नमन-खेळे

नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून होत असावेत. खेळ्यांच्या काही गीतांतून राघोबादादांच्या नावाचा उल्लेख आढळतो. १७२८ साली शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक ‘दशावतार’ म्हणून दक्षिण रत्‍नागिरी जिल्‍ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व ‘नमन-खेळे’ उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. तो समाज अशिक्षित व आर्थिक दृष्ट्या मागासलेला. त्यामुळे नमन-खेळे यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली नाही, म्हणून तो लोककला प्रकार दुर्लक्षित राहिला आहे.

दशावतार

‘दशावतार’ किंवा ‘बोहाडा’ हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध पारंपरिक नृत्यनाट्य होय. हा प्रकार कोकण आणि गोवा या भागांत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या नृत्यनाट्यासाठी तात्पुरता रंगमंच उभारला जातो. बऱ्याच वेळा दोन माणसे पडदा धरतात व नट रंगमंचावर येताच तो बाजूला करतात. प्रथम सूत्रधार येऊन नाटकाचा व पात्राच्या आगमनाचा उद्देश विशद करतो. सूत्रधार नाट्याच्या प्रारंभी विघ्नहर्ता गजा

नन व विद्येची देवता सरस्वती यांचे स्तवन करतो. सुरुवातीस गणपती रंगमंचावर येतो व थोडा वेळ नाचतो. त्याची पूजा केली जाते व आशीर्वाद देऊन

तो निघून जातो. नंतर लाकडी मोरावर बसून सरस्वती येते आणि मोरावर असल्याचे दर्शविण्यासाठी ती मोराप्रमाणे नृत्य करते. गणपतीच्या संथ नृत्याच्या तुलनेत तिचे पदन्यास चपळ असतात. तिच्या हातांत दोन रूमाल असतात व ते ती खालीवर फडफडवते. त्यानंतर दशावतारांपैकी बरेचसे अवतार प्रत्यक्ष रंगमंचावर दाखवितात. नृत्यनाट्यातील पात्रांसाठी त्यांच्या पौराणिक स्वरूपाशी मिळतेजुळते खास मुखवटे तयार केलेले असतात.

नेटके खेळता दशावतारी। तेथं येती सुंदर नारी

नेत्र मोडिती कळाकुसरी। परी अवघे ते धटिंगण।।

असे दशावताराचे यथार्थ वर्णन संत रामदासांनी आपल्या दासबोधात केले आहे. थंडीची चाहूल लागली म्हणजे कोकणातील ‘जत्रां’ना सुरुवात होते. काही ठिकाणी या जत्रांना ‘दहीकाला’ असे म्हणतात. नोव्हेंबर महिन्यापासून या जत्रा चढत्या भाजणीने सु

रू असतात. दशावताराचं रंगमंचीय आविष्करण पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो. म्हणूनच दशावतार हा कोकणी माणसांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरू नये.

दशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते – मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार रूपे मानवी नाहीत; ती प्राणी रूपे आहेत.  नववा अवतार कलंकी व दहावा बुद्ध. हे दोन अवतार ‘दशावतारा’त दाखवले जात नाहीत. ती सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेख केला जातो.दशावतारही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील लोककला . पूर्वरंगातील संकासूर-भटजी-गणपती, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू ही पात्रे आणि उत्तररंगात रामायण, महाभारत या पुराणांमधील आख्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असते.

दशावतारी नाटकांचे सादरीकरण वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या पद्धतीने आजही केले जाते. दशावतारी नाटकात प्रथम गणपतीस्तवन मग सुमधुर, ऋ द्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासुर यांचे प्रवेश होतात आणि त्यानंतर मुख्य कथानक सुरू होते.

दशावतारी नाटकाची लिखित संहिता नसते. स्वत:ची रंगभूषा करायला बसण्यापूर्वी नटमंडळींना रामायण, महाभारत आणि पुराण यातील सादर करावयाचे कथानक सांगितले जाते, त्यानुसार त्या कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वत:चे संवाद बोलत असतात.

सूत्रधार कथासूत्र पद्यात चालू ठेवतो व मुखवटे घातलेले नर्तक गाण्याला पोषक असा अभिनय करतात.वीरभावदर्शक अभिनय ,करुण भाव दर्शवणाऱ्या हालचाली , भय, रौद्र आदी भावही यथायोग्य रीतीने प्रकट केले जातात. संगीतसाथीमध्ये तुणतुणे, तांबोरी, डफ, मृदंग, झांजा इ. वाद्यांचा अंतर्भाव होतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय व कलात्मक नृत्यप्रकार म्हणजे ‘राधा’वा ‘गौळण’नृत्य होय. हावभाव सुविहित व नेटके असतात. वाद्यसंगीतात तुणतुणे, तंबोरी व डफ यांची साथ असते. हे नृत्य साधारणपणे होळीच्या सुमारास कोकण भागात केले जाते.