खसखस कांदा
साहित्य –
खसखसची भाजी 1 वाटी
छोटे कांदे 10 नग
गरम मसाला 1 चमचा
आमचूर पावडर 1 चमचा
कोथिंबीर पाव वाटी
कृती –
आमचूर पावडर, कोथिंबीर मीठ, गरम मसाला यामध्ये थोडे पाणी शिंपडून मसाला तयार करुन ठेवा. छोटे कांदे मसाल्याच्या वांग्याप्रमाणे चिरा देवून पाण्यात टाका. नंतर यात तयार मसाला भरुन हे कांदे थोडया परतून घ्या. नंतर तयार खसखसची भाजी वरुन घाला. सव्र्ह करतेवेळी एका प्लेटमध्ये चार कांदे व त्यावर खसखसची भाजी, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
डाळ कांदा
साहित्य:-
भिजवलेली चण्याची डाळ 2 वाटया
बारीक चिरलेला कांदा 2 वाटया
आलं लसूण पेस्ट 4 चमचे
धने जिरे पावडर 2 चमचे
वैदर्भीय पद्धतीचा काळा मसाला 1 चमचा
हिरवी मिरची ठेचलेली 1 चमचा
खसखस भाजून कुटलेली 2 चमचे
तिखट, हळद, मीठ चवीनुसार
शेंगदाण्याचे तेल अर्धी वाटी
मोहरी, हिंग फोडणीला
कृती:-
चण्याची डाळ दोन ते तीन तास भिजवून ठेवावी. फोडणीला तेल घालून मोहरी फुटल्यावर हिंग, कुटलेली मिरची, लसूण परतल्यावर कांदा घालून खरपूस परतावा. त्यानंतर चण्याची डाळ, मीठ व थोडे पाणी घालून शिजवावी. त्यानंतर क्रमाक्रमाने धने जिरे पावडर, खसखस, हळद, तिखट, आलं घालून थोडे परतावे. गरम मसाला कोथिंबीर घालून लंबी रोटी किंवा भाकरी बरोबर खायला द्यावी.
टिप:- 1) या भाजीत तेल व तिखट नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडे जास्त असते.
भरलेले कारले
साहित्य:-
कारली 8-10 नग
मसाल्याकरिता साहित्य:-
किसलेला गुळ अर्धी वाटी
आमचुर पावडर पाव चमचा
आलं लसूण पेस्ट 1 चमचा
हळद, साखर, मीठ चवीनुसार
तिखट चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
तेल –
कृती:-
सर्व प्रथम कारली धुवून त्याचा बरचा टोकदार भाग सोलून घ्यावा. नंतर कारलं मधोमध कापून पाण्यात 15-20 मिनिट ठेवा. ते फुलल्यानंतर त्याच्या बियांचा आतला गर काढून घेणे. नंतर मसाल्याचे साहित्य एकत्र करुन हा मसाला कराल्यामध्ये भरावा नंतर त्याला एक दोरा गुंडाळून ठेवावा. एका कढाईत तेल घेऊन तेलाच्या वर बसेल अशी जाळी त्यावर ठेवावी तेल ताळीला लागणार नाही याची दक्षता घ्यावी. नंतर या जाळीवर कारले ठेवून तेलाचा जो धूर निघतो त्यांवर 15-20 मिनिटे शिजवावी.
पानकोबीची भाजी
साहित्य –
पत्ताकोबी चिरलेली 1 वाटी
चण्याची डाळ 1 वाटी
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
मीठ, साखर चवीनुसार
कृती –
तेलात हिंग, मोहरी फोडणीला घालून त्यात भिजवलेली 1 वाटी चण्याची डाळ थोडी परतून घ्या नंतर बारीक चिरलेली 1 वाटी पानकोबी, हळद, मीठ, साखर घालून चांगले परता व अंगच्याच पाण्याने शिजवा.
कोल्हापूरी तांबढा रस्सा
साहित्य:
तीळ भिजवलेले अर्धी वाटी
जिरे 1 चमचा
लवंग 3 ते 4
दालचिनी अर्धा चमचा
काळी मिरे 5 ते 6
ओलं खोबरं अर्धी वाटी
सुकं खोबरं (भाजून घेणे) अर्धी वाटी
आलं लसूणची पेस्ट 2 चमचे
कोल्हापूरी चटणी 5 चमचे
कोल्हापूरी सुका मसाला अर्धा चमचा
कोथिंबीर 4 चमचे
तेल पाऊण वाटी
मीठ चवीनुसार
कृती:
पाऊण वाटी तेलात जिरे, कांदे, लसणाची पेस्ट फोडणीला घालून खरपूस भाजून घ्यावी. उरलेले साहित्य एकत्र वाटून यात घालावे. चांगले परतल्यावर यात मटणाचे सूप, चवीनुसार मीठ घालून एकत्र उकळावे.
कोल्हापूरी पांढरा रस्सा
साहित्य:
मटणाचे पाणी 1 लिटर
(मटण, मीठ व हिंग घालून पाण्यात शिजवून घेणे.)
नारळाचे दूध चार कप
तीळ 1 चमचा
काजू 2 चमचे
खसखस 2 चमचे
कृती –
तीळ, खसखस, काजू एकत्र भिजवून बारीक वाटून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात लवंग दालचिनी हिरवी मिरची, मिरे, व तमालपत्र याची फोडणी घालून वर आलं-लसणाची पेस्ट घालावी. ती खरपूस भाजून झाल्यावर त्यात तीळ, खसखस व काजूची पेस्ट घालावी व परतावे. नंतर यात थोडा मटणाचा स्टाॅक घालून मिश्रण उकळवावे. सर्वात शेवटी नारळाचे दूध घालावे. चवीनुसार मीठ घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
शेवग्याची भाजी
साहित्य:-
शेवग्याच्या शेंगाचा गर (वाफवून) 1 वाटी
चण्याचं पीठ 1 वाटी
नाचणी व तांदळाचे पीठ पाव वाटी
उभा चिरलेला कांदा 2 नग
हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा
ओवा 1 चमचा
बारीक चिरलेला कोथिंबीर अर्धी वाटी
तेल तळण्याकरीता
मीठ चवीनुसार
कृती –
प्रथम बाउलमध्ये शेवग्याच्या शेंगांचा गर घेऊन त्यात क्रमाने बेसन, चाणी, तांदूळाचे पीठ, ओवा, हिरवी मिरचीची पेस्ट, चिरलेला कांदा, कोथिंबीर व मीठ घालून भज्यांच्या मिश्रणाप्रमाणे तयार करावे. आवश्यकता वाटल्यास भिजवण्यासाठी पाणी वापरावे. तयार मिश्रणाची गरम तेलात कुरकुरीत भजी तळावीत. साॅसबरोबर सव्र्ह करावी.
कोहळयाची गाखर भाजी
साहित्य:
कोहळा पाव किलो
कोथिंबीर पाव वाटी
व-हाडी रस्सा 3 वाटया
गरम मसाला 1 चमचे
मीठ चवीनुसार
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
तेल फोडणीला
कढी पत्ता-
चारोळी भाजलेली 5 चमचे
कृती:
कोहळे सालीसकट कापून ठेवावे. एक चमचा तेल फोडणीला घेवून त्यात मोहरी, हिंग,कोहळयाचे तुकडे, कढी पत्ता व चवीनुसार मीठ घालावे. यानंतर व-हाडी ग्रेव्ही व चारोळी घालून मंद आचेवर शिजवावे. गरम मसाला घालावे. शक्यतोवर पाणी न टाकता शिजवावे. वरुन कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोबर वाढावे.
टिप:- ही भाजी तशी मुळात सौम्य असते, त्यामुळे तयार करतांना थोडी मसालेदारच करावी.
मटकी उसळ
साहित्य –
मटकी 2 वाटया
मोहरी 1 चमचा
हिरव्या मिरच्या 3-4
कांदा पाव वाटी
आलं-लसूण 1-1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आमचूर पावडर अर्धा चमचा
कृती –
आदल्या दिवशी मटकी चार तास पाण्यात भिजवून, उपसून कापडात बांधून उबदार जागेत ठेवा. दुस-या दिवशी त्याला मोड येईल. एका पाण्यातून काढून पसरवून ठेवा किंवा फ्रीजमधे ठेवा. कढईत तेल फोडणीला घालून त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूणाची गोळी घालून चांगले परता. नंतर त्यात चवीनुसार हळद, तिखट, मीठ, आमचुर पावडर व साखर घालून मोड आलेली मटकी घाला. शक्यतोवर अंगच्याच पाण्याने शिजवा.
गवारा तिखा
साहित्य:-
गवाराच्या शेंगा 200 ग्रॅम
बारीक चिरलेले कांदे 1 वाटी
आलं लसूण पेस्ट 3 चमचे
धने जिरे पावडर 1-1 चमचा
हळद, तिखट चवीनुसार
गरम मसाला 1 चमचा
मीठ चवीनुसार
भाजून बारीक केलेली खसखस 2 चमचे
तेल अर्धी वाटी
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
कृती:-
प्रथम पातेल्यात थोडं पाणी घेऊन त्यात हळद-मीठ घालून गवारीच्या शेंगा, उकळवून घ्या. (शेंगाच्या फक्त शिरा काढून घ्या). तेलावर मोहरी घालून फुटल्यावर लसूण पेस्ट, कांदा चांगला परतून घ्या. नंतर हळद, तिखट, धने, जिरे पावडर घाला. नंतर आलं घालून थोडं ओलसर होईल इतपत पाणी घालून चवीनुसार मीठ घाला. कोथिंबीर गरम मसाला घालून गरम भाकरीबरोबर सर्व्ह करा.
भरलेलं कोहळं
साहित्य:-
छोटं कोहळं अंदाजे 3 ते 4 इंच असलेलं
खवा अर्धी वाटी
भाजून वाटलेली खसखस 3 चमचे
आलं-लसूण पेस्ट 3 चमचे
हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
काजूचे तुकडे 4-5
मनुका 4-5
लिंबाचा रस 2 चमचे
मीठ, साखर चवीनुसार
तेल तळायला
कच्च्या कांद्याची पेस्ट 1 वाटी
कोथिंबीर, आलं, खोबरं 1 वाटी
कृती:-
कोहळं वरुन हलकेच कापून त्यातील आतला गर काढून टाकावा व आतल्या भागाला मीठ-लिंबू चोळून ठेवावा. खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, काजू, किसमिस, खवा, मीठ, साखर घालून हा मसाला कोहळयात भरावा. वरुन कणकेच्या पेस्टच्या साहाय्याने झाकण लावावे, असे भरलेले कोहळे व त्यावरचे झाकण घट्ट बसेल असे तयार करुन ठेवावे. त्यासाठी टूथ पीकचा वापर करा. तेल मध्यम गरम करावा. त्यात हे कोहळे हलकेच ठेवून मंद आचेवर तळावे, नंतर चाळणीवर ठेवून निथळू द्यावे.
लसूण मेथी
साहित्य –
चिरलेला लसूण 4 चमचे
चिरलेली मेथी 2 वाटया
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
हळद, तिखट चवीनुसार
चिरलेला कांदा अर्धी वाटी
मीठ, लिंबू, साखर चवीनुसार
मनुका 4 चमचे
कृती –
फ्रायपॅनमध्ये तेल घेवून त्यामध्ये मोहरी, लसूण, कांदा छान परतून घ्या. नंतर मेथी घालून ती सुद्धा परता. चवीनुसार हळद, तिखट, हिंग, मीठ, लिंबू, साखर, मनुका घालून पाणी न टाकता शिजवा. स्वर्ह करतेवेळी वर दोन तळलेल्या लसणाच्या पाकळया ठेवून सर्व्ह करा.
पातळ भाजी
साहित्य:-
बारीक चिरलेला पालक 2 वाटया
मेथी किंवा आळू अर्धी वाटी
मुळयाच्या चकत्या अर्धी वाटी
हिरवी मिरची कापलेली 2 चमचे
आलं, लसूण पेस्ट, हळद, तिखट चवीनुसार
मेथी दाणे अर्धा चमचा
खोब-याचे काप 2-3 चमचे
भिजलेले शेगदाणे 1 चमचा
चणा डाळ भिजलेली अर्धी वाटी
हिंग अर्धा चमचा
धणे जिरे पावडर 2 चमचे
तेल अर्धी वाटी
कृती:-
प्रथम एका भांडयात दाणे चणाडाळ एकत्र शिजवून घ्या. अर्धी वाटी तेलापैकी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण, शिजवलेले दाणे, चणाडाळ, कढीपत्ता, खोबरं-मुळा, हळद, तिखट, मेथीदाणे घालून चांगले परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेला पालक, मेथी टाकून खरपूस परतून घ्यावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर थोडी बेसनाची पेस्ट करुन त्यांनी घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून उकळून घ्यावी. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, हिंग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणी वरुन भाजीवर घालावी.
फणसाची भाजी
साहित्य –
फणसाची तुकडे 2 वाटया
बेसन 1 वाटी
आरारोट पाव वाटी
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
लिंबाचा रस 1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
धणे-जीरे पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
खसखस पाव वाटी
खोबरं पाव वाटी
बारीक चिरलेला कांदा 1 नग
लसूण पाकळया 10-12
आल्याचा तुकडा 1 इंच
हिरवी मिरची 4-5
कोथिंबीर 4 चमचे
तमालपत्र 2-3
कृती –
बेसन, आरारोट व मीठ एकत्र चाळून घ्या. फणसाच्या तुकडयांना आलं-लसूण पेस्ट, लिंबू, हळद, तिखट, मीठ चोळून ठेवा. हे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा. एका पॅनमध्ये थोडे घेवून त्यामध्ये खसखस, कांदा, खोबरं, आलं-लसूण थोडे तेल घालून परतून घ्या. नंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक करुन घ्या. दुसरे पॅन घेवून त्यात तेल गरम करुन तमालपत्र व वाटलेला मसाला घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ व पाणी घालून वरुन कोथिंबीर घाला सव्र्ह करतेवेळी दोन-तीन एकत्रीत ठेवून त्यावर ग्रेव्ही घालून सर्व्ह करा.
39. शहाळयाची भाजी
साहित्य –
शहाळयाची मलाई 2 वाटया
काजू पेस्ट 4 चमचे
चिरलेला कांदा अर्धी वाटी
आलं-लसूण 4 चमचे
मीठ, तिखट, साखर चवीनुसार
हळद पाव चमचा
फ्रेश क्रीम 2 चमचे
कोथिंबीर 4 चमचे
कृती –
फ्रायपॅनमध्ये थोडया कांदा, आलं, लसूण परतून घ्या. नंतर शहाळे सुद्धा थोडे परतून घ्या. यात चवीनुसार मीठ, तिखट, साखर व थोडे पाणी घाला. थोडे परतून काजू पेस्ट, फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.