” महाराष्ट्राच्या लोककला “
समृद्ध लोककलांचा वारसा या महारष्ट्राला लाभला आहे. मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या प्रवाह अखंडपणे वाहत आहे. महारष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रिकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती.
मौखिक परंपरेत नृत्य, नाट्य, संवाद, लोकगीते, लोकभूमिका यांचा सुरेख समन्वय साधला गेला. त्यातूनच मर्हाटमोळा लोकरंग उभा राहिला आणि या लोकरंगात मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहायला मिळाले. उद्भोदन, मनोरंजन आणि प्रबोधन घडवुन ’कळनारी भाषा आणि पेलणारे तत्त्व देणारे’ तसेच बोलीभाषेत वेदांतांचा अर्थ सांगून नैतिकतेची मूल्ये जनलोकात रुजविलेल्या या लोककला म्हणजे एक स्वतंत्र लोकविद्दापीठ आहे.
जनलोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे.ह्या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे अस्तित्व हे लोकजीवनाशी बांधलेले आहे. भारतात अनंत काळापासून नांदत आलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणार्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते. लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. म्हणून लोकसंस्कृतीचा सहजसूंदर आविष्कार घडविणारी लोककला ही अनेक परिवर्तनातून आपला वाटा शोधीत शोधीत जनलोकात आपले स्थान टिकवून आहे.
महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमधे प्रामुख्याने कीर्तन, भारुड, लळित, दशावतार, गोंधळजागरण, भराड, लोकनाट्य, तमाशा, गण, गौळण, पोवाडा, भेदिक या लोककलांचा समावेश करावा लागेल. महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलांचे त्यांच्या प्रयोज
नांवरुन चार प्रकारात वर्गिकरण करता येईल.
१) आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला, किर्तन, भारुड, लळित, दशावतार इ.
२) मनोरंजन पुरुषार्थ जागविणारी लोककला शाहिरी, पोवाडे, भेदिक इ.
३) लोकधर्माचे लोकाधार मांडणारी लोककला-गोंधळ, भराड, जागरण इ.
४) काहिशा शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटनारी लोककला-तमाशा, लोकनाट्य, गण, गौळ्ण इ.
मौखिक साहित्याच्या परंपरेतील लोकसाहित्याला नृत्य, नाट्य, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो. तेव्हा साहित्यातील लोकरंग कलेच्या अंगाने अविष्कार घेत घेत लोककला जन्म घेते. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरुपण प्रधान आहे. निवेदन, निरुपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते. म्हणून लोककलेतील नृत्य, नाटक, गीत हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यातील निरुपण, निवेदन, बतावणी यातून लोकमनाशी संवाद करीत करीत सहजपणे प्रबोधन घडविले जाते.
भारुढ
भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.
समाजात आढळणार्या लोकभूमिकांच्या माध्यमातून काहिश्या नाट्यमय रुपात भारूड वाड्मयाला महाराष्ट्रातील संतांनी आकार दिला. प्रतीकात्मक भूमिकांमधून रुपात्मक पध्दतीने तत्त्वज्ञाची मांडणी करुन नीतीचा उपदेश संतांनी केला. त्यासाठी ’बहुरुढ’ म्हणजे भारुढ वाड्मयाचा उपयोग केला.
मराठी भाषेत अनेक संतांनी भारुढे लिहिली. पहिले भारुढ संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. संत एकनाथांनी भारुढाला लोकभिमुख बनविले. लोकाभिमुकांच्या माध्यमांतून, लोकभाषा आणि लोक वाड्मय यांच्या नाट्यमय लोककलेच्या प्रकारातून गेयता आणि विनोदातून अध्यात्म, नीतिकल्पना, प्रबोधन नाथांनी आपल्या भारुढातून केले. भारुढाला लोककलेच्या स्वरुपात नाथांनी नटविले. भारुढ रंगभूषेबरोबर नाट्य स्वरुपात सादर केले गेले म्हणजे त्याला ’सोंगी भारुढ’ म्हणतात. भारुढ नुसते गाउन दाखवत नाही. त्याची संपादणी करतात. म्हणजे भारुढ गातांना सोंगांच्या तोंडी संवाद किंवा भाषण टाकावे लागते. हा सोंगी भारुढाचा एक प्रकार आहे.
जनमनोरंजनाची साधणे म्हणुन शतकानुशतके लोकशिक्षण व स्वधर्मजागृतीचे कार्य भारुढांनी केले. अध्यात्मिक उपदेश, नीतीकल्पना सांगतांना नृत्य, नाट्य, संवाद, संगित आणि लोकभूमिकांचा रुपात्मक अविष्कार घडविणारी भारुढे मनोरंजनातुन लोकशिक्षण घडवितात.
सामान्य माणसाच्या जिवनातील विकार-वासना, दुष्ट प्रवृत्ती नाहिशा होऊन त्यांचे जिवन सुखि व्हावे म्हणून तोच तो विवेक विचार समाजाच्या मनात रुजवला. विंचू चावला म्हणजे आत्यंतिक वेदना होतात. मग क्रोधादी षड्रिपूंचा विंचु चावला तर त्याच्या वेदना किती गंभिर होतील हा विचार ’विंचु’ या भारुढात नाथांनी वर्णन केला आहे. रुपात्मक पध्दतीने विकरांपासून दूर राहण्याचा उपदेश नाथांनी ’विंचु’ मध्ये केला आहे.
अग ग ग ग ग………. कय झालं गं ? मनुष्य इंगळी अति दारुण
विंचु चावला काय मी करु ? मज नांगा मारिला तिनं
विंचु चावला विंचु चावला विंचु चावला होऽ ।। सर्वांगी वेदना जाण…..त्या इंगळीची ।।२।।
विंचु चावला वृश्चिक चावला । या विंचवाला उतारा
काम क्रोध विंचु चावला तमोगुण मागे सारा
तम घाम अंगाशी आला सत्वगुण लावा अंगारा
पंचप्राण व्याकुळ झाला विंचु इंगळी झराझरा ।।३।।
त्याने माझा प्राण चालला
सर्वांगाचा दाह जाहला ।।१।। सत्त्व उतारा घेऊन
अवघा सरिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण
शांत केली जनार्दने ।।४।।
भजन
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा इत्यादि संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी
प्रकार-
- चक्री भजनएखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे.
- सोंगी भजनया प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.
- रिंगण भजनया प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे.
ईश्वरभक्तीसाठी सर्व संतांनी विविध अभंगांची रचना केली. अभंग, गौळणी, हरिपाठ यांचे गायन होऊ लागले. अभंग वृत्त चार तुकड्यात असते. १०-१५ अक्षरांचा एक असे तीन तुकडे, शेवटचा अगदी लहान ४ ते ८-१० अक्षरांचा तुकडा असतो. त्यात द्विपदात्मक व चतु:ष्पदात्मक असे दोन प्रकार आहेत. द्विपदात्मकात दोन खंडात कडवे संपते.
उदाहरणार्थ :
द्विपदात्मक :
रुप पाहता लोचनी । सुख झा
ले वो साजणी ॥
चतु:ष्पदात्मक :
सदा माझे डोळा । जडो तुझी मूर्ती ॥
रखुमाईच्या पती । सोयरीया ॥
अभंगाच्या दुसर्या कडव्यात पहील्या ओळीत अभंगाचा विषय, अभंगाचे सार सांगितलेले असते. त्याला ’धृपद’ म्हणतात. त्यानंतर तालाची ’तोड’ घेतली जाते. शेवटच्या कडव्यात अभंग रचणार्याचे नाव असते. त्याला ’मुद्रा’ म्हणतात. रुपपर, मागणीपर, उपदेशपर, मार्गदर्शनपर, विरहिण्या, गौळणी असे अभंगाचे विषय आहेत.
भजनाची सुरुवात जयजयकाराने होते. त्यानंतर नमनाचे श्लोक असतात. नंतर पुन्हा जयजयकार आणि नंतर ’रामकृष्ण हरी’ चे भजन सुरु होते. त्यानंतर रुपपर, मागणीपर अभंग म्हंटले जातात. पहिले ५ अभंग कोणते म्हणायचे ते ठरलेले असतात. त्याला ’पंचपदी’ म्हणतात. बुक्का लावल्यानंतर कोणतेही अभंग म्हणणे संमत असते. सर्व अभंग म्हंटल्यानंतर ’गौळणी’ म्हणतात. कृष्ण, गोपी, राधा, गोकूळ, कृष्णलीला यावर आधारीत अभंग म्हणजे ’गौळणी’. भजनाचा शेवट भैरवीने होतो. शेवटी परत जयजयकार करतात. महाराष्ट्रात भजन परंपरा भक्तिपूर्ण व परिणामकारक म्हणून प्रसिध्द आहे.
प्रवचन
वैचारिक भाग संगीत विरहीत केवळ ज्ञानप्रसारासाठी आसनस्त होऊन करतात. त्यासाठी वेदोपनिषदात काही सूत्रे किंवा एखादा उपदेशपर अभंग किंवा ज्वलंत धार्मिक, सामाजिक विषयावर विवेचन करणे याला प्रवचन म्हणतात.
कीर्तन
कीर्तन हा शब्द संस्कृतात ‘कॄत्’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.
’कीर्तन’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत महत्वाचा भाग आहे. लोकजागृतीचे उत्तम साधन आहे. स्त्री-पुरुष, नागरी-ग्रामीण, साक्षर-निरक्षर या सर्वांचे मनोरंजनातून शिक्षण देणारी किर्तन परंपरा आहे. स्त्रीशिक्षणाचा आणि स्त्रीचं भावविश्व समृध्द करण्याच महत्वपूर्ण कार्य कीर्तन परंपरेने शतकानुशतके केलेल आहे.
कीर्तन परंपरा वेदकाळापासून चालत आलेली आहे. गान आणि विवेचन यांच्यातून कीर्तन जन्मले. सामान्य माणसाची वासना, दुष्ट विचार, विकार दूर होऊन आनंदी व्हावा म्हणून संतांनी आदर्श, नीतीमूल्य सांगितली. ही नीतीमूल्ये कीर्तनकारांनी समाजात रूजवली. कीर्तनामध्ये गायन-वादन, नाट्य-अभिनय, नृत्य-विनोद, यांचा एकत्रित समावेश असतो. कीर्तनामधून लोकांचे उद्बोधन, प्रबोधन आणि जागृती करण्याचे काम कीर्तनकार करतात.
कीर्तनाचे वारकरी, नारदीय, हरिदासी, रामदासी, कैकाडी, भराड, हरिकथा असे विविध कीर्तन प्रकार संप्रदायाप्रमाणे सांगता येतील. तसेच गुणसंकीर्तन, लीलासंकीर्तन, नामसंकीर्तन, असे प्रकार आहेत.
वारकरी कीर्तन महाराष्ट्रातील खेडापाडयापर्यंत जाऊन प्रबोधनाचे काम करत आहेत. वारकरी कीर्तनात पूर्वरंगातील निरुपणाला प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये नितीमूल्ये व शुध्द तत्वांची माडणी केली जाते.
नारदीय कीर्तनाचे वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वरंगात निरुपण व उत्तरंगात रसभरीत आख्यान. या कीर्तनकारांना हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात. या कीर्तनाने साकी, दिंडी या वृत्तांबरोबरच कटाव, चूर्णिका, कडाका, छंद अशी नवी वृत्ते निर्माण केली. या नारदीय कीर्तनातूनच संगीत नाटकांची परंपरा सुरु झाली असावी.
रामदासी कीर्तनकार राष्ट्रधर्म जागवतात. कैकाडी किंवा गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तनकार अति सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या बोली भाषेत नीतीबोध सांगतात. पशुबळी, जातीभेद, व्यसनाधीनता अशा सामाजिक विकृतींवर आक्षेप घेऊन प्रबोधन करतात.
नाटय, नृत्य, संगीत, विनोद यांचा मिलाफ़ करुन एकपात्री प्रयाग म्हणजे कीर्तन. कीर्तनाने देवाशी नाते जोडताना माणसातील देव शोधला. माणसामाणसातील देव्यत्वाचे जागरण म्हणजे कीर्तन. भक्तीचे सामाजिकरण, देवाचा शोध, मानवतेचा बोध हे कीर्तनाचे प्रयोजन आहे.
नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. [२]
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
कीर्तनाची अंगे
कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग .
नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्याने करीत असतो. फारतर त्याला तबला-पेटी वाजविणार्यांची साथ असते.
संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन.
वारकरी कीर्तन
वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला.
रामदासी कीर्तन ,रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात. श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.
कीर्तनांचे आधुनिक प्रकार
१) संयुक्त कीर्तन २) जुगलबंदी कीर्तन आणि ३) राष्ट्रीय कीर्तन.
कीर्तनात वापरली जाणारी वाद्ये
तबला
पेटी / ऑर्गन (हि पारंपारिक वाद्ये) हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात
चिपळ्या
झांज
करताल – हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात काणे बुवा हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजवितात
हरिकथा
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते.