केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रत केल्याचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात. पहिल्या पंधरवड्यात ‘स्मार्त’ ही शंकराची आणि दुसर्‍या पंधरवड्यात ‘भागवत’ ही विष्णूची एकादशी येते. हिंदु धर्माच्या सर्व मासांतील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावास्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यास ‘शुक्ल पक्ष’आणि पौर्णिमा ते अमावास्या यातील पंधरवड्यास ‘कृष्ण पक्ष’, असे संबोधतात. यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रती मासाला दोन एकादशी येतात.

प्रचलित कथा : गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत – महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने ‘गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे ?’, असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने ‘एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्यादोष नाहीसा होईल’, असे त्याला सांगितले. या व्रताचे आचरण केले असता, महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील.

पौराणिक कथांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून व्रतवैकल्यांमध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होते.

व्रत करण्याची पद्धत

एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्‍या दिवशी पारणे करतात.

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात.

कार्तिकी एकादशी

या रात्री श्रीविष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला `हरिहर-भेट’ किंवा `हरिहर-अद्वैत’ म्हणतात.

कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वाहावे.

महत्त्व

कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !

‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.

निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)

१. तिथी : ज्येष्ठ शुद्ध एकादशी

२. इतिहास : ‘पांडवांतील भीमाचा आहार विलक्षण. भीमाला सर्व एकादश्यांना उपवास करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने व्यासांच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि सर्व एकादश्यांच्या उपवासाचे पुण्य जोडले.’

३. महत्त्व : निर्जला एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करताही सर्व एकादश्यांचे पुण्य मिळते.

कामदा एकादशी

‘ललिताने कामदा एकादशीचा उपवास करून प्रार्थना करताच पती ललितचे पाप नष्ट झाले. त्याचा राक्षसभाव निघून जाऊन त्याने दिव्य देह धारण केला आणि तो पुन्हा गंधर्व बनला.’ – ऋषी प्रसाद (एप्रिल २०११)

पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.

 अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।

एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.

एकादशीचा उपवास

पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.

एकादशीचे लाभ

‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.

स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।

सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।

न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।

न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस, असे संबोधतात.