षोडशोपचार व पंचोपचार पूजा

षोडशोपचारपूजा ही सोळा उपचारांनी करावयाची असते. त्यामधे कोणते उपचार असतात. ते कसे अर्पण करायचे

याची थोडक्यात माहीती पाहू….

सर्वप्रथम देवपुजेला बसताना काहिगोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

1) पुजेला बसताना कायम धूतवस्त्र(धुतलेले) सोवळे इ. नेसून बसावे.

2) पुजाकरतेवेळी आसनावरती बसावे. जमिनीवर बसू नये. तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.

3) कपाळाला गंध / पिंजर इ. लाऊन बसावे.

4) एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपुजा करावी.

5) देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, मध्येच उठू नये.

6) देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.

7) आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.

8) फ़ुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी.

9) विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे त्याचप्रमाणे नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.

हे नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभेल, घरामध्ये प्रसन्नता येते, वातावरण पवित्र बनते, कुटुंब सुखी होते व आपल्या सद्इच्छा पूर्ण होतात.

षोडशोपचार पूजा – म्हणजे जी पूजा सोळा उपचारांनी केली जाते. सोळा उपचार या प्रमाणे- १) आवाहन. २) आसन ३) पाद्यं. ४) अर्घ्य. ५)आचमन. ६)स्नान. ७) वस्त्र. ८) यज्ञोपवीत ९) गंध. १०) पुष्प. ११) धूप. १२) दीप. १३) नैवेद्य. १४)प्रदक्षिणा. १५) नमस्कार. १६) मंत्रपुष्प.

प्रथम पुजेला बसणार्‍याने आचमन करावे. आचमन म्हणजे – डाव्या हातात पळी घेउन त्याने उजव्या हातावर पाणी ओतणे ते पाणी प्राशन करणे, ही कृती तीन वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडणे म्हणजे आचमन होय.

तिलक धारण :- कोणत्याही शुभ कार्याला बसताना कपाळी तिलक धारण करावा. स्वत:ला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा. देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावयाचे असते.

प्रथम कलश पूजन करावे. आपण जे पूजेला पाणी वापरतो त्यामधे पुण्यनद्यांचे आवाहन करावयाचे असते. ज्यांना मंत्र ज्ञात नाही त्यांनी स्मरण करावे. व कलशाला गंध, अक्षता, फ़ूल वहावे.

त्यानंतर शंख पूजन करावे:-

शंखामध्ये चंद्र, वरूण, प्रजापती, गंगा, सरस्वती इ. देवतांचे सांनिध्य असते. म्हणून त्याला गंध-फ़ुल वाहून नमस्कार करावा. *शंखाला अक्षता वाहू नये.

त्यानंतर घंटेचेपूजन करावे. :- देवतांना बोलावण्यासाठी व राक्षसांना घालवण्यासाठी घंटेचे पूजन करावे. घंटा वाजवावी.

दीप पूजन :- जो प्रज्वलीत दीप किंवा समई आहे ती ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या पूजनाने आपल्याला आरोग्य प्राप्त होते. म्हणून दीपपूजन करावे व नमस्कार करावा.

शुद्धी :- पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेउन तुळसपत्र घेउन सर्व पूजासाहित्य व स्वत:वरती प्रोक्षण करावे. (पाणी शिंपडावे)

ध्यान :- ज्यादेवतेची पूजा करणार त्यादेवतेचे मनात स्मरण करावे. रोजची घरातील देवाची पूजा असेल तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ( अनुक्रमणिकेत कुलदेवतांचे ध्यानमंत्र या विषयात पहावे.)

1) आवाहन :- देवाच नाव घेउन नम्रभावाने देवाला बोलावणे. (देवावरती अक्षता वहाव्या.)

2) आसन :- देवाला बसायला आसन देणे.

3) पाद्य :- देवाचे पाय धूणे .

4) अर्घ्य :- गंध, फ़ूल, नाणे, सुपारी एकत्र घेउन पाण्याबरोबर देवाला देणे.

5) आचमन :- देवाला आचमनासाठी पाणी देणे. (मुर्तीवर पळीने पाणी वहावे.)

6) स्नान :- देवाला पाण्याने स्नान घालावे.

पंचामृत स्नान :- प्रथम पयःस्नान म्हणजे – दुधाने देवाला स्नान घालावे. ( नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वाहून नमस्कार करावा. )

दधिस्नान :- देवाला दह्याने स्नान घालावे. (नंतर ………….. नमस्कार करावा.) वरील प्रमाणे.

घृतस्नान :- देवाला तूपाने स्नान घालावे. (नंतर………… नमस्कार करावा.)

मधुस्नान :- देवाला मधाने स्नान घालावे. नंतर…………. नमस्कार करावा.)

शर्करास्नान :- देवाला साखरेने स्नान घालावे. (नंतर…………. नमस्कार करावा.)

गंधोदकस्नान :- देवाला थोडे गंध-पाणी एकत्र करून त्याने स्नान घालुन शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फ़ूल वहावे. व नमस्कार करावा. उदबत्ती, दिवा ओवाळावा. पंचामृत / दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा. व ज्या देवाची पूजा चालू आहे त्या देवाचे स्तुतीपर मंत्र / श्लोक म्हणून देवावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवाला सुगंधी द्रव्य / अत्तर इ. स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावरती  ठेवावे.

७)वस्त्र :- देवाला कापसाचे वस्त्र वहावे.

८)यज्ञोपवीत :- देवाला जानवे घालावे. व आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हनात पाणी सोडावे.

९)चंदन:- देवाला अनामिकेने चंदन लावावे (अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजुचे बोट.) त्यानंतर देवाला अलंकार असतील  तर घालावे. नसल्यास अक्षता वहाव्या.

परिमलद्रव्य :- हळद, पिंजर, शेंदुर, अबीर यातील उपलब्ध असेल ते देवाला वहावे. (फ़ुलाला अत्तर लाऊन फ़ूल देवाला वहावे.)

१०) पुष्प :- देवाला सुगंधीफ़ुले, हार, गजरे, तुळस, दूर्वा, बेलपत्र वहावे.

११) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळणे.

१२) दीप :- देवाला  येथे शक्यतो शुद्धतुपाचे निरांजन ओवाळावे.

१३) नैवेद्य :- देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा दाखवायचा  असल्यास शक्य झाल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे. व देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे पान ठेउन देवाला नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य देव घेणार (जेवणार) आहेत अशा स्थितीत केळीचे पान ठेवावे.   हातधुण्यासाठी,  मुखधुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हनात चार वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे.

तांबूल :- देवाला विडा देणे. (विडा- दोन विड्याची पाने व सुपारी) तसेच सुवर्णपुष्प देणे अशक्य असल्याने एक नाणे ठेवावे.

या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात इ. मुखवास पदार्थ सुद्धा ठेवू शकता.

फ़ल :- देवाला श्रीफ़ल(नारळ) किंवा इतर फ़ळे देणे.   त्यानंतर देवाची आरती करावी.

१४) प्रदक्षिणा करावी:-.(स्वत:भोवती उजव्या बाजूने फ़िरणे.)

१५) साष्टांग नमस्कार:- करावा.

१६) मंत्रपुष्पांजली :- दोन्ही हातात फ़ुले घेउन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फ़ुले अर्पण करावी.

प्रार्थना:- हात जोडून मनुष्य स्वभावानुसार या सेवेत काही राहिले असल्यास अनन्यभावाने देवाची प्रार्थना करावी. क्षमा मागावी.  अशाप्रकारे षोडशोपचारपूजा पूर्ण होते.

 पंचोपचार पूजा

पंचोपचारपूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात, त्याला पंचोपचारपूजा म्हणतात.    यामधे……..

१)गंध :-देवाला गंध लावावे.

२)पुष्प :- देवाला फ़ुले अर्पण करावी.

३) धूप :- देवाला धूप / उदबत्ती ओवाळावी.

४)दीप :- देवाला तुपाचे निरांजन ओवाळावे.

५)नैवेद्य :- देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेउन देवाला नैवेद्य दाखवावा.

(पंचोपचार पूजेत हे पाच उपचार असतात.)

गणेश :- जपापुष्प(जास्वंद), चाफ़ा, दूर्वा, शमी, मोगरा, केवडा इ. सुवासिक फ़ुले. (तुळस भाद्रपद महीन्यात फ़क्त गणेशचतुर्थीला वहावी.)डाळींब, सफ़रचंद, सिताफ़ळ श्रीफ़ल(नारळ) इ. फ़ळे गणेशाला प्रिय आहेत.

शंकर :- धोतर्‍याचे फ़ूल, पिवळी व पांढर्‍या रंगाची फ़ुले, बेलपत्र प्राजक्त इ. तसेच बेलफ़ळ, धोतर्‍याचेफ़ळ, शहाळे(कोवळा नारळ) शंकरांना प्रिय आहेत. *लाल रंगाचे फ़ूल, हार शंकराला वाहू नये.*तसेच महाशिवरात्री व्यतिरिक्त अन्य दिवशी केवडा अर्पण करू नये.

देवी :- चाफ़ा, सायली, जाई-जुई, अष्टर, कृष्णकमळ, सर्व सुवासिक फ़ुले तसेच तुळस, दूर्वा, दवणा व नारळ, महाळुंग, सर्व खावयास योग्य फ़ळे, पंचखाद्य देवीला प्रिय आहेत.

सूर्य :- सर्व लाल रंगाची फ़ुले, व सर्व खाण्यास योग्य फ़ळे सूर्याला प्रिय आहेत.

गणपती पूजा-
भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हसमयी गणपतीपूजा करावी . प्रातःकाळी अंगाला तीळ लावून गरम पाण्याने स्नान करावे . बहुतेक वेळी गणपतीच्या पूजनाला तृतीयायुक्त चतुर्थी घ्यावी .

पूजेचे साहित्य

हळदकुंकू , गुलाल , रांगोळी , फुले , दूर्वा , तुळशी , बेल , विडयाची पाने १५ , गूळ , खोबरे , पंचामृत ( दूध – दही , तूप – मध , साखर ), शेंदूर , गंध , जानवे , कापूर , उदबत्ती , नारळ , खारीक , बदाम , फळे , दक्षिणा ; फुले पुढीलप्रमाणे – लाल कमळ , मंदार , चाफा , केवडा , गोकर्ण , जाई , जास्वंद , शेवंती , गुलाब , पारिजातक . पत्री पुढीलप्रमाणे २१ प्रकारची : ( १ ) मोगरी , ( २ ) माका , ( ३ ) बेलाचे पान , ( ४ ) पांढर्‍या दूर्वा , ( ५ ) बोरीचे पान , ( ६ ) धोत्र्याचे पान , ( ७ ) तुळस , ( ८ ) शमी , ( ९ ) आघाडा , ( १० ) डोरली , ( ११ ) कण्हेर , ( १२ ) रुई , ( १३ ) अर्जुनसादडा , ( १४ ) विष्णुक्रांता , ( १५ ) डाळिंब , ( १६ ) देवदार , ( १७ ) पांढरा मरवा , ( १८ ) पिंपळ , ( १९ ) जाई , ( २० ) केवडा , ( २१ ) अगस्तिपत्र .

॥ अथ गणेशपूजाप्रारंभः ॥

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळदकुंकू वाहून देवापुढे विडा ( विडयाची पाने दोन , त्यावर एक रुपया व एक सुपारी ) ठेवून देवाला नमस्कार करावा . गुरुजींना म्हणजे आपल्या उपाध्यायांना नमस्कार करुन घरातील वडील मंडळींना नमस्कार करावा व नंतर आसनावर पूजेसाठी बसावे व पूजेला आरंभ करावा .

द्विराचम्य ० पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे ( प्यावे ). चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे . याप्रमाणे दोन वेळा करावे .

१ ) ॐ केशवाय नमः , २ ) ॐ नारायणाय नमः , ३ ) ॐ माधवाय नमः , ४ ) ॐ गोविंदाय नमः , ५ ) ॐ विष्णवे नमः , ६ ) ॐ मधुसूदनाय नमः , ७ ) ॐ त्रिविक्रमाय नमः , ८ ) ॐ वामनाय नमः , ९ ) ॐ श्रीधराय नमः , १० ) ॐ ह्रषीकेशाय नमः , ११ ) ॐ पद्मनाभाय नमः , १२ ) ॐ दामोदराय नमः , १३ ) ॐ संकर्षणाय नमः , १४ ) ॐ वासुदेवाय नमः , १५ ) ॐ प्रद्युम्नाय नमः , १६ ) ॐ अनिरुद्धाय नमः , १७ ) ॐ पुरुषोत्तमाय नमः , १८ ) ॐ अधोक्षजाय नमः , १९ ) ॐ नारसिंहाय नमः , २० ) ॐ अच्युताय नमः , २१ ) ॐ जनार्दनाय नमः , २२ ) ॐ उपेंद्राय नमः , २३ ) ॐ हरये नमः , २४ ) ॐ श्रीकृष्णाय नमः ॥

प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्रीच्छंदः । प्राणायामे विनियोगः ॥ ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् । ॐ आपो ज्योति रसोऽमृतम् । ब्रह्मभूभुर्वः स्वरोम् ॥

मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी…

गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्र , ताम्हण , समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक , मिठाई , पेढे , गोड पदार्थ

गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रात:स्नानसंध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून , अक्षता पसराव्यात. नंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायामादी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांना गंधअक्षता-पुष्प अर्पण करावं. नंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूतीर्च्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।

अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।। १ ।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।। २ ।।

अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करून…

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।। 3 ।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।। 4 ।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।। 5 ।।

हे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।। ६ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।
स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।। ७ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।
विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।। ८ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।। ९ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

असे म्हणून पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने , अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।
गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।। १० ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।
असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।
भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभीष्टदायक।। ११ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

असं म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावं.

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।। १२ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत अर्पण करावे. नंतर पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर , गरम पाणी अर्पण करावे. अथर्वशीर्ष म्हणावे

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।
सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।। १३ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।। १४ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।
विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।। १५ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।
ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।। १६ ।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।
मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।। १७ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।
गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।। १८ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।
गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।। १९ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

असं म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावं.

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।। २० ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।

असं म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा.

पूगीफलम् महदिव्यम् नागवल्ल्या समन्वितम्।
कर्पुरइला समायुक्तम्तांबुलम् प्रतिगृह्यताम्।। २१ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा.

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।। २२ ।।
विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।। २३ ।।

हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।
साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।। २४ ।।

असा मंत्र म्हणून श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यन्तिम् प्रदक्षिण पदे पदे।। २५ ।।

असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या

विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।
देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।। २६ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना फुले अर्पण करावी व हात जोडून पुढील प्रार्थना करावी…

यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।
गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।। २७ ।।

विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत।
पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।। २८ ।।

आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।। २९ ।।
मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।। ३० ।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। ३१ ।।

अशी श्रीगणेशांची प्रार्थना झाल्यावर आरती करावी. त्यानंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.

।। इति पूजाविधी ।।

श्रीगणपतीची उत्तरपूजा

( उत्तरपूजेचा काल – ऋषिपंचमीच्या दिवशी अथवा गौरीविसर्जनाच्या दिवशी किंवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जन करावे . )

आचम्य श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि ।

वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध , फुले , अक्षता , हळद – कुंकू , दूर्वा , शेंदूर हे उपचार वाहावेत .

श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।

वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप , दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा . कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .

आरती , मंत्रपुष्प व प्रार्थना करुन झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी .

( वरील गोष्टी गणपतीबरोबर विसर्जनास द्याव्यात . )

अनेन कृत उत्तराराधनेन तेन श्रीभगवान् सिद्धिविनायकः सांगः सपरिवारः प्रियताम् । ॐ तत्सत् ॥

एवढया वरील सर्व गोष्टी करुन झाल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा व नंतर खाली दिलेला मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा .

यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।

इष्टकामप्रसिद्धयर्थं पुनरागमनाय च ॥

ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ॥