सागरी किनाऱ्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे एक भाग्यशाली राज्य आहे असंच म्हणावं लागेल. कारण सुमारे ७२० कि.मी. लांबीचा प्रदीर्घ समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे. संपूर्ण कोकणचा प्रदेश या सागरी किनाऱ्याच्या सान्निध्याने सुंदर, हिरवा आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न झालेला आहे. मुंबई तसेच मुंबई शहराच्या उत्तरेला ठाणे जिल्ह्यातील डहाणू-बोर्डी या गावांपासून हा समुद्र किनारा सुरू होतो व दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यापर्यंत म्हणजे जवळपास गोव्याच्या सीमेपर्यंत अखंडपणे संपूर्ण कोकणाला पश्चिमेकडच्या अंगाने वेढून राहतो.
समुद्राचे सान्निध्य असले म्हणजे सुंदर शांत सागर किनारे आलेच. कोकणात असे असंख्य लहान-मोठे सागर किनारे किंवा बीचेस आहेत. पण पर्यटनाच्या दृष्टीने सोयीचे असे काही सागर किनारे शासकीय प्रयत्नातून विकसित करण्यात आले आहेत. संपन्न सृष्टीसौंदर्य, इतिहासकालीन प्रसिध्द किल्ले, प्राचीन मंदिरं अशा वैशिष्ट्यांमुळे किनारे मनाला भुरळ घालतात.
अलीकडच्या काळात प्रवासाच्या सोयी खूप वाढल्या आहेत. कोकण रेल्वेमुळे कोकणातील प्रवास जलद आणि सुखद आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात किंवा आठवड्यात सलग जोडून सुट्ट्या आल्या तर या समुद्र किनाऱ्यांना अवश्य भेट द्यावी म्हणजे मनाचा थकवा-शीण तर जाईलच, पण आनंद-उत्साहही द्विगुणित होईल यात शंका नाही. प्रवासात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी खास कोकणी पदार्थाची चव घेतली तर रुचीपालट झाल्याचे मोठे समाधानही मिळेल.
या सागरी किनाऱ्यांना भेट देण्यासाठी निघणार असाल तर जून ते सप्टेंबर हे महिने सोडून या ठिकाणी केव्हाही जायला हरकत नाही.
- मार्वे–मनोरी–गोराई
मुंबई उपनगरापासून नजीकच्या अंतरावर पण ऐन शहरी वस्तीपासून दूर असलेले हे सागर किनारे प्रसिध्द आहेत. मुंबईतील कोलाहल, गर्दी गोंगाट आणि प्रदूषण या साऱ्या कंटाळवाण्या वातावरणापासून हे किनारे मुक्त असल्याने तेथील निसर्ग, सागर लाटांचे लयबध्द गान आणि प्रसन्न शांत वातावरण मनाला खूप आनंद देतं.
मार्वे हा त्यापैकी जवळचा समुद्र किनारा. किनाऱ्याला लागूनच एक लहान गाव आहे. मच्छिमारी हा येथील लोकांचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. गाव एकूण शांत आहे. समुद्र किनारा स्वच्छ आणि रम्य आहे. सागर किनाऱ्याला लागूनच अनेक खाजगी बंगले आहेत. रेस्ट हाऊसेसही आहेत. सभोवताली असलेली वृक्षराई, ताड-माडाचे उंच वृक्ष यामुळे हे बंगले सुशोभित दिसतात. या ठिकाणी पोर्तुगिजांनी बांधलेलं एक पुरातन चर्च आहे. सागर किनाऱ्याला लागून लहान डोंगर आहेत.
मार्वे गावाचा पुढे नजीकच्या अंतरावर मनोरी व गोराई ही लहानशी बेटं आहेत. मोटरबोटने मार्वे-मनोरी अंतर जाता येते. याशिवाय पश्चिम उपनगरातील बोरीवली येथूनही लाँचने अवघ्या १५-२० मिनिटात तेथे जाता येते.
या बेटावर त्यामानाने पर्यटकांची वर्दळ अधिक असते. राहण्याची सोय असल्याने व त्यासाठी लहान लहान कुटिरं असल्याने रात्री मुक्कामही करता येतो.
गोराई बीचवरच अलीकडच्या काळात एस्सेल वर्ल्ड नावाची आधुनिक पध्दतीची मनोरंजन नगरी उभारण्यात आल्याने येथे खूप गर्दी असते. अलीकडे ती पर्यटकांना खूपच आकर्षित करते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : मालाड किंवा बोरीवली (प.रेल्वे)
मुंबई-मार्वे (मालाड मार्गे) रस्त्याने अंतर : ४० कि.मी.
- वसईचा समुद्रकिनारा व किल्ला
मुंबईनजीक ठाणे जिल्ह्यातील वसई येथील समुद्र किनाराही अतिशय सुंदर आहे. वसई हे पश्चिम सागर किनाऱ्यावरील गाव सतराव्या शतकाचा प्रारंभी नौका बांधणीसाठी अतिशय प्रसिध्द होतं. या गावाचे महत्त्व ओळखूनच पोर्तुगीजांनी आपली वसाहत या ठिकाणी सुरू केली होती. या वसाहतीच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वसईचा किल्ला बांधला होता. पुढे १७३९ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव करून हा किल्ला ताब्यात घेतला. या विजयाचे शिल्पकार होते चिमाजी आप्पा.
पश्चिम रेल्वेवरील वसई स्थानकापासून वसई हे गाव व किल्ला सुमारे ५-६ कि.मी. अंतरावर असून या परिसरात पोर्तुगीज काळातील वास्तूंचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात. वसईपासून पुढे सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेले नालासोपारा हे गाव पूर्वी ख्रिस्तपूर्व काळात व नंतरही खूप प्रसिध्द होते. या गावास एकेकाळी कोकणच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता. या काळात उभारण्यात आलेल्या बुध्दकालीन वास्तू व वस्तूंचे अवशेष येथील उत्खननात अजूनही सापडतात. गौतम बुध्दांचा पूर्वजन्म याच गावात झाला होता अशी आख्यायिका आहे.
नजीकचे रेल्वे स्थानक : वसई (प.रे.)
मुंबई-वसई : ५२ कि.मी.
- डहाणू–बोर्डी
अतिशय सुंदर समुद्र किनारा लाभलेली ही दोन गावे ठाणे जिल्ह्यात असून येथील समुद्र किनारा डहाणू ते बोर्डी असा जवळपास १७ कि.मी. लांबवर पसरलेला आहे. फळबागा आणि निसर्ग सौंदर्य यासाठीही हा परिसर प्रसिध्द आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार या लोकल ट्रेनच्या अंतिम स्थानकापासून ही गांवं तशी एक तासाच्या अंतरावर आहेत. बोरीवली-विरारपासून डहाणूपर्यांत शटल ट्रेननेही या ठिकाणी जाता येतं. त्या व्यतिरिक्त प. रेल्वेवरील गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबतात. मुंबई-अहमदाबाद हायवेनेही या ठिकाणी जाता येतं.
फार पूर्वी मुंबई शहरापासून दूर व समुद्रकाठी वसलेल्या या गावातून पारशी व इराणी लोकांनी वस्ती केली व हा परिसर संपन्न केला. एक दिवसाच्या सहलीसाठी ही ठिकाणं उत्तम आहेत. डहाणूपासून बोर्डी हे गाव सुमारे १७ कि.मी. अंतरावर आहे. बोर्डी हे आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. डहाणूपासून अगदी जवळच असलेल्या उद्वाडा येथे झोराष्ट्रीयन पंथियांची एक भव्य व सुंदर आगियारी आहे. विशेष म्हणजे या आगियारीतील अग्नी गेली सतत एक हजार वर्षे अखंडपणे जागृत आहे. त्यामुळेच झोराष्ट्रीयन लोक या आगियारीला आवर्जून भेट देतात. अनुताई वाघ यांनी स्थापन केलेले आदिवासींचे शैक्षणिक प्रकल्प याच परिसरात घोलवड येथे कार्यरत आहेत.
नजीकचे रेल्वे स्थानक : डहाणू ( प.रे.)
मुंबई-डहाणू अंतर १४५ कि.मी.
- मुरुड–जंजिरा
प्रसन्न समुद्रकिनारा आणि जलदुर्ग यासाठी अलिबाग जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे ठिकाण प्रसिध्द आहे. येथील जंजिऱ्याचा जलदुर्ग ३०० वर्षापूर्वी बांधण्यात आला असून वास्तुशिल्पाचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. येथील सागरी किनारा प्रशस्त, स्वच्छ आणि लांबच लांब विस्तारलेला आहे. नारळ व पाम वृक्षांमुळे या किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. हा किल्ला त्या काळी अजिंक्य समजला जात असे. येथील नवाबाचा महाल व जंजिरा गुंफाही प्रसिध्द आहेत.
मुंबईपासून बसमार्गे हे ठिकाण १६५ कि.मी दूर आहे. पनवेलहूनही या ठिकाणी जाता येते. येथून जवळच नांदगाव व काशीद येथील फारसे प्रसिध्द नसलेले पण सुंदर किनारे आहेत. नांदगावचा गणपती प्रसिध्द आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे माघी गणेशोत्सव साजरा होतो व त्यानिमित्त मोठी जत्रा भरते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल
मुंबई-पनवेल : ६९ कि.मी.
पनवेल-मुरुड (रस्त्याने) : १२२ कि.मी.
मुंबई-मुरुड (रस्त्याने) : १६५ कि.मी.
- मांडवा–किहीम
मुंबईपासून अगदी नजीक असलेले हे समुद्र किनारे अलिबागपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर आहेत. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय सहजासहजी जाता येण्यासारखे हे समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आणि नितळ आहेत. सागर किनाऱ्यालगत असलेलं मांडवा हे गाव सुध्दा नारळाच्या बागांमुळे खूपच सुंदर दिसतं. गावापासून जवळच किहीमचा बीच आहे. या बीचवर तंबू उभारून तुम्ही सुट्टीचा काळ निवांतपणे घालवू शकता. एम.टी.डी.सी. तर्फे या ठिकाणी तशी सोय केलेली आहे. सभोवताली रंगीबेरंगी रानफुलांनी व्यापलेलं हिरवं रान, नारळीच्या बागा, इतरत्र न आढळणारी वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरं आणि पक्षी यामुळे हे ठिकाण खूप प्रसन्न वाटतं. पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांचं तर हे अतिशय प्रिय असलेले ठिकाण.
या सागर किनाऱ्याला लागूनच कुलाबा किल्ला असून मुरुड व चौल ही ऐतिहासिक ठिकाणेही जवळच आहेत.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल
पनवेल-किहीम अंतर (रस्त्याने) : ८५ कि.मी.,
मुंबई-किहीम अंतर (रस्त्याने) : १३६ कि.मी