समाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो ‘मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेने. ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये वृद्धांच्या उपचारांखेरीज आणखी काही समाजोपयोगीही कामे केली जातात. अनाथ मुले-मुली, अत्याचारित महिला, विस्मरण रोग झालेले वृद्ध यांचाही सांभाळ केला जातो. अनाथ व गरीब मुलींना शिक्षण देऊन, त्यांना नोकरी लावून त्यांची लग्नेही केली जातात. अत्याचार झालेल्या स्त्रियांना ट्रस्टमध्ये काम दिले जाते. विस्मरण रोग झालेले लोकं हरवतात. पोलिसांतर्फे ट्रस्टला तशी माणसे सोपवण्यात येतात. त्यांच्यावर उपचार होऊन काहींना नातेवाईक सापडल्यास त्यांच्याकडे सुपूर्द केले जाते. ज्यांना स्मरण होत नाही त्यांचा शेवटपर्यत सांभाळ केला जातो. इतकेच नव्हे तर ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ बेवारस मृतांचा अंतिम संस्कारही करते.
संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली.मालिनी केरकर वैद्यकीय अधिकारी म्हणून डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयात काम करत होत्या. सर्वसाधारण वृद्ध हे अॅडमिट होत तेव्हा त्यांना तळमजल्यावर ठेवले जाई. मालिनी सर्वांची आपुलकीने विचारपूस व सेवा करत. “आम्हाला उपचाराने नाही पण ताई तुमच्या विचारपुस करण्यामुळे बरे वाटते” असे काही रुग्ण केरकर यांना सांगत. वृद्ध वयात होणारा त्रास व घरच्यांनी सोडलेली साथ पाहून त्यांनी वृद्धांसाठी ‘ओल्डेज होम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 31 मार्च 2005 साली नोकरी सोडली अन् 9 एप्रिल 2005 या एका दिवसात ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे संस्था सुरू केली. संस्था ओळखीच्या नगरसेवकांच्या मदतीने गोपाळनगरमधील लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्व जागेत सुरू झाली. संस्थेचे कामकाज माऊथ पब्लिसिटी करुनच पसरले.
मालिनी स्वतः कॅन्सरपीडित आहेत. त्यांना रुग्णांना होणारा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णांची सेवा करण्यात जास्त आवड जाणवू लागली. ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’बद्दल फारसे कोणाला माहीत नव्हते. परंतु ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने त्यांची दखल ‘सर्वकार्येशु सर्वदाः’ या सदरामध्ये घेतली. त्यांच्या मदतीने पस्तीस लाख रुपये जमा झाले. त्या पैशांमध्ये 2014 साली चॅरिटेबल पॉलिक्लिनिक सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत गावांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांकडून रक्त तपासणीपासून दात तपासणी व डोळे तपासणीपर्यंत सर्व प्रकारचे उपचार गावांमध्ये उपलब्ध केले गेले. तीस रुपये आकारून, दोन दिवसांचे औषध देऊन गरिबांना मदत केली जाते. त्यामुळे लोकांची मागणी वाढली. तेव्हा ‘मैत्री’ने त्यांची ती जागा सोडून दुसऱ्या जागी 2015 साली हलवली. ती जागा मोठी आहे. तळमजला व पहिला मजला अशा प्रकारे पुन्हा भाडेतत्त्वावर काम सुरू झाले.
‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’चा सर्व खर्च दिलेल्या एक-दोन हजाराच्या छोट्या देणग्या आणि अन्न व धान्यदान यांवर होत आहे.‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये वृद्धांची देखभाल चांगल्या पद्धतीने केली जाते. आजी-आजोबांच्या आवडीनुसार दोन वेळा पौष्टिक जेवण दिले जाते. मालिनी केरकर स्वच्छता, साफसफाई यांकडे जास्त लक्ष देतात. वेळप्रसंगी स्वतः जेवण करणे, स्वच्छता ठेवणे ही कामे करतात. ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये काही लोक आजीआजोबांसह लहान मुलांचा, लग्नाचा वाढदिवस असे कार्यक्रम साजरे करतात. मालिनी केरकर यांनी खेळीमेळीचे व घरचे वातावरण आजी-आजोबांना उपलब्ध करून दिले आहे. ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ मालिनी केरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वावर समाजातील सोडून दिलेल्या लोकांना आनंद देत गेली बारा वर्षें उभी आहे.