद पदे भूषविली. त्यातील काही म्हणजे; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद व बेळगांव येथे भरलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, भारतीय ज्ञानपीठाच्या मराठी सल्लागार समितीचे निमंत्रक अध्यक्षपद, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या प्रकाशन विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य- ही होत. डॉ. फडके यांना फिलाडेल्फिया येथील टेंपल विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ फेडरॅलिझममध्ये’ ज्येष्ठ फुलब्राईट संशोधक म्हणून संशोधन करण्याची संधी १९८४ मध्ये उपलब्ध झाली. डॉ. फडके यांचा व्यासंग व लेखनाचा आवाका अफाट होता, त्यांच्याकडून इंग्रजी तसेच मराठी लेखन झाले आहे. त्यांनी २ पुस्तके अनुवादित केली आहेत व अनेक पुस्तके संपादितदेखील केली आहेत. ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ च्या आठ खंडांच्या माध्यमातून त्यांनी एक संशोधक व लेखक म्हणून महाराष्ट्राचा सखोल आढावा घेतला. महाराष्ट्राचा इतिहास (भूतकाळ) व भविष्यकाळ या दृष्टिकोनातून हे त्यांचे बहुमूल्य योगदान आहे.

डॉ. फडके यांच्या ६ पुस्तकांना – शोध बाळगोपाळांचा; व्यक्ती आणि विचार; केशवराव जेधे; शोध सावरकरांचा; लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक व आंबेडकरी चळवळ या पुस्तकांना – महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या ६०० वर्षांपेक्षा अधिक काळातील सर्वोत्कृष्ट पुस्तके म्हणून वाचकांनी निवडलेल्या १७७ पुस्तकांच्या यादीत त्यांच्या ’शोध बाळगोपाळांचा’ या पुस्तकाचा समावेश आहे.

प्रकाशित साहित्य
चरित्रलेखन
• अण्णासाहेब लठ्ठे (१९९०)
• आगरकर (१९९६)
• र. धों. कर्वे (१९८१)
• केशवराव जेधे (१९८२)
• कहाणी नेताजींची भाग १,२.
• न्यायालयात मधु लिमये
• राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील (२०१७)
• लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
• विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
• शाहू छत्रपती आणि लोकमान्य
• शोध : बाळगोपाळांचा (१९७७)
• शोध सावरकरांचा (१९८४)
• कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
• सेनापती बापट (१९९९)
ऐतिहासिक
• डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (१९८६)
• डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
• डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
• Constitution of India (इंग्रजी, सहलेखक -राजन श्रीनिवासन (१९८०)
• Politics and Language (इंग्रजी, १९८०)
• विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९६३) – खंड १ ते ८
• स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान