- तिथी :
वैशाख शुध्द तृतीया
- पार्श्वभूमी :
अनेक अख्यायिका अक्षय तृतीयेच्या संदर्भात प्रचलित आहेत. काही ठिकाणी हा दिवस श्री गणेशाने व्यास मुनींनी सांगितलेले महाभारत हे काव्य लिहायला सुरुवात केली तो दिवस मानून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर काही ठिकाणी याला विष्णूच्या सहाव्या अवताराचा (परशुरामाचा) प्रकटदिन म्हणून साजरा करण्याची पध्दत आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे त्रेता युगाची सुरुवात या दिवसापासून झाली. दुसर्या एका मान्यतेनुसार द्वापार युगाची सुरुवातही याच दिवशी झाली. द्वारकेत कृष्णाचा मित्र सुदामा याने कृष्णासाठी पोह्याची पुरचुंडी भेट म्हणून आणली तोही दिवस हाच. अशा या दिवसामागे अनेक आख्यायिकाही जोडल्या गेल्या आहेत.
भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतिया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात.
गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानतात.
एक व्यापारी होता. तो नेमाने दानधर्म करायचा.त्याला कालांतराने दारिद्य आलं. एकदा त्याने ऐकलं तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दान-पुण्य अक्षय्य होतं. तो दिवस आल्यावर त्याने दान केलं. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने यज्ञ केलं, वैभव भोगलं. परंतु त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही.
या दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धी साठी याचः दिवशी शंकराचे व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धन देवता व कुबेर देवांचा खजिनदार झाला असेही मानतात.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते. उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, वहाणा अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदीकुंकवासाठी माहीत आहे. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करतात. चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सोयीनुसार हळदीकुंकू केले जात असले तरी काही जण अक्षयतृतियेलाच हे हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळीची करंजी असे खायला देतात. याशिवाय बत्तासा, मोग-याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरब-यांनी त्यांची ओटी भरतात. खस किंवा वाळयाचे अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडतात. हळदीकुंकवाला चैत्रगौर सजवितांना कलिंगड किंवा खरबूज कापून त्यात देवीची स्थापना करतात व फराळाचे पदार्थ करून व विविध खेळणी वगैरे मांडून ती जागा शोभिवंत करतात.
- वैशिष्ट्य :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या सणाचं धार्मिक आणि व्यापारी महत्त्वही मोठं आहे. अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा, वर्ष भर कालगणने मध्ये तिथींचा क्षय होत असतो पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथीचा कधीच क्षय होत नाही म्हणून ही अक्षय तृतीया,या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला, दानधर्म केला, मोल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या अक्षय राहतात अशी समाज धरणा आहे, त्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करण्याची प्रथा आहे.
या दिवशी केलेलं दान मोठं पुण्य मिळवून देतं असा समज आहे. त्यामुळे यादिवशी वस्त्र, जल, चंदन, नारळ अशा गोष्टी दान म्हणून दिल्या जातात. या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पाप धुतलं जातं अशीही समजूत असल्याने यादिवशी गंगास्नानाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी यात्रा प्रारंभ करण्यावरही भर असतो कारण या दिवशी सुरू केलेलं काम चांगली फळप्राप्ती करून देतं असा समज आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, चार धाम या यात्रांचा प्रारंभ या दिवशी होतो.
- खाद्यपदार्थ :
कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळीची करंजी