‘सौ. मृदुला (जोशी) अतुल पुरंदरे’ हे नाव तसे आपल्याला सुपरिचित! झी मराठी वरील सर्वांच्या आवडत्या वृत्तनिवेदिका – मुलाखतकार! वेळेचा आणि शब्दांचा अचूक मेळ राखत प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्याची किमया हे मृदुलाजींचे वैशिष्ट्य! विषयाबद्दल कुतुहलमिश्रीत गोडी निर्माण करत एकदा मृदुलाजींनी कार्यक्रमाचा ताबा घेतला की रिमोट आपोआप बाजुला सारुन प्रेक्षक दुरचित्रवाहिनीला खिळुन बसत! नावाप्रमाणेच मृदुता स्वभावात आणि वागण्यात असणाऱ्या मृदुलाजी त्यांच्या संवादशैलीतील हातोटीमुळे व नम्र संभाषणशैलीमुळे समाजातील सर्वच स्तरात प्रिय! राजकारण्यांपासुन अभिनयक्षेत्रातील दिग्गजदेखील मृदुलाजींच्या वाक्चातुर्याची तारीफ करतात ते ह्यामुळेच!त्यामुळेच सर्वोत्तम वृत्त सादरकर्ती म्हणून नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डने (N T Awards) त्यांना गौरवण्यात आलं.
मृदुलाजी ह्या मुळच्या नागपूरच्या. विज्ञानात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंट तसच मास कम्युनिकेशन ह्या दोन विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. लहानपणीपासूनच घरातून वडील श्री. चंद्रहास लक्ष्मण जोशी आणि आई सौ.माधुरी जोशी यांच्याकडून साहित्य,अभिनय,सामाजिक भान ह्या गोष्टींचं बाळकडू मिळत गेले. त्यांनी संगितात(सतार वाद्य) विषारद केले. मराठी माणसाने व्यवसायात जावे अशी तळमळ असल्याने कारखाना काढण्याचा त्यांचा मानस होता. नागपुरातील २३हजार संस्थांची माहिती असलेली ‘इन्फो पेजेस’ ही डिरेक्टरी त्यांनी माननीय नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते प्रकाशित केली. ई टीव्ही मराठी तसच, झी चोवीस तास या वृत्तवाहिन्यांमध्ये १५ वर्षे निर्माती तसच वृत्त निवेदिका म्हणून काम केलं. हजारो बातमीपत्र वाचली तर अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या.
मृदुलाजी देश-विदेशात फिरल्या तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मराठी माणसाने आज सर्वार्थाने जागतिक स्तरावरती महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे! ह्या लोकांना महाराष्ट्राविषयी एक ममत्व, एक आपुलकी, एक जिव्हाळा आहे… आपल्या मातृभूमीमधील बांधवांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे… शक्ती आहे, इच्छाशक्ती देखील आहे, परंतु गरज आहे ती एका निर्व्याज, निरपेक्ष, निर्मळ अशा व्यासपीठाची!
महाराष्ट्रातील लोकांशी जेंव्हा त्यांनी परदेशस्थ मराठी दिग्गजांविषयी संवाद साधला तेंव्हादेखील ह्यासदृशच प्रतिक्रिया त्यांना अनुभवायला मिळाली! येथील लोकांना प्रचंड कौतुक आहे, अभिमान आहे ह्या दिग्गजांचा परंतु व्यक्त कशी होणार?
आणि ह्या संमीश्र प्रतिक्रियांमुळेच मृदुलाजींच्या मनात आकार घेतला ’मराठी ग्लोबल व्हिलेज’ ह्या संकल्पनेने!