धनगरी गाजा

धनगरी गाजा –हे नृत्य सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजात केले जाते . धनगर समाज निसर्गात रमत असल्यांमुळे जास्त करून त्यांची गाणी निसर्गाशी निगडीत असतात . तसेच त्यांची काही गाणी ही त्यांचे दैवत भैरोबा ह्याच्या जन्मकथेशी निगडीत असतात . हे नृत्य ढोल वर सादर केले जाते . हे नृत्य सादर करताना नाचणारे फेटा ,अंगरखा ,धोतर ,रंगीबेरंगी रुमाल असा वेष परिधान करतात.

सांगोला तालुक्यात गजीढोल नृत्य लोकप्रिय आहे. धनगर लोक गजी नावाचे नृत्य बिरोबाच्या प्रसादासाठी करतात. ते त्यावेळी जोरजोराने ढोल वाजवतात. नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. त्यामुळे ते लोकनृत्य तालुक्यात गजीढोल या नावाने प्रसिद्ध आहे. बिरोबा, खंडोबा, भैरोबा,सिध्दनाथ, वेताळ या ग्रामदेवतांचा उपासनाविधी, कुळाचार म्हणून, नवसफेडी म्हणून गजीढोल घालण्याची प्रथा आहे. देवता गावावर प्रसन्न व्हावी -तिचा कोप होऊ नये, पाऊस चांगला पडावा, धनधान्याची समृद्धी व्हावी, गावावर संकटे येऊ नयेत हे नृत्याचे प्रयोजन असते.

ढोल, सनई, सूर, शिंगतुतारी, कोटंबा, झांज, परडी इत्यादी साहित्य (अथवा वाद्ये) नृत्यासाठी वापरले जाते. नृत्याच्या एकूण पन्नास ते पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ-दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. धनगरी घाय, कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, कोंडीबाची घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. एक घाय बारा ते पंधरा मिनिटे चालते. नृत्य तीन तास चालत असते. शेवटी, गजीनृत्य करणाऱ्यांसाठी भोजन होते.

‘बिरोबाच्या नावाने चांगभले, यळकोट यळकोट जय मल्हार’ असा मुक्त जयघोष केला जातो.